दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 08 ऑगस्ट 2025; वार : शुक्रवार
भारतीय सौर : 17 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्दशी 14:12; नक्षत्र : उत्तराषाढा 14:27
योग : आयुष्मान 28:08; करण : विष्टी 25:51
सूर्य : कर्क; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:17; सूर्यास्त : 19:10
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
नारळी पौर्णिमा
(पौर्णिमा प्रारंभ – दुपारी 02:12)
जिवंतिका पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामाच्या ठिकाणी यश मिळविण्यासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. एखाद्याच्या मदतीने महत्त्वाचे कामही पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही आनंदात असाल. व्यवसायासाठी नवीन योजना कराव्या लागू शकतात. त्याचवेळी काही अडथळ्यांनाही तोंड द्यावे लागू शकते, ज्यामुळे लाभ मिळण्यास विलंब होईल.
वृषभ – कोणत्याही कामात अतिउत्साह आणि अतिघाई करणे टाळा. असे केल्याने, जे काम सुरू आहे, ते देखील बिघडू शकते. काही आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांमुळे त्रास वाढू शकतो. त्यामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे, काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जुन्या मित्रांच्या भेटी होण्याची शक्यता आहे.
मिथुन – आर्थिक बाबतीत अनपेक्षित फायदे मिळू शकतात, समाजात आदरही वाढेल. यामुळे मन आनंदी राहील. परंतु व्यवहार करताना काळजी घ्या, अन्यथा एखादे काम बिघडू शकते. कुटुंबातील समस्या एकत्र बसून सोडवणे योग्य होईल. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.
कर्क – कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फायदे मिळू शकतात. कामाच्या निमित्ताने दूरचा प्रवास करावा लागेल. काही महत्त्वाची कामे प्रलंबित असतील तर ती वेळेत पूर्ण करा अन्यथा नुकसान होऊ शकते. शहाणपणाने निर्णय घेतले तर नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
सिंह – व्यवसायातील सर्व कामे हळूहळू पूर्ण होतील, ज्यामुळे मानसिक ताणतणाव देखील मोठ्या प्रमाणात कमी होईल. व्यवसायात नफा मिळविण्याच्या संधी उपलब्ध होतील. चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे. परंतु खर्च वाढू शकतो. अशा परिस्थितीत, बजेट बनवून पैसे खर्च करणे चांगले.
कन्या – कामाशी संबंधित अनेक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे मन आनंदी राहील आणि बिघडलेले कामही हळूहळू पूर्ण होऊ लागेल. जे काम वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे असेल, त्या कामाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल.
हेही वाचा – Mental Health : मानसिक ताणतणाव
तुळ – व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला असेल. मन लावून काम कराल आणि त्याचा सहकाऱ्यांवरही योग्य परिणाम होईल. समस्या असतील तर त्या आता दूर होतील. काळवेळ याचा अंदाज घेऊन निर्णय घेतल्यास प्रगती कराल. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. डोळ्यांशी किंवा पोटाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी कठीण कामे सहजपणे पूर्ण होऊ शकतात. त्यातून नफा कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. नोकरदार जातकांचा दिवस चांगला जाईल. काही कारणांमुळे डोकेदुखी किंवा मानसिक ताणाचा सामना करावा लागू शकतो.
धनु – वाहन किंवा घराशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत विचारपूर्वक निर्णय घेणे चांगले. व्यवसायात काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे उत्साह वाढेल. मित्रांच्या सहकार्याचाही फायदा होईल. आर्थिक स्तरावर परिस्थितीत सुधारणा होईल. मात्र कुटुंबाशी संबंधित कोणतीही समस्या त्रास देऊ शकते.
मकर – कामाच्या ठिकाणी काही नवीन योजना राबवू शकता, ज्याला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. यामुळे नियोजित कामे पूर्ण होण्यास मदत होईल. विरोधकही माघार घेतील. कुटुंबातील मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्याची देखील आवश्यकता असू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस सामान्य राहील.
कुंभ – आज सगळ्याच प्रकल्पांमध्ये यश मिळू शकते. योजना यशस्वी देखील होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक लाभ मिळविण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. मामाकडूनही काही फायदा होऊ शकतो. जुने मित्र घरी भेटायला येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी विनाकारण कोणावरही संशय घेणे टाळावे लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते.
मीन – दिवस फायदेशीर ठरणार आहे. गोड बोलण्याने आणि वागण्याने कामाच्या ठिकाणी परिस्थिती सकारात्मक ठेवाल. कामात काही समस्या असल्यास ती आता सोडवता येईल. तसेच, काम उरकण्याच्या झपाट्याने विरोधकांना आश्चर्य वाटेल. जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. अशा परिस्थितीत हुशारीने निर्णय घ्यावे लागतील.
हेही वाचा – Emotional scene : खरे अश्रू अन् खोटे अश्रू!
दिनविशेष
कथालेखिका सुमती क्षेत्रमाडे
टीम अवांतर
मराठी कथालेखिका, कादंबरीकार आणि प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिका अशी ओळख असणाऱ्या सुमती क्षेत्रमाडे यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात रत्नागिरी जिल्ह्यातील झापडे या गावी 27 फेब्रुवारी 1916 रोजी झाला. मॅट्रिकच्या परीक्षेत नासिक केंद्रात त्या मराठी विषयात सर्वप्रथम आल्या होत्या. पुढे पुण्याच्या बी. जे. मेडिकल महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची एल्. सी. पी. एस्. ही वैद्यक-शास्त्रातील पदवी मिळविली. 1948 साली त्या वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी आयर्लंडला गेल्या. तिथल्या रोटंडा विद्यापीठाची बालरोग आणि प्रसूतिशास्त्रातील एल्. एम्. ही पदवी घेऊन त्या 1950 मध्ये भारतात परतल्या आणि कोल्हापूर येथे खासगी दवाखाना सुरू केला. वैद्यकीय सेवा करीत असतानाच त्यांनी आपला लेखन-वाचनाचा छंद जोपासला आणि कथा-लेखनास सुरुवात केली. ‘वादळ’ ही पहिलीच कथा स्त्री मासिकात प्रसिद्ध झाली. पुढे स्त्री आणि माहेर मासिकांतून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. कथालेखनानंतर त्या कादंबरीलेखनाकडे वळल्या. या साहित्यिक प्रवासात वीस कथासंग्रह, 15 कादंबऱ्या, कुमार वाङ्मय आणि दोन नाटके प्रसिद्ध झाली. प्रीतिस्वप्न, बीजेची कोर हे कथासंग्रह; महाश्वेता, मैथिली, श्रावणधारा, मेघमल्हार, अनुहार, युगंधरा, वादळवीज, पांचाली, तपस्या इत्यादी कादंबऱ्या तसेच भैरवी तसेच मीच जाहले माझी मृगया ही नाटके, या साहित्यकृती उल्लेखनीय आहेत. युगंधरा या कादंबरीवर दूरदर्शन मालिका प्रसारित झाली आणि ती लोकप्रियही झाली. त्यांच्या महाश्वेता आणि मेघमल्हार या कादंबऱ्यांचे गुजरातीत, तर श्रावणधारा आणि मेघमल्हार यांचे हिंदीत अनुवाद झाले आहेत. त्यांच्या स्वप्न अधुरा या गुजरातीत अनुवाद केलेल्या नाटकाला 1973 साली केंद्र शासनाचा पुरस्कार मिळाला. 8 ऑगस्ट 1998 रोजी त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.