Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeललितशाल्मलीला स्वप्नातला तो राजवाडा समोर दिसला अन्…

शाल्मलीला स्वप्नातला तो राजवाडा समोर दिसला अन्…

भाग – 10

डॉक्टर देवदत्त यांचं बोलणं ऐकून मुलं भारावून गेली होती… एक वेगळ्याच ऐतिहासिक रहस्यमयी घटनेची उकल होणार होती आणि त्याचे आपण साक्षीदार होतोय, याची जाणीव त्यांना झाली…

आज चंदन नगरच्या वातावरणात सुद्धा फरक पडला होता… एक उत्साही, आश्वासक असं काही होणार असल्याचं वाटत होतं… मुंबईवरून काही लोक इथं येणार आहेत, याची वर्दी मिळाली होती… एक नवा आशावाद फुलला होता…

उजाडताच सर्व कामाला लागले. लवकर आवरून सर्व सामान बसमध्ये भरले गेले आणि प्रवासाला सुरुवात झाली… शौनक डॉक्टरांच्या शेजारीच बसला होता आणि शाल्मली पुढे तिचे बाबा विश्वासरावांसोबत… डॉक्टर देवदत्त यांनी तिला न्याहाळले… तिचा चेहरा आज काही वेगळंच सांगत होता… एक तेज दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर…

डॉक्टर देवदत्त यांनी शौनकला विचारलं, “तुम्ही पहिल्यांदा चंदन नगर ला गेलात तेव्हा शाल्मलीची प्रतिक्रिया कशी होती…”

शौनक सांगू लागला… “ती आधी नाराज होती. सगळ्यांच्या इच्छेखातर जबरदस्ती आल्यासारखी सोबत आली. बसमध्ये तर विचारात हरवलेली… कसलीशी चिंता लागून राहिल्यासारखी… मात्र चंदन नगरमध्ये गेल्यावर ती स्वतःहून सगळ्यांवर लक्ष ठेऊन होती… वाळवंटात तर तिने सगळ्यांना जबरदस्ती बाहेर काढलं होत… श्लोक आणि माझ्या वेळेस तर तिचे भाव कमालीचे वेगळे होते… जणू कोणतं वेगळंच बळ तिच्यात संचारलं होत… ना तिला कोणतं भय होतं! तिच्यात एक विलक्षण ताकद संचारली होती… आम्ही आवक् झालो होतो तिच्याकडे पाहून… कारण इतकी नाजूक अशी शाल्मली असं कसं वागू शकते, याचं आश्चर्य वाटत होतं मनातून…”

शौनकचं बोलणं ऐकून डॉक्टर समजायचं ते समजून गेले…

डॉक्टर देवदत्त यांचे कडक निर्देश होते, मुंबईहून निघाल्यावर बस चंदन नगरलाच थांबेल… त्यांना कोणतंही संकट ओढावून नव्हतं घ्यायचं. जे काही खाणं होतं सोबत घेतलेलं ते गाडीतच सर्वांनी खाऊन घेतलं…

बस चंदन नगरमध्ये पोहचली. डॉक्टरांचा मित्र उमेश सगळ्यांच्या स्वागताला हजर होते… प्रवासात देवदत्त आणि त्यांचं सतत बोलणं सुरू होतं, त्यामुळे ते वेळेतच तिथे पोहोचले होते… उमेश हे गावच्या पाटलांचे नातेवाईक होते… त्यामुळे चंदन नगरमध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल त्यांना माहिती होतीच. याआधी डॉक्टरांच्या चंदन नगरवरील अभ्यासात त्यांनी वेळोवेळी मदत केली होती…

डॉक्टर देवदत्त यांचं गावकऱ्यांनी यथोचित स्वागत केलंच, पण त्याबरोबर त्यांनी मुलांनाही बरोबर ओळखलं…

