Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeललितप्रसिद्धी मिळविण्याचा शॉर्टकट

प्रसिद्धी मिळविण्याचा शॉर्टकट

आराधना जोशी

सध्या प्रसिद्ध होण्यासाठी काय काय फंडे अवलंबले जातात. खरंतर, प्रसिद्धी या शब्दामागे चांगल्या अर्थाने समाजात नाव होणं, हा अर्थ अभिप्रेत असतो. मात्र, ‘निगेटिव्ह पब्लिसिटी इज ऑल्सो पब्लिसिटी’ असंच चित्र आजकाल दिसत आहे. 12 वर्षं एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना बीएमएम अर्थात पत्रकारिता शिकवत होते. दोन वर्षांपूर्वी तो पेशा मी सोडला. पण त्यावेळी एक लक्षात आलं की, पत्रकारितेचं प्रशिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 90 टक्के विद्यार्थ्यांना झटपट प्रसिद्धीसाठी इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करायचं असतं. वृत्तवाहिनीत काम करताना आपल्याला ‘कॅमेरासमोर काम करायची इच्छा असल्याचं’ हे विद्यार्थी सतत बोलून दाखवायचे.

जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला आपण चारचौघांमध्ये उठून दिसावं, समाजात आपली वेगळी ओळख असावी, असं वाटत असतं. आपलं कर्तृत्व, आपलं व्यक्तिमत्व समाजात ठळकपणे दिसून यावं, आपण प्रसिद्ध असावं, एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे आपल्याला ओळख मिळावी, अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. पण त्यासाठी कष्ट करण्याची, मेहनत करण्याची गरज असते, याकडे मात्र सोयिस्करपणे कानाडोळा केला जातो. झटपट प्रसिद्ध होण्यासाठी मग वाटेल ते मार्ग अवलंबले जातात. सार्वजनिक जीवनात वावरत असताना कुठे काय बोलावं? यापेक्षा कुठे काय बोलू नये? याला जास्त महत्त्व असते. मात्र हल्ली या संकेतालाच हरताळ फासला गेला आहे.

‘पेड न्यूज’ हा प्रकारही पैसे देऊन बातम्या छापून आणण्याशी संबंधित असला तरी त्यातून आपली प्रसिद्धी करण्याचाच तर, अनेकांचा प्रयत्न असतो. अशा विविध कारणांमुळे चर्चेत आलेल्या या ‘सो कॉल्ड’ व्यक्तींची प्रसिद्धी एन्कॅश करण्याचा प्रयत्न मग अनेक मनोरंजनपर वाहिन्यांकडून केला जातो. विविध रिएलिटी शोमधून मग या अशा प्रसिद्ध (?) व्यक्तींना सहभागी करून घेतलं जातं.

हेही वाचा – गोष्ट माझ्या शिरा आजीची

काही वर्षांपूर्वी एक राजकीय पक्ष, त्या पक्षाचा असा एक नेता ज्याचा शब्द अंतिम मानणारा मोठा जनसमुदाय असताना त्या पक्षाविरोधात आणि त्या नेत्याविरोधात भूमिका घेणारा पत्रकार खूप चर्चेत आला. त्यानंतर लोकप्रियतेच्या पायऱ्या चढत गेला. पण स्पष्टवक्तेपणा कधी उद्धटपणा झाला, हे कळलंच नाही. त्यामुळे खूप फॉलोअर्स असतानाही मूळ प्रवाहापासून हा पत्रकार बाजूला पडला. त्यामुळे अशा निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक प्रसिद्धीची परिणती अशी देखील होऊ शकते.

झटपट प्रसिद्धीसाठी सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलं असलं तरी, कोणतीही घटना घडल्यावर त्याबाबत आपलं मत मांडायचं, याला हल्ली ताळतंत्रच राहिलेलं नाही. आपल्या बोल्ड अंगप्रदर्शनामुळे प्रसिद्धी मिळालेल्या काही अभिनेत्रींना तर, आपल्याला सवंग मार्गाने का होईना, पण प्रसिद्धी मिळते यातच धन्यता वाटते. चित्रपटसृष्टीत तर गेल्या काही वर्षांपासून एक नवा प्रवाह दिसून यायला लागला आहे. काही चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकतात. काही वेळा त्याचे नाव, त्यातील गाणे, काही दृश्यं यांना आक्षेप घेतला जातो. मात्र, यातील काही चित्रपटांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की, एखाद्या चित्रपटातून फारसा गल्ला मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर त्या चित्रपटाबद्दल मुद्दाम काहीतरी वाद-विवाद उकरून काढले जातात. मग काही वेळा राजकीय गाठीभेटी होतात. या सर्वांचीच माध्यमांमधून चर्चा होते, सामान्यांपर्यंत हे वाद पोहोचतात आणि आपोआपच प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटांचा बोलबाला होतो, तिकीटबारीवर अ‍ॅडव्हान्स बुकींगसाठी गर्दी होते.

तरुणाईच्या दृष्टीने विचार केला तर, बहुतांश तरुणांना, विशेषत: सुज्ञ तरुणांना हे सगळे प्रकार खटकत असले तरी आवडतही असतात. काहीकाळ मनोरंजन होत असेल तर, त्यात काय गैर आहे? असा त्यांना प्रश्न पडतो. ‘प्रसिद्ध’च्या विरुद्ध असणारा ‘कुप्रसिद्ध’ हा शब्द आणि त्याचा अर्थ हल्लीच्या पिढीच्या कानावरून तरी गेला आहे का? असा आपल्यालाच प्रश्न पडतो. पण औट घटकेची ही अशी प्रसिद्धी, ती करण्यासाठी फारसे करावे न लागणारे प्रयत्न हल्लीच्या तरुणाईला आकर्षित करत आहेत, हे नक्की कशाचं प्रतीक मानायचं हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!