अजित गोगटे
प्रसार माध्यमांना लोकशाहीतील ‘चौथा स्तंभ’ म्हटले जाते. याचे कारण असे की, या माध्यमांच्या अस्तित्वालाच मुळात सामाजिक बांधिलकी आणि उत्तरदायित्वाचे पायाभूत अधिष्ठान असते. हल्लीच्या काळी व्यापारीकरण तसेच सातत्याने उन्नत होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे या माध्यमांची व्याप्ती खूप वाढली असली आणि त्यांचे स्वरूप आमूलाग्र बदललेले असले तरी त्यांच्या अस्तित्वाची मूळ तात्विक बैठक पूर्वीचीच आहे. माहिती आणि विचारांचे सशुल्क वितरण-प्रसारण करणे, असे या व्यवसायाचे स्वरूप असते. माहितीचा स्रोत आणि माहितीचा उपभोक्ता यांच्यामधील दुवा म्हणजे ही माध्यमे. या व्यवसायाचे वेगळेपण असे की, या दोन्ही टोकांशी माध्यमाचे नाते केवळ पुरवठादार आणि ग्राहक / उपभोक्ता एवढेच नसते. ही माध्यमे या दोहोंचे प्रतिनिधित्वही करतात. स्रोतांकडून माहिती घेताना आणि तिचे वितरण-प्रसारण करताना माध्यमे समाजाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात. पैसे कमावणे हा या व्यवसायाचा उद्देश असला तरी विश्वासार्हता हा त्याचा प्राण असतो.
माध्यमांमध्ये माहितीचे संकलन, संपादन आणि सादरीकरण करण्याचे काम जे लोक करतात त्यांना सर्वसाधारणपणे `पत्रकार` असे म्हटले जाते. बहुतांश पत्रकार `पगारी`असतात. म्हणजे ते पत्रकारितेचे काम अन्य कोणाची चाकरी म्हणून करत असतात. एखाद्या प्रसार माध्यमाची मालकी ज्या कंपनीकडे असते, ती कंपनी `व्यावसायिक पत्रकार` असते आणि ती आपले काम पगारी पत्रकारांकडून करून घेत असते. पत्रकारितेकडून निष्पक्षता आणि निस्पृहतेची अपेक्षा असते. यासाठी पत्रकारितेची काही सर्वमान्य नीतिमूल्ये ठरलेली आहेत. पत्रकारितेची नीतिमूल्ये अशा पगारी पत्रकारांनाही लागू होतात.
या नीतिमूल्यांचे पालन आणि माध्यमाची विश्वासार्हता यांचे अतूट नाते असते. नीतिमूल्यांची घसरण झाली की, त्याच उतरंडीवरून विश्वासार्हताही घरंगळत खाली येते. माध्यमांनी विश्वासार्हता गमावल्याची खेदाची सर्वसामान्य भावना हल्ली समाजात व्यक्त होताना दिसते. ही भावना अनाठायी मुळीच नाही. नीतिमूल्यांचा ऱ्हास हेच याचे कारण आहे. हा ऱ्हास आताचा नाही. गेल्या काही वर्षांत या अधोगतीचा वेग आणि दृश्यमानता वाढली आहे. विस्फोट म्हणता येईल एवढी झालेली माध्यम विश्वाची वाढ, आत्मघाती स्पर्धा आणि माध्यमांच्या उपभोक्त्यांची वाढलेली सजगता याचा हा परिणाम आहे. पूर्वी नीतिमूल्यांचे उल्लंघन ही व्यक्तिगत आणि अपवादात्मक बाब होती. आता पालन अपवादात्मक आणि उल्लंघन सर्रास अशी स्थिती आहे.
हेही वाचा – कल्याण ते मुंबई : विनातिकीट रेल्वे प्रवास – एक चिंतन
पत्रकाराने त्याच्या कामाच्या मोबदल्यात, त्याच्या मालकाकडून त्याला पगाराच्या स्वरूपात मिळणाऱ्या मोबदल्याखेरीज, अन्य कोणाहीकडून कोणत्याही प्रकारचा लाभ न स्वीकारणे, हे पत्रकारितेच्या आदर्श नीतिमूल्यांमधील एक मूलभूत तत्त्व आहे. पत्रकारितेचे निःष्पक्ष आणि निस्पृह स्वरूप केवळ या तत्त्वाच्या काटेकोर पालनानेच अबाधित राहू शकते. हे मुद्दा अधोरेखित होण्यासाठी असा नोकरदार पत्रकार त्याच्या कामानिमित्त समाजातील विविध व्यक्तींच्या संपर्कात येतो, तेव्हा त्याची खरी ओळख काय असते वा असायला हवी, हे स्पष्ट होणे गरजेचे ठरते. अशा वेळी त्याची एकमात्र ओळख त्याच्या माध्यमाचा प्रतिनिधी अशी असते. त्याची व्यक्तिगत ओळख त्याच्या औपचारिक व्यावसायिक ओळखीने पूर्णपणे झाकली जाते. मात्र, वास्तवात असे होताना दिसत नाही. पत्रकार आणि कामानिमित्त त्याच्या संपर्कात येणारी अन्य व्यक्ती हे दोघेही उभयपक्षी लाभापोटी त्यांच्यातील परस्पर संबंधांची आणि ओळखीची सोईस्करपणे गल्लत करतात. पत्रकारितेच्या नीतिमूल्यांतील उपयुक्त मूलभूत तत्त्वाचा यामुळे हमखास बळी पडतो.