यावेळी देखील सर्वांची व्यवस्था पाटलांच्या वाड्यावरच केली गेली होती. आलेल्या पाहुण्यांना जेवण करून फ्रेश होऊ दिलं, नंतर ठरलेल्या वेळेत गावकरी हजर झाले. त्यांनी डॉक्टरांसमोर आपले अनुभव सांगितले… रात्री कोणीही गावात फिरत नाही… एखाद्या सावलीचं अस्तित्व जाणवतं… कोणाला आवाज येतात तर कोणाला सुगंध जाणवतो… गेल्या काही दिवसांत सहा जण बेपत्ता झाले आहेत… नक्की कशामुळे हे माहीत नसलं तरी, आधी असं कधीच घडलं नव्हतं… त्यांचं कोणतंच अस्तित्व दिसत नाही… ना कुठे गेल्याच्या खुणा!

डॉक्टर देवदत्त आणि त्यांची संपूर्ण टीम सर्व ऐकून घेत होती… त्या वाळवंटाकडे दिवसाही कोणी फिरकत नव्हतं… “मी आणि माझी संपूर्ण टीम तुमच्या मदतीला इथे आलो आहोत. तुम्हा सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. न घाबरता तुम्ही पुढे येऊन मदत करा, जेणेकरून चंदन नगरवरच्या संकटाचे निवारण करणं आम्हाला सोपं होईल…” देवदत्त यांनी सर्वांना उद्देशून सांगितलं. सर्व एकमेकांकडे बघायला लागले… मनात भीती होतीच, पण असं भीतीखाली किती दिवस जगणार? तेवढ्यात गावातली तरुण मुलं पुढे आली आणि म्हणाली, “आम्ही हवी ती मदत करू तुम्हाला!” मुलांची तयारी पाहून डॉक्टर खूश झाले. “मात्र, मी जे सांगेन तसेच झाले पाहिजे, तसंच वागायला हवं सगळ्यांनी… कोणत्याही क्षणाला कुठलाच धोका उद्भवायला नको…”

हेही वाचा – देवदत्त यांना माहीत होती चंदन नगरची सत्यकथा!

डॉक्टरांचं मत सर्वांना पटलं होत म्हणून सगळ्यांनी एकमुखाने मान्यता दिली… “उद्यापासून कामाला लागू. उद्या लवकरात लवकर वाळवंटाची नीट पाहाणी करू… मग काय? कसं? आणि कुठून सुरुवात करायची ते ठरवू…” देवदत्त म्हणाले. एवढं सगळं ठरल्यावर सर्व  गावकरी आपापल्या मार्गाला निघून गेले…

कामाची सुरुवात तर करायची आहे, पण नक्की कुठून आणि कशी? हा प्रश्न समोर उभा आहे… “येत्या पाच दिवसांनी पौर्णिमा येतेय म्हणजे तो तिचा दिवस असणाराय… त्याच्या आतच काही घटनांची उकल झाली तर, बरं होईल असं वाटतंय… अहंकाराच्या नाशाची भविष्यवाणीही केली गेली होती… पण ती कशी पूर्ण होणार? त्याची प्रक्रिया काय? काहीच माहिती नाही…” डॉक्टर टीमसमोर बोलत होते आणि नंतर विचारात गढून गेले…

‘माझ्या अभ्यासानुसार संघमित्राचे योग शाल्मलीच्या योगांशी जुळत आहेत… तिच्या माध्यमातून संघमित्रा मदत करणार, हे नक्की… म्हणजेच प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेस शाल्मली सोबत असणं गरजेचं आहे. तीच सर्वांचं रक्षण करेल अन् तीच मार्गही काढेल, अस नक्की वाटतंय…’ या विचारातच डॉक्टरांचं लक्ष शाल्मलीकडे गेलं… ‘ही अशी नाजूकशी पोर झेपेल का हिला हे सगळं? वय लहान अन् अनुभवही नाही…! हे काम फारच जिकरीचे आणि अतिकठीण… मानसिक सामर्थ्याची ही परीक्षाच होईल…’ शाल्मलीच्या चिंतेने डॉक्टरही थोडे विचारातच पडले. कोणाकडेही त्यांचं लक्ष नव्हतं, शून्यात नजर लावून बसले होते…

