Thursday, January 15, 2026

banner 468x60

Homeललितसुनंदा अक्का अन् पेरूचं झाड…

सुनंदा अक्का अन् पेरूचं झाड…

चंद्रकांत पाटील

आमचा वाडा नदीला जायच्या वाटेवर होता… वाड्याच्या समोरच्या गल्लीला ‘खालची आळी’ असे म्हणत. तिथे दोन-तीन पाटलांची घरे पुढे साळुंखे, मोरे, बाजूला देशपांडे, कुलकर्णी आणि शेवटी सुनंदा अक्काचे घर… त्यापुढे रस्ता लहान बोळवजा होई आणि मेन रोडला मिळे. त्या बोळात शेवंता काकू आणि मुक्ता अक्का या सुनंदा अक्काच्या मैत्रिणी राहात… सुनंदा अक्का म्हणजे तब्येतीने मजबूत, उंचीपुरी, डोक्याचे निम्म्याला अधिक पांढरे झालेले केस, मोठाले डोळे, पसरटनाक आणि पुढचे दोन दात किंचित बाहेर आलेले… अक्का गल्लीतून हिंडायला लागली की, लहान मुलेच काय पण, मोठी माणसे देखील टरकून असायची… असा अक्काचा दरारा होता!

अशी ही अक्का नवरा वारल्याने घरात एकटीच असे. अक्काचे घर तसं ऐसपैस होतं. घराचा दरवाजा मोठा होता. आत गेलं की, तिथं एक पत्र्याची खोली त्याच्या समोर मोकळं अंगण आणि पत्र्याच्या खोलीला बरोबर काटकोनात लांब असा हॉल… पुढे त्याला काटकोनात स्वयंपाकघर आणि पाठीमागे परसदार… त्याच्या पाठीमागे बरोबर तेवढ्याच जागेत रामूदादा म्हणजे अक्काच्या दीराचं घर… म्हणजे अक्काच्या घरात शिरलेला माणूस डायरेक्ट रामूदादाच्या घरातून पलिकडच्या मेन रस्त्यावर निघायचा, एवढी प्रचंड जागा!

अक्काच्या स्वयंपाकघराला एक उभी विट बसेल एवढे होल होते. म्हणजे अक्का चुलीसमोर बसून काही करत असेल तर, त्या खोबणीतून बघितले की बास… पुढील दरवाजापर्यंतचा सर्व परिसर नजरेत यायचा…

अक्काच्या नवऱ्याला झाडे लावण्याचा खूप आवड असावी. त्यामुळे अक्काच्या अंगणात बरीच झाडे होती कढीपत्ता, लिंबू, चिक्कू, पेरू इत्यादी… परंतु नवरा वारल्यानंतर झाडाची बरीच आबाळ झाली आणि पुढे एकच झाड शिल्लक राहिले ते पेरूचे झाड! झाड बरेच मोठे आणि बर्‍यापैकी पसरलेले होते. काही फांद्या पलीकडच्या घरावर गेलेल्या होत्या. साधारणपणे, दिवाळीनंतर झाडाला पेरू लागायला सुरुवात व्हायची. झाडाला पेरू इतके लागत की, पानं दिसायची नाहीत! या झाडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही पेरू, पाडाला आलेला नसला तरीसुद्धा, अतिशय चविष्ट लागत असे. झाडाला पेरू लागले की अक्काचे टेंशन वाढे. दारातच काठी घेऊन बसलेली असे… येणारी जाणारी मुले, भिकारी, माकडे इत्यादीचा खूप त्रास…

हेही वाचा – एका लग्नाची पुढची गोष्ट…

एकदा तर असा सीन होता की, झाडावर तीन माकडे आणि खाली पाच कुत्री! कुत्री वर बघून माकडावर चवताळून जात होती आणि माकडे वरून वाकुल्या दाखवत होती… आणि अक्का घरातूनच काठी आपटत होती. कोण कोणाला दाद देत नव्हते. याला अपवाद मात्र एक होता… सायंकाळी पोपटाचा थवाच्या थवा झाडावर विसावत, असे अक्का त्यांना कधी हुसाकून लावत नसे. कारण त्यांची मंजुळ किलबिलाट अक्काला खूप आवडत असे!

