चंद्रशेखर माधव
स. प. महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असतानाची राजमाची येथील घटना. साल सुमारे 1995 किंवा 1996 असावं. आम्हा तीन मित्रांचा राजमाचीला जाण्याचा बेत ठरला. शनिवारी निघायचं आणि रविवारी संध्याकाळी घरी परत यायचं असा प्लॅन आखला.
जाणारे आम्ही तिघेच होतो, त्यामुळे निघतानाच उशीर वगैरे होण्याची शक्यता नव्हती. सकाळी सकाळी लोणावळा लोकल पकडली. लोणावळ्याला उतरल्यावर चालायला सुरुवात केली. जून-जुलैच्या आसपासचे दिवस होते. पाऊस खूप पडत होता. साधारण संध्याकाळ 4 वाजेपर्यंत राजमाची गावात पोहोचलो. पोहोचल्यावर तिथे गावातच एक घरात मुक्कामाची सोय करुन घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर दोन्ही किल्ले पाहण्याकरिता बाहेर पडलो. आमचा यजमान चांगला होता. आम्ही किल्ल्यावर जातोय म्हणण्यावर आमच्यासोबत त्याने खंड्या या श्वानाला पाठवलं.
हेही वाचा – कोराईगडचा ट्रेक
हा श्वान चपळ होता. त्याने व्यवस्थितपणे आम्हाला मनरंजन किल्ल्यावर जाण्याची वाट दाखवली. सर्व किल्ला फिरून झाल्यावर दुसऱ्या किल्ल्यावर सुद्धा आमच्यासोबतच आला. वातावरण पावसाळी होतं. हवेत भरपूर गारवा होता. अधून मधून पावसाच्या सरी येतच होत्या.
अशातच आम्ही दुसऱ्या किल्ल्यावर पोहोचलो. जरा कुठे किल्ला फिरून होत नाही, तोवरच अचानक मोठ्या प्रमाणावर ढग पसरले. अवती भवतीचे काहीच दिसेनासे झाले. आम्ही तिघेही जवळपास दहा ते पंधरा मिनिटे होतो, तिथेच उभे राहिलो. थोड्या वेळाने एका मित्राने खंड्याला एक दोन हाक मारल्या, पण प्रतिसाद आला नाही.
जसा जसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता, तशी आमच्या तिघांची अस्वस्थता वाढत होती. शेवटी एकदाचे ढग अन् धुकं सरलं. तसं आम्ही खालचे गाव नेमके कोणत्या दिशेला आहे, याचा शोध घेतला आणि खाली जायची वाट सापडते का, ते पाहू लागलो. गाव आणि आम्ही मुक्काम केलेलं घर दिसत होतं, पण पायवाट नेमकी कुठून खाली जाते, ते काही केल्या आमच्या लक्षात येईना. आम्ही दोन ते तीन वेळा गडाची संपूर्ण परिक्रमा केली पण छे…. वाट सापडायचं नाव नाही.
अचानक माझ्या मित्राला एक कल्पना सुचली. त्याने खिशातून रुमाल काढला अन् तटबंदीच्या जवळील एका झाडाला बांधला. मला म्हणाला “चल, इथून परत एक फेरी मारू. परत इथेच आलो की, आपल्याला कळेल चकवा लागला आहे म्हणून.”
आम्ही शोधकार्य सुरू केलं. नशिबाने पावसाने कृपा केली होती अन् ढग आणि धुकं नव्हतं. रुमाल खूण म्हणून बांधल्यानंतर दुसऱ्या फेरीच्या वेळी आम्हाला एकदाची खाली जाणारी वाट सापडली. तटबंदीच्या आडून वाट खाली जात असलेलं लक्षात आलं… आणि एकदाचा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.
हेही वाचा –
अर्ध्या तासातच आम्ही पुन्हा मुक्कामाच्या घरात पोहोचलो. बघतो तर खंड्या आरामात ओसरीत बसला होता. आम्हाला पाहताच शेपटी हलवून आमचं स्वागत वगैरे केलं. त्याचा तोरा बघून आम्हीही जरा निवांत झालो. आतापर्यंतचा सगळा ताण निघून गेला. पण त्या गडावर वाट शोधताना आमची झालेली तारांबळ मात्र कायम स्मरणात राहिली.