“सर, नका काळजी करू एवढी! वेळ आली की सगळं आपोआप होईल…” कानावर आवाज आला तसं डॉक्टरांनी चमकून पाहिलं तर, समोर शाल्मली… त्यांच्याकडे पाहून बोलत होती, तिच्या चेहऱ्यावर स्मित होतं… ‘हिला माझ्या मनातले विचार कसे कळले आणि हिचा हा प्रसन्न चेहराच सांगतोय… ती वेळ खरंच येऊन ठेपली आहे…’

संध्याकाळ होऊ लागली तशी वातावरणात बदल जाणवू लागले…. काही वेगळं घडणार याचीच ती चाहूल होती जणू… गावात शांतता पसरली होती… रात्रीची जेवणं होऊन सगळी उद्याच्या कार्याबाबत चर्चा करतच होती, तोच जमिनीत कंपनं जाणवू लागली… हा भूकंप आहे अशा विचाराने डॉक्टरांनी सगळ्यांना वाड्याबाहेर उघड्यावर जायला सुचवलं…

कंपनं वाढत होती… आता सर्व गावकरीही भयभीत होऊन घराबाहेर आले होते… डॉक्टर देवदत्त  आणि टीम जिथे होती, त्यांच रोखाने येऊन सर्व जमले… ‘रोज हादरे जाणवत होतेच, पण आजची हालचाल काही वेगळीच वाटत आहे,’ गावकरी कुजबुजत होते… ‘कंपनं वाढतच आहेत…’

डॉक्टरांनी त्यांच्या काही भूगर्भ तज्ज्ञांना कॉल करून विचारले भूकंपाची काही लक्षण अथवा कंपनं जाणवत आहेत का? पण सर्वांकडून असं काहीच होत नसल्याचे सांगण्यात आले… म्हणजे ही भूगर्भातली हालचाल चंदन नगरपुरतीच मर्यादित आहे… बाहेर ह्याची जाणीवही नाही, ना रिश्टर स्केल काही दाखवत!

रहस्यावरचा पडदा उघडू लागला होता… काही वेगळेच आवाज कानी येत होते…. एक स्फोटासारखा आवाज येऊन सगळं अचानक थांबलं होतं…. डॉक्टर देवदत्त शाल्मलीचं निरीक्षण करत होते… वाळवंटाच्या दिशेने तोंड करून उभी असलेली ती… एक विजयी हास्य चेहऱ्यावर ठेऊन होती… तिची प्रसन्न मुद्राच सगळं व्यक्त करत होती… संघमित्राच्या कार्याला सुरुवात झाली होती…

रात्रीची वेळ असल्याने काही हालचाल करणं सोपं नव्हतं म्हणून डॉक्टरांनी उद्या लवकरच वाळवंटी भागाकडे जाऊ असं सांगितलं… कोणतंही कार्य हे दिवसा करणं गरजेचं होतं. कारण कोणत्याही प्रकारचा विजेचा त्या भागात शिरकावच नव्हता… उद्याच्या कामाची तयारी करून सर्वजण झोपी गेले…

शाल्मलीच्या नजरेसमोर मात्र तीच खोली… त्या खोलीतल्या त्या तसबीरीतून ती तेजस्वी स्त्री मात्र आज आनंदाने आणि कुतूहलाने तिच्याकडे पाहात असल्याचं तिला जाणवलं… त्या तसबिरीखाली लाल रेशमी वस्त्रात काहीतरी होतं… वाऱ्याच्या एक झुळुके सरशी ते वस्त्र थोडं बाजूला सरकलं आणि त्यात काही पानांची गुंडाळी तिच्या नजरेस पडली…

