दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 14 एप्रिल 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 24 चैत्र शके 1948; तिथि : द्वादशी 24:12; नक्षत्र : शततारका 16:05
- योग : शुक्ल 15:38; करण : कौलव 12:46;
- सूर्य : मीन; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:55;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
प्रसिद्ध कथाकार द. मा. मिरासदार
टीम अवांतर
प्रसिद्ध कथाकार दत्ताराम मारुती म्हणजेच द मा मिरासदार यांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी अकलूज येथे झाला. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले. नंतर पुणे येथे एम्.ए. झाले. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅम्प एज्युकनेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. 1961पासून ते मराठीचे प्राध्यापक झाले.
सन 1957 सालच्या बापाची पेंड या पहिल्याच कथासंग्रहाने ग्रामीण कथाकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली. त्यांचे हुबेहूब (1960), विरंगुळा (1961), स्पर्श (1962), मिरासदारी (1966), भोकरवाडीच्या गोष्टी (1983) असे 24 कथासंग्रह प्रसिद्ध झाले. या संग्रहातील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ यासारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. अनेकदा त्यांच्या विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचे दिसून येते. तथापि, त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती मिश्किल कथा लिहिण्याकडेच आहे.
हेही वाचा – शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….
सरमिसळ आणि गप्पांगण हे त्यांचे ललित लेखसंग्रह आहेत. त्यांची दिलखुलास लेखनशैली त्यातही प्रत्ययास येते. त्यांनी लिहिलेल्या काही एकांकिका सुट्टी व पाच एकांकिका या नावाने संग्रहीत आहेत. लाडाची मैना (1970) हे त्यांनी लिहिलेले वगनाट्य लोकप्रिय ठरले. जावईबुवाच्या गोष्टी (1980) आणि गाणारा मुलुख (नाटिका – 1969) ही पुस्तके त्यांनी लहान मुलांसाठी लिहिली आहेत.
सुमारे 18 विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. एक डाव भुताचा आणि ठकास महाठक या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. ‘व्यंकूची शिकवणी’ या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरून गुरूकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. द. मा. मिरासदार यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, पुलोत्सव जीवनगौरव’ पुरस्कार मिळाला होता. 1998 साली परळी-वैजनाथ येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते.
मिरासदार हे उत्तम कथाकथनकार होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी कथाकथनांचे कार्यक्रम केले आहेत. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार ही त्रयी 1962 सालापासून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात कथाकथनाचे कार्यक्रम करीत होते. 2 ऑक्टोबर 2021 रोजी मिरसदार यांचे पुणे येथे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस ऊर्जावान आणि उत्साहाने भरलेला असेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने तुमची प्रतिमा उंचावेल. समाजात तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान वाढेल. भावंडांसोबत अनावश्यक वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मालमत्तेसंबंधीचा निर्णय घाईत घेऊ नका, आवश्यकता वाटल्यास जाणकाराचा सल्ला घ्या.
वृषभ – तुमच्या नेतृत्व कौशल्यात आणि वेळेच्या व्यवस्थापनात सुधारणा दिसून येईल. अनोळखी लोक अकारण ढवळाढवळ करणार नाहीत, याची काळजी घ्या. व्यवसाय किंवा गुंतवणुकीसंबंधीचे जुने प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्याला आलेल्या लग्नाच्या प्रस्तावामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल.
मिथुन – आज अनपेक्षित लाभ आणि आनंद मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. पैसे उधार देताना सावधगिरी बाळगा, कारण ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे. राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारल्याने नात्यातील अडचणी दूर होतील.
कर्क – आजचा दिवस संमिश्र अनुभवांनी भरलेला असले. त्याचबरोबर अत्यंत फलदायी असेल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे कामे वेळेवर पूर्ण होतील. भावंडांसोबतचे संबंध सलोख्याचे राहतील. आज व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यासोबत वाटाघाटी होऊ शकते. गुंतवणुकीबाबत घाईने अथवा जोखमीचे निर्णय घेऊ नका. आवश्यकता वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
सिंह – कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. आजचा दिवस छंद आणि मनोरंजनावर खर्च कराल. त्यातून तुम्हाला मानसिक समाधान लाभेल. अनावश्यक वादांपासून दूर राहा. रागातच नव्हे तर चेष्टा करतानाही कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या.
कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आणि सुखद असेल. तुमची ऊर्जा आणि अनुभव तुमच्या कामात फायदेशीर ठरतील. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात सभ्यता राखा. धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. तब्येतीची काळजी घ्या.
तुळ – स्वतःच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. घरातील ज्येष्ठ सदस्यांकडून एखाद्या निर्णयात पाठिंबा मिळेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे गती घेतील. घराची दुरुस्ती किंवा लहानसहान कामे सुरू होऊ शकतात. सर्वांशीच नम्रपणे वागा. काही जुने शत्रू मित्र बनू शकतात, ही घटना तुमच्यासाठी आश्चर्यकारक ठरू शकते.
वृश्चिक – एखादे जुने येणे अनपेक्षितपणे मिळण्याची शक्यता आहे. कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागेल. ज्याच्यावर जास्त विश्वास टाकाल त्याच्याकडूनच धोका दिला जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीही चांगुलपणा सोडू नका. तब्येतीची काळजी घ्या, पथ्ये सांभाळा. जंग फूड खाण्याचे टाळा.
धनु – आजचा दिवस फायदेशीर आणि उत्साहवर्धक असेल. आज धार्मिक कार्यांमध्ये रस वाटेल. संततीला शैक्षणिक किंवा करिअरविषयक परीक्षेत चांगले यश मिळू शकते. आज तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. तुमच्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेऊन नोकरीत बढती मिळू शकते. अनोळखी व्यक्तीला महत्त्वाची माहिती देताना सावधगिरी बाळगा.
हेही वाचा – आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…
मकर – आज संयम बाळगावा लागेल. विचारपूर्वक उचललेली पावले तुमची कामे पूर्ण करण्यास सहाय्यभूत ठरतील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादात यश मिळेल. कुणाकुणाला दिलेली उधारी वसूल करण्यावर भर द्या. अन्यथा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
कुंभ – आज जोखमीचे उपक्रम टाळा. व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. सहकाऱ्यांसोबत अनावश्यक वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकते, त्यामुळे सावध रहा. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याऐवजी फलाहार करण्यावर भर द्या.
मीन – व्यवसायात जोखीम टाळा. अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण न घेता, ते काम कुशलतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मुलाच्या/मुलीच्या करिअरबद्दल काळजी वाटू शकते. आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबासोबत प्रवासाचा बेत आखाल आणि प्रवासादरम्यान व्यवसायाला पूरक महत्त्वाची माहिती मिळू शकते.


