ठाण्याला रिक्षाच्या रांगेत उभा होतो. संथ गतीने सरकणारी रांग आणि कासावीस जनता, हे रोजचंच दृश्य… माझ्या मागे एक पुरुष आणि पुढे एक स्त्री, मध्यमवयीन. ती मोबाइलमध्ये डोकं खुपसून असल्यामुळे, तिच्या पुढची रांग सरकली हे कळलंच नाही तिला. मधे चार-पाच जणांची रिकामी जागा तयार झाली आणि माझ्या मागचा माणूस म्हणाला, “ओ बाई, जरा पुढे सरका…”
हे ऐकलं आणि ती पुढे उभी असलेली महिला, नागिणीसारखी फुत्कारली… “बाई किसको बोलताय?”
त्या माणसाला काही कळेचना, आपली काय चूक झाली ते.
तो म्हणाला, “तुमको ही बोलताय.” दोघांची मजेशीर बम्बईया हिंदी!
“मैं क्या बाई जैसी दिख रही हूं तुमको?”
मागचा माणूस मराठीत उत्तरला, “आता बाई आहे तर बाई सारखीच दिसणार ना?” आणि यावर दोघं भिडले. मधल्यामधे मी मात्र उगाचच भरडला जाऊ लागलो.
त्या माणसाचं काहीच चुकलं नव्हतं, पण हा फरक थोडासा समज, गैरसमजाचा होता. मराठीत आपण स्त्रीला सर्रास ‘बाई’ म्हणून संबोधतो, पण इतर भाषिक लोकांसाठी बाई म्हणजे ‘मोलकरीण’. हेच संबोधन रुळलेलं सगळीकडे आणि म्हणून तिचा असा गैरसमज, की हा माणूस मला मोलकरीण म्हणतोय… किती हा अधःपात माझा, असं समजून तिने फणा काढलेला!
मनोमन हसू आलं मला, पण हे सगळं तिला समजावायची ती वेळ नव्हती आणि तेवढा मला उत्साहही नव्हता. नेहेमीप्रमाणे थोडीशी चलबिचल, वादावादी झाली, त्या महिलेला रिक्षा मिळाली आणि सगळं शांत झालं… जगण्याच्या पृष्ठभागावरील या लाटा, नेहमीच अनुभवायला मिळतात मुंबईच्या आयुष्यात! त्या विरतातही पटकन, जशा आल्या तशा, कुठलाही मागमूस न ठेवता.
मलाही रिक्षा मिळाली, पण माझं विचारचक्र मात्र धावायला लागलं, पूर्वी विजेच्या मीटरचं चक्र धावायचं तसं. आता डिजिटलच्या युगात कुठलं चक्र आणि कुठलं काय! तशी, ‘बाई’ ही संज्ञा मराठी भाषेत अगदी वेगवेगळ्या रूपात वापरली जाते. बालवर्गात असताना, शिक्षिका म्हणजे ‘ताई’ असायच्या. पहिलीत गेल्यावर त्या ‘बाई’ व्हायच्या, अगदी नकळत. त्या बहुतेक, सातवीपर्यंत तशाच राहायच्या आणि आठवीत त्या अचानक, ‘मॅडम’ हे भारदस्त संबोधन लेऊन यायच्या. त्यांना ‘बाई’ म्हटलं तर कोण राग यायचा. जणू एक पायरी खाली उतरवलं असावं कुणीतरी, असा आविर्भाव. आम्ही पण मग ‘मॅडम’ना रुळायचो आणि ‘बाई’ हद्दपार व्हायच्या मनातून…
हेही वाचा – दिनचर्या… तिची अन् त्याची!
हल्ली याच बाई, शाळेत ‘मिस’ म्हणून दर्शन द्यायला लागल्या आणि ‘बाई बाई, तिने मला मारलं…’, ‘त्याने माझे केस ओढले…’ वगैरे लाडीक तक्रारी नामशेष झाल्या. हल्लीची मुलं, या तक्रारी कशा करतात याचा अनुभव त्या शाळेत जाऊनच घ्यायला हवा.
