Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सहवास

    October 10, 2026

    बाई बाई… बाईपण

    October 10, 2026

    सप्तधान्य अन् घटस्थापना

    October 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, October 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सहवास
    ललित

    सहवास

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करOctober 10, 2026No Comments10 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रदीप केळुस्कर, लेखक प्रदीप केळुसकर, चिकित्सक सुमन मावशी, माणूसघाणी सुमन मावशी, उषाकडून सुमन मावशीची सेवा, उषा आणि नंदा, गुणी मुलगी नंदा, गोड आवाजाची नंदा, सुमन मावशीतील बदल, सुमन मावशीचा उषाशी स्नेहबंध, सुमन मावशीचा नंदाशी स्नेहबंध, सहवास
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मी सुमन मावशीच्या प्लॅटमध्ये बसलो होतो. ऑर्थोपेडिक सर्जनकडे मावशीला न्यायचे होते. तिच्या गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागणार होते. घरी मावशी एकटी. तिचे यजमान चार वर्षांपूर्वी देवाघरी गेले. त्यांना मुलबाळ नव्हते. मावशीचे यजमान मोठ्या कंपनीत नोकरीला होते, मावशी शिक्षिका म्हणून निवृत्त झाली होती. मुंबईतील ही अख्खी बिल्डिंग त्यांची होती. भरपूर भाडे येत होते. खूप संपत्ती होती, पण पैसे खर्च करणे तिच्या जीवावर येई. प्रत्येक रुपयासाठी ती वाद घालायची. आता ऑपरेशनसाठी लागणाऱ्या खर्चासंबधी बोलायला मी आलो होतो.

    मावशी – तू विचारलंस का हॉस्पिटलमध्ये खर्चाचं? आधीपासून कोटेशन घे, नाहीतर मुंबईतील हे डॉक्टर्स लुबाडतात पेशन्टना…

    मी – होय, मी सगळी चौकशी करून आलोय. एकाच गुडघ्याचे ऑपरेशन करायचंय तर, चार लाखांपर्यत खर्च येईल.

    मावशी – बापरे, चार लाख! एवढे?

    मी – त्या हॉस्पिटलमध्ये विशेष सेवा असते… ऑपरेशननंतर फिजिओची गरज लागते,  किमान चार महिने. त्या हॉस्पिटलचा फिजिओ घरी येऊन उपचार करतो, शिवाय नर्सिंग वगैरे टॉप असतं त्या हॉस्पिटलमध्ये म्हणून…

    मावशी – त्यापेक्षा साधे हॉस्पिटल बघ… मालिश काय कोणीही बाई करेल…

    मी – मावशी, काय करणार आहेस त्या पैशांचं? बँकेत ठेऊन काय उपयोग? स्वतःसाठी उपचार तर करून घे!

    मावशी – असे काही खूप पैसे नाहीत आमच्याकडे… सर्वांना वाटतं हिच्याकडे खूप पैसा पडलाय… पण यांच्या आजारपणात किती खर्च झाले?

    मी – मला सर्व माहीत आहे. मी काकांचा मेडिक्लेम काढला होता, त्यामुळे त्यांच्या आजारपणात किती खर्च झाला आणि किती कंपनीकडून मिळाला, हे माझ्यापेक्षा जास्त कुणालाच माहीत नसणार…

    मावशी – बरं बरं… काय ते हॉस्पिटलचं ठरव आणि या ऑपरेशननंतर मी पाच-सहा महिने घरात काही करू शकणार नाही, त्यामुळे बाई बघायला हवी… आंघोळीसाठी बाथरूममध्ये न्यायला, जेवण करायला, बाजारहाट करायला…

    मी – मुंबईमध्ये अशा बायकांसाठी एजन्सी आहे, मी त्याची चौकशी करतो आणि कळवतो.

    मावशी – छे छे, तसल्या भैय्याबायका नको माझ्या घरात. त्या एजन्सी यूपी-बिहार, नाहीतर मद्रासी बायका पाठवतात… त्या नकोत.

    मी – मग कसली बाई हवी? आता कामवाली बाई मिळणे खूप कठीण झाले आहे.

    मावशी – तू आपल्या गावाकडची बाई बघ. त्यांना माहीत असतात आपल्या चालीरीती, जेवणाची पद्धत.