खासगी जीवनात नोकरपेशाच्या या पत्रकारितेपासून पूर्णपणे अलिप्त राहण्याचे मी अतिरेक म्हणता येईल, एवढे पालन केले. सुरुवातीची काही वर्षे मी नोकरी करीत असलेल्या माध्यमाचा प्रतिनिधी या नात्याने ऑफिसमध्ये किंवा घरी आलेली दिवाळी आणि नववर्षाची ग्रीटिंग कार्डही मी उलट टपाली परत पाठवत असे. शहाण्यांनी यातून योग्य तो संदेश घेतला आणि भेटवस्तू तर सोडाच पण ग्रीटिंग कार्डही पाठविणे त्यांनी बंद केले. ज्यांनी बंद केले नाही, त्यांना नंतरच्या भेटीत त्या सदिच्छांबद्दल शिव्या हासडल्यावर तेही ताळ्यावर आले. ‘पत्रकार परिषदा आणि प्रेस टूरच्या वेळी आयोजकांकडून दिल्या जाणार्या भेटवस्तूंचे काय करायचे’, असे मी प्रत्येक संपादकास विचारले. त्या सर्वांनी मला ‘त्या तुम्हाला दिलेल्या असतात, तुम्ही घरी घेऊन जा,’ असे सांगितले. परंतु त्या भेटवस्तू मला व्यक्तिगत नव्हे, माझ्या माध्यमाचा प्रतिनिधी म्हणून दिल्या जात असल्याने त्या मी ऑफिसमध्ये आणून देईन, या माझ्या प्रस्तावाला कोणीही संमती दिली नाही. त्यामुळे त्या भेटवस्तू स्वीकारणेच मी बंद केले.
अनेकांनी त्याबद्दल मला दूषणे दिली आणि वेड्यातही काढले. पण लोक काय म्हणतात याला माझ्या आयुष्यात काहीच किंमत नसल्याने त्यांच्या समाधानासाठी मी माझा विचार किंवा वागणे बदलण्याचा प्रश्नच नव्हता. अर्थात ऑफिसमध्ये याबाबतीत मी ‘odd man out’ होतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या मानसिकतेमुळे ‘पत्रकार’ म्हणून सरकारी कोट्यातून घर घेण्यासाठी आटापिटा करणे, एस.टी. प्रवासात 50 टक्के सवलत मिळते म्हणून सरकारकडून पत्रकारांना दिले जाणारी अधिस्वीकृती (Accreditation) मिळविणे, पत्रकार म्हणून रेल्वे रिझर्व्हेशन कन्फर्म करून घेणे किंवा टीसीने विनातिकिट पकडल्यावर पत्रकार असल्याचा दाखला देणे, असे शुद्र आणि आत्मसन्मान गहाण टाकणारे विचार माझ्या मनाला कधी शिवलेही नाहीत.
हेही वाचा – विनातिकीट रेल्वे प्रवास : काही अनुभव
सुमारे 25 वर्षांपूर्वी मध्यरात्री कामावरून घरी परतत असताना एका खासगी वादातून माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला, तेव्हाही पोलिसांकडे फिर्याद नोंदविताना मी अमूक माध्यमाचा पत्रकार असल्याचा पुसटसाही उल्लेख केला नव्हता, हेही आवर्जून नमूद करायला हवे.
पत्रकारितेमधील या अपप्रवृत्तींपासून व्यक्तिशः मी दूर राहिलो. तरी, या क्षेत्रात काम करताना जे पहिले, अनुभवले त्याचे मासलेवाईक किस्से आणि घटना यानंतरच्या पुढील भागांमध्ये ‘पत्रकारितेमधील अनीतिमूल्ये’ या शीर्षकाने मी क्रमशः लिहिणार आहे.
चार दशकांहून अधिक काळ मी मुंबईतील दोन अग्रगण्य मराठी दैनिक वृत्तपत्रांचा पगारी पत्रकार म्हणून नोकरी केली. या अनुभवाच्या आधारे मी हे लिखाण करत आहे. त्याचे संदर्भ पगारी पत्रकारितेपुरते मर्यादित आहेत. त्यातील नीतिमूल्यांचे निकष मला जेवढे आकलन झाले आणि जेवढे मी पालन करू शकलो, तेवढे आहेत.
(क्रमशः)