पूर्वी बहुतांश घरात पानाची पेटी पाहायला मिळायची. त्यांच्याकडे पानाची चंची देखील असायची. कुठे बाहेर प्रवासाला निघाले की, त्यात पान, सुपारी, कात, चुन्याची डबी, लवंग, अडकित्ता वगैरे सर्व सरंजाम त्या चंचीत असायचा. यासाठी पानाच्या गाद्यांना आता हे सर्व जवळपास लुप्त झालं आहे. वस्तुत: विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर पान खाल्ल्याने तोंडाची चव वाढते. पान खाल्ल्याने तोंडातील अनेक जीवाणूंचा प्रभावीपणे सामना केला जातो, ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही. तसेच, दात पोकळी, दात किडणे यांचा त्रास कमी होतो. जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतडी निरोगी राहते. आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही फायदेशीर ठरते.
प्राचीन काळापासून भारतात जेवणानंतर पान खाण्याची परंपरा आहे. मात्र, पान खाणं ही सवय चांगली नाही, यामुळे दात खराब होतात, असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. मुळात विड्याचे पान खाणे ही चुकीची सवय नसून पान खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपली सुटका होते. यात प्रामुख्याने सर्दी, खोकला, फुफ्फुसांशी संबधी आजार दूर होतात आणि अनेक लाभ मिळतात. देशातच काय तर आता विदेशात देखील विड्याचे पान मोठ्या आवडीने खाल्ले जाते.
हेही वाचा – अगं अगं म्हशी… सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना!
विड्याच्या पानांची चव ही तिखट स्वरूपाची असते. परंतु यामध्ये कॅल्शियम (Calcium), प्रोटीन (Protein), खनिज (Minerals), कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates), फायबर (Fiber), व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर प्रमाणात असतात. जे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे आणि अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. (पानामध्ये तंबाखू, गुटखा असे प्रकार टाकू नयेत)
पान खाण्याचे फायदे आणि त्यापासून मिळणारी पोषक तत्वे या विषयावर जो रिसर्च झालेला आहे, तो असे दाखवतो की विड्याचे पान जर बायकोने तयार केले असेल तरच त्याच्यातली सर्व पोषक तत्वे जागृत होतात आणि त्याचा फायदा खाणाऱ्याला पूर्णपणे मिळतो. इतर कोणी पान तयार केले असेल तर फक्त दिखाऊ फायदा होतो, म्हणजे ओठांना आणि जिभेला लाली येते एवढाच पान खाण्याचा फायदा होतो. म्हणून शक्यतोवर बायकोने केलेले पान खाण्यावरच भर असू द्यावा, हेच रिसर्च सांगते.
ही माहिती मी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर बऱ्याच जणांचे मला यावर मेसेज आले, फोन आले – आम्हाला हे फायदे नक्कीच मिळवायचे आहेत, पण बायकोने तयार केलेले पान रोज कसे मिळवावे, हा मोठा प्रश्न आहे, काय करता येईल?
उत्तर खूप सोपे आहे – बायकोला कायम खूश ठेवा.
हेही वाचा – रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…
काही महिलांनी असा प्रश्न विचारला, की विड्याच्या पानाचे फायदे मिळवण्याकरिता बायकोने तयार केलेले पान पुरुषांनी खावे, असे तुम्ही लिहिले आहे. पण मग विड्याच्या पानाचे फायदे मिळवण्याकरिता आम्ही बायकांनी कुणी केलेले पान खावे?
यावर उत्तर असे आहे की, कुणीही तयार केलेले पान स्त्रियांनी खाल्ले तरी त्यांना त्याचे सगळे फायदे मिळतातच. कारण पानामध्ये असलेली सर्व पोषक तत्वे जागृत करण्याची किमया देवाने जशी बायकोच्या हातात दिलेली आहे, तशीच किमया सर्व स्त्रियांच्या मुखी देखील आहे. बघा ना, स्त्रियांच्या आवाजात कायम गोडी असते आणि बोलण्यात कायम प्रेम असतं.
त्यामुळे स्त्रियांकरता पान कुणी केले आहे, हे महत्त्वाचे नसून, त्यांनी रोज पान खाणे हेच महत्त्वाचे आहे.
टीप : आमच्या बागेत विड्याच्या पानांचा वेल आहे. त्यामुळे मी रोज बायकोने तयार केलेले पान खातो. आणि बायको पण स्वतः केलेले पान खाते.