    मी – अगं, आपल्या गावामध्ये शिक्षण पोहोचलाय, सर्वांनी शिक्षण घेतलं, सरकारी योजना पण गावात गेल्यात, आता बहुतेक लोकांची परिस्थिती सुधारली, आता आपल्याकडची बाई मिळणे कठीण…

    मावशी – तू शोध… एवढे मावशीसाठी कर! जोपर्यंत बाई मिळत नाही, तोपर्यंत मी ऑपरेशन करून घेणार नाही.

    आता आली पंचाईत, मावशीचे ऑपरेशन करून घेणे आवश्यकच होते, आताच तिला खाली बसता येत नव्हते, जिने चढता-उतरता येत नव्हते आणि गुडघे दुखत होते. काहीतरी करायला हवे होते… मी माझ्या पुतण्याला फोन केला आणि सांगितले, “सहा-सात महिन्यांकरिता कोणी गरजू आणि विश्वासू बाई बघ, आपल्या मावशीच्या घरात… मावशी कशी आहे, हे तुला माहीत आहे.”

    पुतण्याने तिसऱ्या दिवशी उषा नावाच्या बाईची माहिती दिली. उषा ही आमच्या गावातील कुंभारवाडीतील. ती लग्न करून दुसऱ्या गावात गेली… तिला एक मुलगी झाली. तिचा नवरा कोरोनामध्ये गेला आणि सासरी दीर, जाऊ तिला थारा देईनात, म्हणून ती मुलीला घेऊन माहेरी आली. तिची मुलगी आता आठवीत शिकते आहे.

    माझ्या पुतण्याने तिची शिफारस केली, चांगल्या वर्तनाची बाई आहे आणि मनमिळाऊ आहे, तिची मुलगी पण चुणचुणीत आहे… अर्थात, तिची मुलगी मामाकडेच राहील, कारण तिची शाळा आहे.

    मी मावशीला कल्पना दिली आणि पुतण्याला उषाला मुंबईत आणायला सांगितले. दोन दिवसांनी पुतण्या उषाला घेऊन माझ्याकडे आला. माझ्याकडे ती दोन दिवस राहिली, यावेळी माझ्या पत्नीने तिला सुमनमावशीच्या स्वभावाची कल्पना दिली.

    शनिवारी मी उषाला मावशीकडे घेऊन गेलो. मावशी कोचावर बसून पाय दाबत होती, उषाला माझ्यासोबत पहिल्यानंतर ती मला सांगायला लागली,

    “अरुण, हिला सांग माझ्या खोलीत कुणी आलेलं मला आवडत नाही, फक्त लादी पुसण्यासाठी यायचं… माझ्या कपाटाला किंवा रूममधील कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही… माझ्या रूमला जोडून संडास-बाथरूम आहे, तो वापरायचा नाही. इतरांसाठी वेगळी सोय घरात आहे… रोज मला विचारून जेवण, नाश्ता बनवायचा… उगाच वस्तू खूप आहेत म्हणून जास्ती बनवायच्या नाहीत, तेल थोडं वापरायचं… भांड्याची पावडर, कपड्याची पावडर कमी घालायची, कपडे-भांडी स्वच्छ व्हायला हवीत… वाणसामान, भाजी आणल्यानंतर मला हिशेब द्यायचा…”

    मी मावशीला म्हणालो, “अगं, तिला मी आणि समिधाने कल्पना दिलेली आहेच आणि तुझे ऑपरेशन झाले की, समिधा दोन दिवस येथे राहील म्हणजे तिला सर्व समजेल, तू काळ्जी करू नकोस, आता हॉस्पिटलची तारीख ठरवू.”

    शेवटी मी ऑपरेशन तारीख ठरवली आणि मावशीला ॲडमिट केले. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झाले, ऑपरेशनबद्दल डॉक्टर समाधानी होते. मी आणि समिधा होतोच, आमच्यासोबत उषाही होती. रात्री उषाने बनवलेले जेवण घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो. मावशी व्यवस्थित जेवली म्हणजे तिला जेवण आवडले असणार, नाहीतर तिने जेवणाला नावं ठेवली असती.

    हेही वाचा – दोन स्पेशल

    दोन दिवसांनी मावशी घरी आली, आता तिला वेदना सुरू झाल्या. हॉस्पिटलचा फिजिओ येऊन ट्रीटमेंट देत होताच, पण उषा गरम पाण्याने शेकत होती. जेवण-पाणी, औषधे हातात आणून देत होती.

    मावशी उषाच्या तक्रारी करत नव्हती, याचा अर्थ उषा तिला तक्रार करायला जागा ठेवत नव्हती. उषाने बनवलेले जेवण मी आणि समिधा जेवलो होतो, तिचे जेवण आमच्या पद्धतीप्रमाणे होते.

