दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 16 जुलै 2025, वार : बुधवार
भारतीय सौर : 25 आषाढ शके 1947, तिथि : षष्ठी 21:01, नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 28:49
योग : शोभन 11:56, करण : गरज 09:52
सूर्य : मिथुन, चंद्र : मीन, सूर्योदय : 06:09, सूर्यास्त : 19:19
पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आर्थिक अडचणी संपत असल्याचे संकेत मिळायला सुरुवात होईल. कामाच्या ठिकाणी होणारे बदल चांगल्यासाठी असतील. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. भाऊ-बहिणींचा सहवास मिळाल्याने मन आनंदी होईल. वैवाहिक जीवनात काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
वृषभ – अतिशय सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात होईल. ज्यामुळे अनेक कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जास्त खर्च चिंता वाढवू शकतो. कौटुंबिक आघाडीवर सर्व काही ठीक होईल. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल.
मिथुन – नशिबावर अवलंबून राहून कोणतेही काम करू नका. दिवसाची सुरुवात व्यायामाने केल्याने ऊर्जा वाढेल. आर्थिक स्थिती खराब असल्याने एखादे महत्त्वाचे काम थांबवावे लागेल. जोडीदारासोबतचे वर्तन उत्तम असू द्या. व्यवसायात प्रगती होईल.
कर्क – एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. मुलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवा. याशिवाय जोडीदाराच्याही आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कामात चांगले परिणाम मिळविण्यासाठी कामाची पद्धत एकदा तपासून बघणे गरजेचे आहे.
सिंह – आरोग्य चांगले राहील. मात्र पैशांची कमतरता जाणवू शकते. वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी आजचा दिवस अतिशय योग्य आहे. नवीन प्रकल्प आणि खर्च टाळा. मनात येणारे चांगले सकारात्मक विचार आणि निवडलेले काम यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल.
कन्या – करिअरच्या प्रगतीतील अडथळे दूर होतील. बाहेरच्या कामांमधून फायदा होईल. आर्थिक आघाडीवर चांगली प्रगती होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय उत्तम दिवस. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. घरी पाहुणे येऊ शकतात.
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
तुळ – उर्जेने भारलेला दिवस असेल. जमीन, इमारत आणि वाहन खरेदी शक्य आहे. भावनिक अस्वस्थता त्रास देऊ शकते. त्यामुळे जोडीदाराशी वाद टाळा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी अनपेक्षितपणे उत्तम कामाबद्दल बक्षीस मिळू शकते.
वृश्चिक – विनाकारण होणारी चिडचिड कशी टाळाता येईल, याचा विचार करा. अन्यथा त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. खाण्याच्या सवयींवरही लक्ष ठेवा. वैयक्तिक आयुष्यात एक महत्त्वपूर्ण घडामोड होईल. आर्थिक आणि व्यवसायिकदृष्ट्या दिवस चांगला असेल.
धनु – आर्थिक लाभाचा दिवस आहे. ज्या जातकांनी कोणाकडून पैसे घेतले असतील त्यांना तातडीने ते कर्ज फेडावे लागू शकते. आज एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी दिली जाईल.
मकर – तब्येतीच्या कुरबुरी कमी होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या बाबतीत चांगले प्रस्ताव येतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. ऑनलाइन पेमेंट करताना काळजी घ्या, अन्यथा आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढा आणि जोडीदारासोबत बाहेर जा.
कुंभ – मानसिक शांततेची गरज भासेल. कामाच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या एखाद्या समस्येमुळे ताणतणावात वाढ होईल. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष होईल. भविष्याचा विचार करून केलेली गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते.
मीन – भरपूर सकारात्मक उर्जेचा दिवस असेल. कामाच्या ठिकाणी असणाऱ्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे मानसिक ताण वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य मनोबल वाढवेल. दिवसातला बहुतेक वेळ अशा गोष्टींवर खर्च होईल ज्या तातडीच्या किंवा महत्त्वाच्या नाहीत. त्यावरून जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.
हेही वाचा – आयुर्वेद अन् ऋतुचर्या
दिनविशेष
प्रसिद्ध कथाकार वा. कृ. चोरघडे
टीम अवांतर
प्रसिद्ध मराठी कथाकार वा. कृ. तथा वामन कृष्ण चोरघडे यांचा जन्म 16 जुलै 1914 रोजी नागपूर जिल्ह्यातील नारखेड या गावी झाला. मराठी आणि अर्थशास्त्र हे दोन विषय घेऊन एम्.ए. आणि बी.टी. या पदव्या मिळविल्यावर त्यांनी 1949पर्यंत वर्धा येथील महाविद्यालयात अध्यापन केले. महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाचे संचालक. नागपूर विद्यापीठात 1946 ते 70 या काळात विद्यासभा, कार्यकारिणी आदी वीस समित्यांवर त्यांनी काम केले आहे. गांधीवादाचा त्यांच्या विचारावर प्रभाव होता आणि 1942च्या आंदोलनात त्यांनी तुरुंगवासही भोगला. 1932मध्ये ‘अम्मा’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर पारिजात, प्रतिभा, सत्यकथा, ज्योत्स्ना, कला इत्यादी विविध नियतकालिकांतून त्यांनी कथालेखन केले. सुषमा (1936) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर त्यांचे हवन (1938), यौवन (1941), प्रस्थान (1945), पाथेय (1946), संस्कार (1950), प्रदीप (1954), ओंजळ (1957), मजल (1963), बेला (1964), ख्याल (1973) हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या स्वतंत्र, अनुवादित – संपादित ग्रंथांची संख्या 74 इतकी आहे. माधव सावंत यांच्या सहकार्याने 1943मध्ये त्यांनी एक मराठी-हिंदुस्तानी कोश संपादित केला. 1979मध्ये चंद्रपूर येथे झालेल्या 53व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1954-55मध्ये त्यांच्या प्रदीप आणि पाथेय या कथासंग्रहांना मध्य प्रदेश शासन साहित्य परिषदेचे पारितोषिक मिळाले. 1961-62 साली चोरघडे यांची कथा या संग्रहास महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. संपूर्ण चोरघडे या संग्रहास 1966च्या प्रवासी वंग साहित्य संमेलनात युगांतर पारितोषिक मिळाले. 1 डिसेंबर 1995 रोजी त्यांचे नागपूरमध्ये निधन झाले.