बायकांच्या बोलण्यात तर ‘बाई’ हा शब्द अगदी साजरा होऊन येतो. ‘बाssssई’ म्हटलं की, अतोनात आश्चर्य ध्वनित होतं.
‘बाssssई, किती तो चावटपणा…’ म्हटलं, की नवरोबांची दांडी गुल झालीच म्हणून समजा. तोंडावर हात ठेवून, नुसतंच ‘बाssssई!!’ हे तर कुठेही लागू पडतं, अगदी कुठल्याही प्रसंगाला! लडिवाळपणाचा कहर.
तसंच, मला ‘बाई’ आवडते पैठणी, मला ‘बाई’ आवडतो शालू, मला ‘बाई’ आवडतं गप्पा मारायला, हे तर अतोनात जीवघेणं. यात ‘बाई’ या शब्दाची जागा दुसरा कुठलाच शब्द घेऊ शकणार नाही, हे मी अगदी छातीठोकपणे सांगू शकतो. या ‘बाई’च्या उच्चारात जी नजाकत असते, ती दुसऱ्या कोणत्याही शब्दात नसते, हे मात्र अगदी नक्की. विड्यात कात जी महत्त्वाची भूमिका निभावतो, नेमकी तीच भूमिका या वाक्यात ‘बाई’ने निभावलेली असते. रंग खुलवण्याची आणि खुळावण्याची!
काही जणी, हाच उच्चार नाजूक ‘बै’ असा करतात… तो तर अतीव जानलेवा!! अगदी काळजात कट्यार घुसवणारा. हा ‘बै’ म्हणजे साध्या, नुसत्या ‘बाई’वर कडी असते. अमिट ठसा उमटवणारी, हृदयात कळ आणणारी शब्दकळा.
लताबाईंचं, ‘बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला’ ऐकताना आणि त्या गाण्यात जयश्री गडकर यांचे विभ्रम बघताना, या दोन्ही बाया, ‘बाई’ या शब्दाला अगदी वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. आपल्या मनमोराचा पिसारा फुलवीत. गोड वाटतं, पाहायला आणि ऐकायला.
हेही वाचा – मारवाडी…
निळू फुलेंचं, “बाई, वाड्यावर या” ऐकलं, की मात्र तळपायाची आग मस्तकात जाते, हे कोणीही मान्य करेल. यात ते वाक्य फेकण्याची त्यांची लकब मात्र दाद देण्यालायक, चीड आणणारी. त्यांच्यातल्या अस्सल कलाकाराला हे अगदी गौरवास्पद.
‘अगं बाई, अरेच्चा’ म्हणत तसाच एक चित्रपट धमाल उडवून देतो आणि ‘अग्गो बाई, ढग्गो बाई’ म्हणत कोणी एक सलील कुलकर्णी आपल्या काळजाला हात घालून जातो आणि बालपणाची सैर घडवून आणतो. याच बाया, जेव्हा ‘बाईपण, भारी देवा’ म्हणत पडद्यावर धुमाकूळ घालतात तेव्हा, खरंच बाईपण ही दैवी देणगी आहे हे पटत राहतं. ‘रूसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू’ असं म्हटल्यावर, रुसलेल्या परीच्या गालांवर आणि नकट्या नाकावर फुललेलं हसू म्हणजे आईसाठी अगदी जीवनामृतच जणू!
मागच्या पिढीत, आत्या, काकू यांना आत्याबाई, काकूबाई तर मोठ्या वहिनीला नुसतंच ‘बाई’ म्हणायची प्रथा होती. कालांतराने ही प्रथाही बाद झाली, तरी ‘बाई’ या संज्ञेभोवती असलेलं वलय मात्र अबाधित राहिलं, तसंच.
रिक्षाच्या रांगेत उभं असताना, त्या बाईचा, ‘बाई’ म्हटल्यावर जाणवलेला फणकारा, या सगळ्या बाईपणाच्या आठवणी जागृत करून गेल्या. अचानकच, हे बाईपण, वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या काळाच्या स्मृती उजागर करून गेलं, सुखावह भावना जागवत!