    रविवारी संध्याकाळी मी आणि समिधा मावशीकडे गेलो, तेव्हा उषा मावशीच्या हाताला धरून थोडं थोडं चालवत होती आणि मावशी हळूहळू पाय टाकत होती.

    एप्रिल महिना लागला. मी मावशीकडे गेलो असताना उषा माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, “भाऊंनू, माज्या चेडवाक आता सुटी पडतली, दोन महिने शाळा नाय. माका वाटा होता चेडवाक हय आणूचा… दोन महिने रवात माज्याबरोबर… तुमी मावशेक विचारा.”

    मी मावशीला म्हणालो, “उषाच्या मुलीला दोन महिने रजा आहे, तेव्हा ती तिच्याबरोबर रहाण्यासाठी इथे येते आहे. मग त्या दोघी जूनमध्ये एकदमच गावी जातील, कारण तोपर्यंत उषाला पण सहा महिने होत आहेत.”

    उषाची मुलगी इथे येते आहे, हे ऐकून मावशीच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिने उषाला बोलावले आणि सांगू लागली… “अरुण म्हणतो आहे, तुझी मुलगी रजेत इथे येते आहे, पण मला शांतता लागते, गडबड गोंधळ चालत नाही. मुलांनी सतत मोबाइल पहाणे, अचकट विचकट गाणी म्हणणे मला आवडत नाही, हे लक्षात ठेव. माझ्या खोलीत कुणी आलेले मला आवडणार नाही… बाकी तुला माहीत आहेच. घरात जे बनेल तेच तिने खायचे, तिच्यासाठी वेगळे काही बनणार नाही.”

    उषा माझ्याकडे पाहात होती, मी तिला मान हलवायला सांगितली… तशी तिने मान हलवत “होय… होय” म्हटले आणि एका शेजारच्या माणसासोबत उषाची मुलगी नंदा, मावशीकडे आली.

    नंदा आठवीत होती म्हणजे बारा-तेरा वर्षांची. मी तिला पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले, ती चुणचुणीत मुलगी आहे. काळीसावळी असली तरी, बोलघेवडी आहे. सतत हसत राहायची. आता हिचे घरात रहाणे मावशीला किती रुचते हे पाहायचे, कारण ती दोन महिने रहाण्याच्या दृष्टीने आली होती.

    नंदा तिच्या आईसोबत आली. त्या रविवारी आम्ही दोघं मावशीकडे गेलो. मावशी तिच्या खोलीत टीव्ही पाहात होती. उषा आणि नंदा देखील तिथेच होत्या. मला थोडे आश्यर्य वाटले, कारण आपल्या खोलीत कुणालाही न घेणारी मावशी या दोघींसमवेत टीव्ही पाहात होती. आम्हाला पाहाताच उषा उठली आणि पाणी आणायला गेली, तिच्यापाठोपाठ नंदा पण उठली. नंदाने दोन ग्लासांतून पाणी आणून दिले, पाणी पिऊन होतं न होतं, तोपर्यंत चहा आणि बिस्किटे घेऊन उषा आली.

    समिधा सर्व पहात होती. मग मावशी तिच्या तब्येतीविषयी सांगू लागली. एकंदरीत नंदाचे घरात येणे मावशीला रुचलेले दिसले.

    तीन चार दिवस झाले असतील, अचानक मावशीचा फोन आला..

    “अरुण, उषा पाच हजार मागते आहे ॲडव्हान्स! तिला नंदासाठी काही खरेदी करायची आहे म्हणे… मी तिला ‘नाही’ म्हटलं. तिचे मागील महिन्यांचे पैसे पोच आहेत, आता तिला पैसे कसे देणार? तिने बुडवले तर?”

    मी तिला म्हटले, “तिला पैसे दे, ती नाही बुडवायची आणि तिने नाही दिले तर मी देईन तुझे पैसे.”

    मावशीचे समाधान झाले असावे. तिने उषाला पाच हजार दिले बहुतेक, कारण दुसऱ्या दिवशीच तिचा परत फोन आला… “अरे अरुण, काल मी उषाला पाच हजार दिले, मग दोघी बाहेर गेल्या, तिने नंदासाठी ड्रेस घेतले, चप्पल घेतल्या… पण मला कमाल वाटली तिने माझ्यासाठी कॉटनचे मस्त गाऊन आणले. घरात चालायला मऊ स्लीपर आणली… फ्रीझला, मिक्सरला कव्हर आणले बघ! या गोष्टी हव्याच होत्या, माझ्या लक्षातच आले नव्हते.. मऊ स्लीपरमुळे मला घरात फिरायला बरे जाते.”

