Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeशैक्षणिक...आणि वाचनालय सुरू झाले

…आणि वाचनालय सुरू झाले

अर्चना कुलकर्णी

दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरमध्ये मी नोकरी केली. संस्थेच्या अकरा शाळा होत्या. आमचे स्वतंत्र तांत्रिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय 1994मध्ये सुरू झाले. सुरुवातीला संस्थेतील इतर शाळांच्या वाचनालयातून विद्यार्थी तसेच शिक्षकांना पुस्तके मिळत होती. 2005मध्ये मी मुख्याध्यापिका झाले. 2006पासून आमच्या विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी वाचनालयाची सुविधा काही कारणाने बंद करावी लागली.

तांत्रिक विद्यालयाचे विद्यार्थी तसेच कर्मचारी पुस्तकांपासून वंचित राहू लागले. तंत्र व उच्च शिक्षण विभागाच्या नियमांच्या चौकटीत तांत्रिक विद्यालयासाठी स्वतंत्र लायब्ररीयन पदाला मान्यता नव्हती. त्यामुळे वाचनालय आणि लायब्ररीयन हे दोन मोठे प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाले. कुठून तरी छोटीशी का होईना सुरुवात केली पाहिजे, हा विचार आमच्या विभावरी दामले आणि हर्षदा मिश्रा या तांत्रिक विद्यालयाच्या दोन शिक्षिकांनी केला; त्याप्रमाणे एक योजना आखली. इयत्ता आठवी ते दहावीतील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून दर महिन्याला एक रुपया वर्गणी घ्यायची आणि जमलेल्या रकमेतून पुस्तके खरेदी करायची… ती विद्यार्थ्यांकडे योग्य पद्धतीने वितरण करायला द्यायची, असे ठरले. त्याप्रमाणे मराठी साहित्यातील पुस्तके विकत घेतली. अभ्यासाची तसेच पूरक विषयांची पुस्तके आमच्याकडे उपलब्ध होतीच.

हेही वाचा – आशिष…. एक उत्तम विद्यार्थी

पहिल्या महिन्यात जमलेल्या रकमेतील पुस्तकांचे पहिले वाटप झाले. त्या दिवशी आम्ही एक छोटासा समारंभ आयोजित केला. त्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन वाचनालयाची संकल्पना समजावली. या कार्यक्रमात मी या उपक्रमाला 1000 रुपये देणगी दिली. विद्यार्थ्यांचा उत्साह त्यामुळे खूप वाढला. दर महिन्याला छान छान पुस्तके येऊ लागली. त्यांचे रजिस्ट्रेशन आणि सर्क्युलेशन विद्यार्थ्यांच्या मदतीने उत्तम पद्धतीने होऊ लागले. इतर शिक्षकांनीही या उपक्रमाला सर्व प्रकारे सहाय्य केले.

म्हणतात ना, साखरेचे खाणार त्याला देव देणार… त्याच वर्षाच्या शेवटी तंत्र व उच्च शिक्षण खात्याकडून एक परिपत्रक आले; त्यात असा आदेश होत दिला होता की, शैक्षणिक सुविधा, यंत्रसामुग्री आणि त्यांचे मेंटेनन्स तसेच डेव्हलपमेंटसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शास्त्र व्यवसाय शाखेच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून महिना दोनशे रुपये शुल्क आकारावे, त्या रकमेच्या खर्चाच्या नियोजनात लायब्ररीसाठी पुस्तके आणि फर्निचर यांचाही समावेश करण्यात आला होता.

आमच्यासाठी ही खूपच आनंदाची बातमी होती. शालेय शिक्षकांबरोबर कनिष्ठ महाविद्यालय तसेच आयटीसीच्या काही शिक्षकांनी मिळून एक समिती स्थापन केली. या समितीने मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील साहित्यातील वाचनीय पुस्तके तसेच तांत्रिक विषयाला पूरक तसेच आधुनिक तंत्रज्ञानाविषयीच्या पुस्तकांची एक मोठी यादी तयार केली. त्याचबरोबर वाचनालयासाठी आवश्यक फर्निचर म्हणजे कपाटे, टेबल, खुर्च्या शोकेस इत्यादी सामग्रीची यादी आणि त्यासाठी होणारा खर्च याचा तपशील तयार केला. फर्निचरसाठी आम्ही चार पार्टींकडून निविदा मागवल्या.

लायब्ररीसाठी वाढता व्याप लक्षात घेऊन मी एक सविस्तर नोट तयार केली. त्यात विभागवार आणि विषयवार पुस्तकांची मागणी, वाचनालयाची जागा तसेच फर्निचर याची माहिती दिली होती. मुख्य म्हणजे किमान अर्धावेळ लायब्ररीयन नेमणे, त्याची निकड, आर्थिक उपलब्धता या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण केले होते. ही नोट शालेय समितीसमोर ठेवली. त्यात समितीच्या सल्ल्यानुसार योग्य ती सुधारणा करून जागा उपलब्ध करून देणे तसेच अर्धवेळ लायब्ररीयनची नेमणूक करणे यासाठीचा प्रस्ताव संस्थेकडे पाठवला. त्याचबरोबर संबंधित निविदाही संस्थेकडे मंजुरीसाठी पाठवल्या. संस्थाचालकांनी विचारविनिमय करून आमचा प्रस्ताव मंजूर केला. काही अटी व नियम घालून जागा तर दिलीच; पण अर्धवेळ लायब्ररीयनचे मासिक मानधन देण्याचेही मान्य केले. आम्ही अक्षरशः कृतकृत्य झालो!

हेही वाचा – शिक्षा नको, सुसंवाद हवा

पुढील काम जोमात सुरू झाले. दर महिन्याला शैक्षणिक, पूरक, साहित्यिक, आधुनिक तंत्रज्ञान अशा चौफेर विषयांवरील पुस्तकांचा ओघ आमच्याकडे सुरू झाला. थोड्या दिवसात टुमदार वाचनालय सुरू झाले. अर्धवेळ लायब्ररीयनचीही नेमणूक झाली. या सगळ्यांचा विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना खूप उपयोग झाला शाळेच्या दर्शनी भागात, जिथे विद्यार्थ्यांची जास्त ये-जा असते, अशा ठिकाणी भिंतीवर एक मोठी शोकेस लावली. त्यात नवीन खरेदी केलेल्या तसेच पूर्वीच खरेदी केलेल्या पुस्तकांचे परीक्षण लावले जायचे. त्याचबरोबर पुस्तक किंवा त्यांचे मुखपृष्ठ आवर्जून असायचे. दर आठवड्याला ही माहिती बदलली जायची. त्याच्या आकर्षक मांडणीमुळे विद्यार्थी ते आवर्जून वाचायचे, त्यांना नवनवीन पुस्तकांची माहिती व्हायची आणि पुस्तके वाचण्यास विद्यार्थी प्रवृत्त व्हायचे.

यानंतर ‘लेखक आपल्या भेटीला’ हा नवीन कार्यक्रम सुरू करून विभावरी दामले व हर्षदा मिश्रा यांनी अजून एक चांगले पाऊल उचलले. विद्यार्थी व पुस्तके यांची मैत्री करवून देणारे शिक्षक शाळेत असणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!