कसलासा आवाज झाला अन् शाल्मली जागी झाली… पहाट झाली होती… लवकरच तयार होऊन निघावे लागणार होते… सर्वांनी लवकर आवरलं आणि बसनेच निघाले… वाळवंटाच्या एका भागापर्यंतच बस जाऊ शकणार होती… मागे ट्रेकसाठी आले होते म्हणून पायी प्रवास केला होता मुलांनी…

सर्व त्या निर्धारित स्थळी पोहचले… समोर जे पाहिलं त्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता… ती वाळवंटी जमीन दोन भागात दुभंगली होती … आता जे काही शोधावं लागणार होतं ते नक्कीच या खालील भागात असणार याचा डॉक्टरांना अंदाज आला… “कोणीही इथे तिथे जाऊ नका, जमेल तसं एकत्र रहा,” त्यांनी सूचना केली. भेगेखाली उतरायला गावातून शिड्यांची सोय करण्यात आली. एक एक करत माणसं खाली उतरू लागली…

हेही वाचा – सुजलाम सुफलाम चंदन नगरचं वाळवंट कसं झालं?

सगळे उतरून एकाच ठिकाणी थांबून राहिले, जसं डॉक्टरांनी सांगितले होतं… त्या लोकांमध्ये  डॉक्टर देवदत्त, शाल्मली, विश्वासराव आणि मुलं येऊन पोहचल्यावर सगळ्यांनी पुढे जायचा निर्णय घेतला…

जसजसे ते पुढे जाऊ लागले, त्यांना कळून चुकले ते एका इतिहासकालीन वास्तूमध्ये असावेत. इतक्यात शाल्मली जोरात ओरडली… “हाच हाच तो राजवाडा सतत माझ्या स्वप्नात येत होता… इथेच कुठे तरी त्या मूर्तीही असतील आणि त्यांचाही नक्कीच काही संबंध या चंदन नगरच्या इतिहासाशी असणारच!” ती पुढे पुढे जाऊ लागली सगळे तिच्या पाठी होतेच… कोणी फोटो घेत होत तर कोणी व्हिडीओ शूट करत होतं, जेणेकरून नंतरही अभ्यास करणं सोपं होईल…

संघमित्राच्या शापाने सर्व राजवाडा जमिनीखाली जसाच्या तसा धसला गेला होता, त्याचं अजून अस्तित्व दिसत होतं…

चालताना शाल्मली कशामुळे तरी अडखळली…. तिचा तोल जाणार तोच शौनकने तिला सावरलं होत… बॅटरीचा प्रकाश झोत टाकला तर ते काही मानवी सांगाडे दिसून आले. देवदत्त आणि विश्वासरावांच्या अनुभवी नजरेने ते न्याहाळले… पौर्णिमेच्या रात्री म्हणा किंवा इथल्या गुप्तधनाच्या लालसेने म्हणा हे लोक इथं येऊन मृत्यूमुखी पडले असावेत, असा कयास दोघांनी लावला… त्यातल्या एका सांगाड्याच्या गळ्यात तर त्याचं I-card तसंच होतं… डॉक्टरांनी लगेच ओळखलं हे तर त्यांच्या त्या सहकाऱ्याचं जो त्या काळोखात दिसेनासा झाला होता… ती गोष्ट आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं… गावकऱ्यांच्या साथीने ते अवशेष त्यांनी वर न्यायला सांगितले…

सगळे एकच लक्ष्य ठेऊन काम करत होते. वेळेचं भानच कोणाला नव्हतं… डॉक्टर देवदत्त घड्याळाकडे नजर ठेवून होते… दुपारचे 3.30 झाले होते… त्यांनी आवाज देऊन सर्वांनाच परतायला सांगितले… उगाच वेळ जाऊन चालणार नव्हतं… सगळे तेथून बाहेर पडलेत याची खात्री करूनच डॉक्टर तेथून निघाले आणि बस पुन्हा गावाच्या दिशेने पळू लागली…

क्रमशः

प्रणाली वैद्य
प्रणाली वैद्य
प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!