अक्का सोवळं ओवळं खूप पाळत असे. अक्का दररोज साधारण अकरा वाजता नदीवर आंघोळीला जात असे. आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक देवपूजा करत नसे. नदीवरून येताना खूप अप-टू-डेट असे दुटांगी साडी, कमरेवर धुतलेल्या कपड्याची घडी, डोक्यावर घासून चकाचक केलेली तांब्याची भरलेली घागर… येताना रामरक्षा किवा गायत्री मंत्र म्हणत येत असे. वाटेत कुठेही शिवाशिव होऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेकडेने घरी येई. त्यातून कोणी आडवा आलाच तर मात्र त्याची खैर नसे! अशावेळी ती बोलत नसे, नुसत्या डोळ्यांनी आणि हातवारे करून आपला निषेध नोदवी. अक्काच्या आंघोळीची वेळ आजूबाजूच्या लोकांना माहीत असल्याने, त्या दरम्यानच बरेच पेरू शेजारी-पाजारी हडप करत असत. त्यामुळे अक्काला त्या झाडाचा फायदा कमी आणि मनस्तापच जास्त होत होता.

मी आणि माझा मित्र पक्या आम्ही दररोज त्या घरासमोरून शाळेत जात असे… खूप वेळा वाटे की, एकादा तरी पेरू खायला मिळावा, पण अक्काकडे मागून मिळणारी ती गोष्ट नव्हती. त्यामुळे मन मारत राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते…

पण एके दिवशी आक्रित घडले… त्या दिवशी गुरूजींनी वर्गात छत्रपती शिवाजी महाराजांची ‘सुरतेची लूट’ हा धडा रंगवून सांगितला होता. त्यातून स्फूरण घेऊन आम्ही एका रविवारी अक्काच्या पेरूची लूट प्लॅन केली! दुपारी बारा-एकच्या दरम्यान पक्या आणि मी अंदाज घेत अक्काच्या घरात शिरलो… मी झाडावर चढलो पक्या खाली बाजूला उभा राहिला. मी वर चढून काही पेरू खाली पक्याकडे फेकले असतील नसतील, तोवर अक्काची आरोळी ऐकू आली… “कोण आहे रे?”

कोण बोलत नाही म्हटल्यावर, अक्का काठी घेऊन बाहेर आली… तोवर पक्या पळाला… मी खाली उतरेपर्यंत अक्का जवळ येऊन पोहचली. पळण्याच्या गडबडीत माझा शर्ट फाटला आणि काठीचा मार चुकवता चुकवता एक निसटता दणका ढुंगणावर बसला…

असेच दिवस चालले होते. अक्काचंही वय होत चाललं होतं. देवा-धर्माची ती खूप करायची. ती सर्वांना सांगायची की, “एकदा काशी आणि चारधाम केले की, मी डोळे मिटायला मोकळी.” …आणि झाले ही तसेच! बोलाफुलाला एकच गाठ पडली… त्याचं असं झालं की, सांगलीमध्ये राहणाऱ्या लेकीला तिची ही इच्छा माहीत होती आणि तिला पण वाटत होते, आईने आपल्यासाठी खूप केलंय आणि माझ्याशिवाय तिला कोण आहे? म्हणून तिने नवर्‍याच्या मागं लागून तिच्यासाठी ट्रिप बुक केली आणि तसा निरोप धाडला… ‘आम्ही ट्रिप बुक केली आहे. पुढच्या पंधरवड्यात तुला उत्तर भारताच्या ट्रिपसाठी जायचे आहे!’

तसा अक्काला खूप आनंद झाला आणि ती तयारीला लागली… पण तिला पेरूच्या झाडाचे काय करायचे, हे सुचेना! मग एक दिवस मुक्ता अक्काच्या घरी गेल्यावर अक्काने हा विषय काढला… “मुक्ता, अगं मी चालले गं काशीला, पण त्या झाडाचं काय करू?”

मुक्ता अक्का जरा विनोदी होत्या, त्या म्हणाल्या, “ने जा की, पाठीला बांधून!”

“अगं, मी खर्‍यानं बोलते तर तू माझी चेष्टा करत्यास हुई?” अक्का म्हणाली. त्यावर मुक्ता अक्का म्हणाली, “अगं अक्का, एवढं जन्माच्या पुण्याईचं काम करायला निघालीस आणि पेरवाचं काय घेऊन बसल्यास? खाऊ देत की सारीजण… यंदाचं वरीस, लोकांच्या तोडांत पेरू पडला तर तुला पुण्याईच लागंल नव्हं!”