    एकांदरीत मावशी समाधानी होती हे बरे, नाहीतर माझी धावपळ होणार होती.

    पुढील रविवारी मी गेलो तेव्हा मावशी, उषा आणि नंदा पत्ते खेळत होते. त्यांचा पाच-तीन-दोन खेळ रंगात आला होता. मला पाहाताच मावशी म्हणाली, “अरुण, खूप दिवसांनी पत्ते खेळतेय मी, या नंदाने हे पत्ते शोधून काढले बघ… आता नंदा मला हरवते आहे एकसारखी!” मावशी कृतकोपाने नंदाकडे पहात म्हणाली. मला मावशीचे हे रूप नवीन होते. मग मी थोडावेळ त्यांच्या खेळात सामील झालो, माझ्या लक्षात आले मावशी आणि नंदा यांचे सूत कमालीचे जुळले होते.

    मावशी आता हळूहळू चालू लागली, फिजिओ येणे बंद झाले. उषा आणि नंदा तिच्या पायाला मालिश करू लागल्या आणि मावशीला ते आवडू लागले…

    एकदा मावशीने मला फोन केला, “अरे अरुण, येताना बुद्धिबळ सेट घेऊन ये बाबा… ही नंदा मला बुद्धिबळ शिकवते म्हणते…” मला कमाल वाटली, मावशी या वयात बुद्धिबळ शिकणार आणि ते पण खेड्यातल्या मुलीकडून! मी रविवारी बुद्धिबळ सेट नेऊन दिला आणि नंदा मावशीला बुद्धिबळ शिकवू लागली. मग मावशी सांगायची, काल उषा आणि नंदाने मला खाली बागेत नेलं… कधी उषाने भाजी आणायला गेली असताना उसाचा रस आणला… मी समाधानी होतो.

    आता मावशी उषाच्या जेवणाची तारीफ करायची, तिच्या हातचे माश्याचे कालवण तिला फार आवडायचे. एकदा मला म्हणाली, “अरे, या नंदाचा आवाज चांगला आहे. सतत गुणगुणत असते… काल ही काय गुणगुणते म्हणून हळूच दाराला कान लावला तर स्वातंत्रवीरांचे गाणे ‘ने मजसी ने मातृभूमीला…’ गाणं होतं. मला एवढा अभिमान वाटला या पोरीचा! नाहीतर मुंबईतील पोरी कसल्या कसल्या जिंगल्स ऐकत असतात…”

    आता मावशी, उषा आणि नंदा यांचे त्रिकूट जमले होते, आयुष्यात कधीही कुणालाही जवळ न करणारी मावशी या दोघी मायलेकीच्या अगदी जवळ गेली होती.

    मे महिना संपत आला आणि उषाला गावी जायचे वेध लागले. तिची कोण वाट पाहात होते म्हणून नव्हे तर, नंदाची शाळा सुरू होणार होती आणि मावशीकडे सहा महिन्यांसाठीच ती आली होती. मी उषाचे आणि नंदाचे रेल्वे तिकीट काढले आणि मावशीला फोन करून सांगितले… मावशी काही बोलली नाही.

    हेही वाचा – बनिया आणि मराठी कस्टमर

    उषा आणि नंदाने गावी जायची तयारी केली. आपली बॅग त्या आवरू लागल्या. नंदाला मुंबई फार आवडली म्हणे, पण आता तिची शाळा सुरू होणार होती आणि मुंबईत तसे तिचे कुणीच नव्हते.

    मी 4 जून रोजी या दोघींना रेल्वेत बसवायला म्हणून मावशीच्या घरी गेलो. मावशी एकटी हॉलमध्ये बसून होती. माझ्याशी बोलली नाही. मी आतल्या खोलीत जाऊन उषाला मी आल्याचं सांगितलं. त्या दोघी तयारीत होत्या. त्या दोघी बॅगा घेऊन बाहेर आल्या. दोघींनी मावशीला नमस्कार केला. मावशी गप्प होती. दोघींच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं.

    उषा आणि नंदा शेवटचे हे घर पाहात होत्या. उषा या घरात सहा महिने राहिली आणि नंदा दोन महिने. दोघींनी आपापल्या बॅग उचलल्या आणि मावशीला “येतो”, म्हणत डोळ्यांतील अश्रू थोपवत बाहेर पडल्या. मी पण मावशीला, “येतो गं यांना गाडीत बसवून…” असे म्हणून बाहेर पडलो.

