नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला!
माझ्या एका मित्राने मला एक सामाजिक जागृतीचा इव्हेन्ट आहे, तिथे गेस्ट म्हणून येशील का? असं विचारलं. मी ‘हो’ म्हटलं.
बोरिवलीला नॅशनल पार्कमध्ये मॅरेथॉन स्पर्धा होती… कशासाठी? आत्महत्यामुक्त समाजासाठी (Suicide Free society)! मागच्य लेखात मी एका मुलीच्या आत्महत्येबद्दल सांगितलं होतं. आता पुन्हा एक काय अनेक आत्महत्या माझ्यासमोर येऊन उभ्या ठाकल्या होत्या. एका मुलाने नैराश्यातून आत्महत्या केली… आठवड्याभरात त्याच्या गर्लफ्रेंडने पण आत्महत्या केली. जीव देणं म्हणजे काय गम्मत वाटते का? कधीही उठाव अन मरून जावं. 15-20 हे वय काय मरायचं असतं का? अपघाती मृत्यू, आजारी पडून आलेला मृत्यू चटकाच लावून जातो, मग हा आत्महत्या किती त्रासदायक असू शकेल हे मेलेल्या व्यक्तीला कसे कळावे?
तर, ही मॅरेथॉन समाजाला जागृत करण्यासाठी होती. ‘अरे, नका मरू रे आत्महत्या करून…’ असे घसा फोडून सांगण्यासाठी होती. असे दुर्दैवी मृत्यू घडू नये म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून बऱ्याच जणांनी यात भाग घेतला होता. पण, तिथे बरीच अशी माणसं हजर होती की, ती मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायला नव्हती आली. मग ही एवढी माणसं का बरं तिथे उपस्थित होती?
काळीज पिळवटणारं उत्तर मिळालं की, या सगळ्यांच्या मुलांनी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळलं होतं. एकेकाच्या कथा, हो कथाच त्या, ऐकून मला रडू आवरत नव्हतं. किती ते अभागी आई-वडील! स्वत:चं लेकरू गमावल्याचं दु:ख बाजूला सारून ते सगळे उभे राहिले… समाजात अजून आत्महत्या घडू नयेत म्हणून! कित्येक मुलांनी तर, ‘मोबाइल बाजूला ठेव आणि अभ्यासात लक्ष दे,’ आई असं म्हणाली म्हणून त्यांनी आत्महत्या केली! काय हा अतिरेक?
हेही वाचा – Appeal : टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी…
कोविडमध्ये तर कितीतरी नावारुपाला न आलेल्या छोट्या-छोट्या कलाकारांनी स्वत:ला संपवलं. कोविडमुळे अन्नान्न दशा झाली होती, एकेकाची! मी बऱ्याच जणांना समजावलं की, असे मृत्यूला कवटाळू नका. असे विचार येत असतील तर, आधी माझ्याशी बोला… मी कितीतरी जणांना आत्महत्येपासून परावृत्त केल्याचं मला समाधान आहे.
तुमच्या आजूबाजूलाही अशा घटना घडत असतील. डोळे उघडे ठेवा. कोणालाही असे दुर्दैवी मरू देऊ नका. आपण ज्या समाजात राहतो, जगतो, वावरतो त्याचं काही देणं लागतो. आपल्या समाजाला या दुर्दैवापासून वाचवणं हे आपलंच कर्तव्य नाही का?
For
Suicide Free society
हेही वाचा – Swami Samarth : स्वामी अन् मुंगळा…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.