रविंद्र परांजपे
आरोग्य लेखमालेतील पहिल्या लेखात आपण निरामय आरोग्याची गरज समजून घेतली. नंतरच्या पाच लेखांमधून आपण मानसिक आरोग्याचे विविध पैलू विशेषकरून मानसिक ताणतणाव याबाबत सविस्तर माहिती घेतली. मागील लेखात आपण आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे, हे वास्तव जाणून घेतले.
`निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा’, हे या लेखाचे शीर्षक वरकरणी जरा विचित्र वाटेल, कारण आपल्यातील प्रत्येकाच्याच मनात असते की, स्वतःचे आरोग्य निरामय असायला हवे. परंतु प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र दिसून येते. म्हणूनच या विषयावर सखोल विश्लेषण आवश्यक वाटते.
‘निरामय’ आणि ‘आरोग्य’ या दोनही संज्ञा आपण अगोदरच समजून घेतल्या आहेत. आता ‘इच्छा’ या संज्ञेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. इच्छा म्हणजे आशा, अपेक्षा, आस, अभिलाषा, थोडक्यात एखादी गोष्ट हवीशी वाटणे… आणि या लेखाच्या अनुषंगाने, निरामय आरोग्याची आशा-अपेक्षा करणे! आता आपण मूळ विषयाकडे वळूया. यासाठी आपण व्यक्तीच्या आयुष्यातील विविध टप्प्यांचा विचार करणे यथार्थ होईल.
सर्वसाधारणपणे आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज वाटल्यास आपण ती गोष्ट करतो, म्हणजेच थोडक्यात आपल्या मनात त्या गोष्टीची इच्छा उत्पन्न होते. या मुलभूत मुद्द्यावर लेखाचा विषय आधारित आहे.
शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना एकंदरीतच अभ्यास, परीक्षा आणि स्पर्धा या सर्वांचा ताण असतो. शिवाय, आजकाल बहुतांश विद्यार्थ्यांचा दिनचर्येतील स्क्रीनटाइम अधिक असल्याचे दिसून येते. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील आरोग्याविषयी इच्छा केवळ वाटण्यापुरतीच मर्यादित राहते.
हेही वाचा – आरोग्यम् धनसंपदा…
व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षणानंतर नोकरी- व्यवसाय तसेच कुटुंब यांच्याशी निगडित मोठा आणि महत्त्वाचा टप्पा येतो. या टप्प्यात पुरुष तसेच महिला नानाविध व्यावसायिक तथा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असतात. महिला कुटुंबाच्या केंद्रस्थानी असतात. कुटुंबातील सर्वांच्याच आरोग्याची, विशेषतः मुलांच्या देखभाल आणि पालनपोषणाची जबाबदारी घरातील महिला सांभाळत असतात. सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना पुरुष तसेच महिला एवढे व्यग्र असतात की, त्यांचे स्वतःच्याच आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. आयुष्याच्या या टप्प्यात काही कालावधीनंतर पुरुष आणि महिला सुखवस्तुपणा अनुभवायला लागतात. यामुळे देखील आरोग्याकडे कळत-नकळत दुर्लक्ष होते. महिला जर नोकरी आणि घरकाम अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत असतील तर, त्यांना आरोग्याविषयी विचार करायला फुरसतच मिळत नाही. आयुष्यातील या टप्प्यात सर्वच जण निरामय आरोग्य प्राप्तीची अपेक्षा करत असतात. पण बहुतांश बाबतीत अपेक्षेला कृतीची जोड देण्यास पुरेसा वेळ नसल्याने इच्छा अपूर्ण राहतात… त्यांना मूर्त स्वरूप मिळतच नाही.
आयुष्यातील शेवटचा टप्पा म्हणजे निवृत्तीनंतरचा काळ. या काळात आरोग्याबद्दल विशेष आस रहात नाही, परंतु काळजी मात्र वाटत असते. शरीर आणि मन विविध कारणास्तव अपेक्षित साथ देत नाही. यामुळे निरामय आरोग्याची इच्छा असून देखील फारसा उपयोग होत नाही.
हेही वाचा – Mental Health : आबालवृद्धांचे मानसिक ताणतणाव
वरील विवेचनावरून महत्त्वाची बाब लक्षात येईल की, व्यक्ती आयुष्याच्या विविध टप्प्यात निरामय आरोग्य प्राप्तीची इच्छा करत असते, परंतु त्या इच्छेमागील गरज ही तात्कालिक आणि तात्पुरत्या स्वरूपाची वाटत असते. यामुळेच अधिकतर बाबतीत इच्छा मनापासून तसेच प्रबल नसते. (या विधानास काही अपवाद असतीलही, पण दुर्दैवाने त्यांचे प्रमाण कमी दिसून येते.)
तात्पर्य असे की, आपण जर निरामय आरोग्याची कायमस्वरुपी गरज जाणून घेऊन खरोखरच अगदी मनापासून निरामय आरोग्य प्राप्तीसाठी इच्छा केली आणि काहीही कारण किंवा कोणतीही परिस्थिती असली तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न केल्यास इच्छापूर्ती खचितच होईल.
येथे एक समर्पक इंग्रजी उक्ती आठवते : A Will will find the Way.
इच्छा तेथे मार्ग !
क्रमशः
(लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहेत. संकल्पनेतील त्यांची ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही तीन मार्गदर्शनपर माहितीपूर्ण उपयुक्त पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. तसेच यूट्युब चॅनेलवरील उपलब्ध योगा व्हिडीओ देखील खरोखरच उपयुक्त आहेत. पुस्तकसंच घेतल्यास विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना अवश्य संपर्क करावा.)
मोबाइल – 9850856774