चंद्रशेखर माधव
सुमारे 22-23 वर्षांपूर्वीची गोष्ट असावी. विजय दादाचे लग्न नुकतच झालेलं होतं. लग्न झाल्या झाल्या दादा औरंगाबादला एका कंपनीमध्ये रुजू झाला. सोनाली वहिनीची नोकरी ऑडिटिंग कंपनीत असल्यामुळे औरंगाबादच्याच एका कंपनीमध्ये ऑडिटला जाण्याकरता तिने पुण्यातून बदली करून घेतली. दोघेही औरंगाबादला स्थिरावले.
त्याकाळी मी व्यवसाय करत होतो. काही महिने गेल्यानंतर दोन-तीन दिवस औरंगाबादला सुट्टीवर जावं, असं माझ्या मनात आलं. बसनेच गेलो. दोन-तीन दिवस निवांत राहणार होतो, आराम करण्याकरिता. संध्याकाळच्या वेळी पोहोचलो.
दादा आणि वहिनी दोघेही सकाळी साडेसात-आठ वाजताच घर सोडत असत. मला तिथे बाकी काही काम नव्हतं आणि घरातही मी दिवसभर एकटाच असल्याने एकूणच मजेत जाणार होते, ते दोन-तीन दिवस.
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनाही कामावर जायचं होतं, मी आरामात झोपलो होतो. अर्धवट झोपेतच मला वहिनीचा आवाज कानावर पडला, “शेखर, मी तुझ्या दुपारचं जेवण सगळं बनवून ठेवलंय बरं का! तुला जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवून घे. संध्याकाळी आम्ही आलो की, आपण जेवणाचा काहीतरी बेत करू.”
हेही वाचा – राजमाची येथील चकवा!
वहिनी ऑफिसला गेली, मी अर्धवट झोपेत उठलो दाराला कडी लावून घेतली आणि परत झोपलो. थोड्या वेळानंतर उठून, आवरून जरा बाहेर पाय मोकळे करून बाराच्या सुमारास परत आलो. घरी परतलो तेव्हा कडाडून भूक लागली होती, जसा घरात प्रवेश केला तसं सकाळचं वहिनीचं वाक्य आठवलं…
स्वयंपाकघरात गेलो, स्वयंपाकघरात टेबलवर एक झाकलेले ताट होतं. ताट उघडलं आणि पाहिलं तर, ताटामध्ये तीन-चार पोळ्या, थोडासा भात, एका वाटीमध्ये आमटी, एका वाटीमध्ये भाजी आणि थोडीशी कोशिंबीर हे सगळं, पद्धतशीर ताट वाढल्याप्रमाणे, वाढून ठेवलेलं होतं.
ते सगळं बघून मला एकदम सुखावह वाटलं… वहिनीचं वय माझ्यापेक्षा जेमतेम एक वर्ष जास्त आहे. म्हणजे, त्यावेळी तिचे वय अंदाजे 26 किंवा 27 होतं. पटकन ताट पुढे ओढले आणि जेवून घेतलं. खरंच समाधान वाटलं! इतकी वर्ष झाली, पण ते ताट अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे आणि हा प्रसंग कायमचा माझ्या मनावर कोरला गेला आहे.
तिच्याकरिता कदाचित ती कृती फार छोटी होती, पण माझ्यादृष्टीने फार वेगळी होती…
हेही वाचा – एक असाही ‘वाम मार्ग’