हर्षा गुप्ते
आवळा हे अतिशय गुणकारी फळ मानले जाते. आवळ्यात पाणी (81%), प्रथिने (0.5%), स्निग्ध पदार्थ (0.1%), क्षार (0.5%), कर्बोदके (13-14%) आणि तंतू असतात. आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर असते. तसेच त्यामध्ये अ, ब जीवनसत्त्वे आणि लोह, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादींची संयुगेही असतात. मधुमेह, खोकला, श्वासनलिकादाह, दमा, कावीळ, त्वचारोग, केस अकाली पांढरे होणे आणि इतर अनेक रोगांवर आवळा गुणकारी ठरतो. हिरडा आणि बेहडा या फळांच्या सालीबरोबर आवळकाठीची पूड मिसळून ‘त्रिफळा चूर्ण’ तयार करतात. या आवळ्यापासून त्यापासून लोणचे, मुरांबा (मोरावळा), सुपारी इत्यादी पदार्थ करतात. आपण आज आवळा कँडीची रेसिपी पाहणार आहोत.
एकूण कालावधी – अर्धा तास
साहित्य
- आवळे – अर्धा किलो
- साखर – 1 वाटी
- काश्मिरी लाल मिरची पावडर – 1 चमचा
- सुंठ पावडर – 1 चमचा
- चाट मसाला – 1 चमचा,
- कॉर्न फ्लोअर – 1 चमचा
- साजूक तूप – 1.5 चमचा
- अर्धे लिंबू
- मीठ – चवीनुसार
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट शेंगा डाळ अन् मिस्सी रोटी
कृती
- सगळे आवळे स्टीमर किंवा कुकरमध्ये वाफवून घ्यावेत.
- थंड झाल्यावर त्याच्या पाकळ्या सुटून येतात. त्या सगळ्या पाकळ्या मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्या.
- साधारण वाटीच्या मापाने ही आवळ्याची पेस्ट आणि साखर घ्यावी. म्हणजे, एक वाटी आवळ्याची पेस्ट असेल तर, तेवढीच वाटी भरून साखर कढईमध्ये घ्यावी.
- यात आता एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, सुंठ पावडर, चाट मसाला, तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करा.
- आता गॅस सुरू करून मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण परतत रहा.
- मग एक चमचा कॉर्न फ्लोअरमध्ये थोडंस पाणी घालून ती पेस्ट कढईमधल्या मिश्रणात घाला.
- अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचाभर साजूक तूप घालून छान परतून घ्या.
- आता एखाद्या ताटाला तूप लावून ते गरम मिश्रण ताटामध्ये सेट करा.
- ते गार होऊन सेट झालं की, त्याच्या वड्या पाडा. क जीवनसत्व असलेल्या या गुणकारी आवळा कँडी खूप काळ टिकतातही.
हेही वाचा – Recipe : ही कोथिंबीर वडी करून पाहा…
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.