    टॅक्सी स्टेशनकडे धावत होती. मी पुढे बसलो होतो, माझं लक्ष होतं दोघी रुमालाने डोळे पुसत होत्या… मी दोघीना डब्यात बसवलं, अजून पाच मिनिटे होती गाडी सुटायला. एवढ्यात माझा फोन वाजू लागला. मावशीचा फोन होता…

    “अरुण, त्या दोघींना घेऊन ताबडतोब घरी ये, मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही रे…”

    “अगं मावशी, असं काय करतेस? उषा सहा महिन्यांसाठीच आली होती आणि नंदाची शाळा नाही का?”

    “ते सर्व माहीत आहे मला… मी तुझी मावशी म्हणून सांगते आहे, तू त्यांना गाडीतून उतरव आणि टॅक्सीने घरी आण, जास्त बोलू नकोस… मी सांगते तसे कर, नाहीतर गाडी सुटेल.”

    मी त्या दोघींना बॅगा घेऊन उतरायला सांगितले. त्यांना कळेना काय झाले? मी स्टेशनबाहेर येत होतो, माझ्या मागून त्या दोघी…

    मी परत टॅक्सी पकडली आणि मावशीच्या घरी आलो. उषा परत परत “काय झाला.. कित्याक परत आणलास,” असं विचारत होती. मी कसलेच उत्तर दिले नाही.

    मावशी दार उघडून वाट पाहात होतीच. त्या दोघींना पहाताच ती पुढे झाली आणि दोघींना मिठीत घेऊन रडू लागली…

    “अरुण, मी नाही राहू शकत या दोघींशिवाय! एवढी वर्षे मी माणूसघाणी होते, कुणाचा सहवास मला नको असायचा. पण माणसाची साथसोबत किती महत्त्वाची हे या दोघींच्या सहवासाने कळलं. खरंच गेले सहा महिने मी आनंदात घालवले… कारण उषा होती घरात. मग ही नंदा आली… मला बुद्धिबळ शिकवणारी… कुणीतरी घरात लहान सुद्धा हवंच… आम्हाला मुलबाळ नाही, त्यामुळे हे घर कसं उजाड झालं होतं. पैसे खूप असले म्हणून काय झालं, सहवासाला माणसं नसतील तर काय करायचे त्या पैशांचं?

    उषा, तू इथेच राहा… माझी बहीण म्हणून… नाही म्हणू नकोस उषा… तुला काही कमी पडणार नाही. या नंदाला येथेच उत्तम शाळेत घालूया, गाण्याच्या क्लासला घालूया.. काय आवाज आहे हिचा… हिचं गाणं जपायला हवं… उषा, नंदा तुम्ही माझ्याजवळ हव्यात. नाही म्हणू नका… आपण आंनदात राहू. होय म्हण उषा… होय म्हण…”

    मावशीचे अश्रू पुसत उषा मान हलवून “होय… होय” म्हणत होती. नंदा केव्हाच मावशीला बिलगली होती.

    मी कोपऱ्यात उभा राहून डोळे पुसत पुसत ही साथसोबत पाहात होतो.

    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Related Posts

    बाई बाई… बाईपण

    October 10, 2026 ललित

    सप्तधान्य अन् घटस्थापना

    October 10, 2026 ललित

    शर्वाय-आराध्याबाबत आनंदी अनभिज्ञच!

    October 9, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    बाई बाई… बाईपण

    By पराग गोडबोलेOctober 10, 2026

    ठाण्याला रिक्षाच्या रांगेत उभा होतो. संथ गतीने सरकणारी रांग आणि कासावीस जनता, हे रोजचंच दृश्य……

    सप्तधान्य अन् घटस्थापना

    October 10, 2026

    शर्वाय-आराध्याबाबत आनंदी अनभिज्ञच!

    October 9, 2026

    सासू आणि आई… दोघी सारख्याच!

    October 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सहवास

    October 10, 2026

    बाई बाई… बाईपण

    October 10, 2026

    सप्तधान्य अन् घटस्थापना

    October 10, 2026

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अविवेकमहामंत्र, जें मौढ्यमद्याचें पात्र

    October 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 465
    • अवांतर 216
    • आरोग्य 157
    • पंचांग आणि भविष्य 622
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 258
    • मैत्रीण 30
    • ललित 985
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सहवास

    October 10, 2026

    बाई बाई… बाईपण

    October 10, 2026

    सप्तधान्य अन् घटस्थापना

    October 10, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.