त्यावर अक्का म्हणाली, “अगं तसं नव्हं मुक्ता, आपण नसल्यावर घराकडं कोण बघणार? नाई म्हटलं तरी, घरात धन, धान्य, कपडालत्ता हाईच की… तेचं काय हुईल? मला याला महिना, दोन महिनं तरी लागतीलच की!” अक्काचा पॉइंट नाही म्हटलं तरी, जरा काळजीचा होता. त्यावर शेवंताकाकू अधिकारवाणीने म्हणाल्या, “हे बघ अक्का, मी एक सांगू का तुला… पटतंय का बघ…  घर भाड्यानं देऊन जा. म्हंजी पेरूपण राहतील आणि घरावर नजर पण राहील. शिवाय भाडं पण मिळंल!”

हेही वाचा – बहुरुपी गुलब्या

त्यावर अक्का म्हणाली, “तुझं खरं हाय गं काकू, पण कोण घेईल गं भाड्यानं? कोनतरी नोकरीवालाच बघायला पाहिजे… म्हणजे या गावात नोकरी हाय, पण त्येला घर नाय, असं कोण हाय का आपल्या गावात?”

असा विचार करत एक आठवडा निघून गेला आणि अचानक एके दिवशी पहाटे एक गुरखा अक्काच्या घरासमोर ‘जागते रहो’ म्हणत येऊन उभा राहिला. “अक्का तुमचे घर भाड्याने देणार आहे, असे मला समजले,” असे तो म्हणाला. अक्काचा आनंद गगनात मावेनासा झाला… जणू ‘काशी विश्वेश्वरा’नेच माझी हाक ऐकली आणि गुरखा पाठविला, असे तिला वाटले.

“हो, देनेका है…” म्हणत अक्काने त्याला घरात नेलं… दोन रव्याचे लाडू दिले, चहा दिला आणि 50 रुपये भाडे सांगितले. परंतु गुरखा म्हणाला, “मैं इतना दे नहीं सकता. मेरा कोई पगार नहीं हैं, लोग जो देते हैं, उससे घर चलाता हूँ…” अक्का म्हणाली, “बरं बाबा, किती देतोस?” तो म्हणाला, “20 रुपया दे सकता हूँ.”

“ठीक हाय… कलसे आना..”

…आणि भाडेकरू फायनल झाला. अक्कानी विचार केला भाडे महत्त्वाचे नाही तर, पेरवाचे झाड आणि घराकडे लक्ष राहील… या हिशोबाने सौदा फायनला झाला. अक्कानी त्याला महत्त्वाच्या सूचना देऊन पाठवून दिलं.

अक्का जाऊन महिना झाला असेल नसेल… एके दिवशी गुरख्याच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता आणि बरीच मंडळी जमली होती. त्यात त्याचे बरेच नातेवाईक वगैरै आले होते. त्यामुळे नॉन-व्हेज जेवण, दारूकाम इत्यादी भरगच्च कार्यक्रम झाला. कार्यक्रम रात्री बराच वेळ चालला होता, त्यामुळे गल्लीतला लोकांना समजला होता!

पुढे अक्का दोन महिन्यांनी परत आली. एकदम खूश होती. गल्लीत सगळ्यांना भेटत होती, काशी विश्वेश्वराचा प्रसाद सगळ्यांना देत होती… प्रसाद देत देत शेवटी मुक्ता अक्काच्या घरी गेली. प्रसाद वगैरे दिल्यावर अक्का म्हणाली, “झालं बाई एकदा गंगेत आंघोळ केली. आता एक कार्यक्रम तेवढा राहीलाय ‘काशी उजिवली’ की झाली बघ मी मरायला मोकळी…”

त्यावर मुक्ता अक्का म्हणाली, “अक्का कशाची काशी उजिवत्यास आणि काय! अगं, तुझ्या घरात त्यो गुरखा ठेवलास का नाही, त्येनं आधीच काशी उजिवल्या!”

“अगं, मुक्ता काय म्हणत्यास जरा ईस्काटून सांग…” अक्का म्हणाली.

“अगं, काय सांगू तुला माझ डोबंल? अगं, त्येनं घर पार इटाळून टाकलंय बघ.”

“म्हंजी?”

“अगं, तू गेल्यावर त्या गुरख्याने दारू- मटणाची पार्टी केली. पेरवाच्या झाडाला बकरं बाधलं होत. मटनाचा वास गल्लीभर घुमत होता. सगळ्या अंगणात हाडं पसारल्याती सगळं घर ईटाळलंय.”

हे ऐकून अक्काचे मस्तकच फिरलं आणि एका रात्रीत गुरख्याची हाकालपट्टी झाली… दुसऱ्या दिवशी झाड तोडायला माणसे बोलावली…


मोबाइल – 9881307856

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!