रश्मी परांजपे
मागील चार लेखांच्या माध्यमातून आपण शाळा प्रवेशोत्तर पालकांची जबाबदारी या व्यापक विषयासंबंधीत काही निवडक मुद्द्यांवर सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी या महत्त्वाच्या विषयाची प्रथम थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. पालकांप्रमाणे शाळेने देखील मुलांच्या प्रती असलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यास मुलांची शैक्षणिक प्रगती तसेच सर्वांगीण विकास निश्चितच सुकर होणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात बहुतांश संस्था पूर्व-प्राथमिक शाळा, प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा असे शैक्षणिक उपक्रम राबवित असतात. (केवळ पूर्व-प्राथमिक शालेय उपक्रम राबविणाऱ्या संस्था असतात, पण त्यांचे प्रमाण तुलनेने कमीच आहे.) शिक्षण संस्थेचे कार्यकारी मंडळ, संस्थेशी निगडीत शाळेच्या विविध समितींच्या सहाय्याने संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत असते. पूर्व-प्राथमिक शाळेच्या समितीत संस्थेच्या कार्यकारिणीतील अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापिका आणि शिक्षिक यांचा समावेश असतो.
संस्थेचे कार्यकारी मंडळ शाळेच्या दैनंदिन कामात नेहमीच सक्रिय नसते, परंतु शालेय समितीच्या कामकाजावर लक्ष ठेवून असते. पूर्व-प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका इतर शिक्षिकांच्या मदतीने दैनंदिन कामकाज व्यवस्थितरीत्या चालविण्यास जबाबदार असतात. संस्थेच्या कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली, नियमावलीनुसार आणि आखून दिलेल्या परिघात राहून मुख्याध्यापिका जबाबदाऱ्या पार पाडत असतात. यासाठी त्यांना शाळेतील शिक्षिका आणि सेविका मदत करत असतात.
प्रवेश प्रक्रियेतील मुख्याध्यापिकेची जबाबदारी
- मुलांच्या पालकांना शालेय प्रवेशाबाबत संपूर्ण माहिती सविस्तरपणे द्यावी.
- मुलांच्या प्रवेशासाठी आलेल्या पालकांना तीच तीच माहिती देत असताना, अजिबात कंटाळा करू नये आणि संयम ठेवून अगदी शांत राहून पालकांशी संवाद साधावा.
- पालकांच्या शंकांचे व्यवस्थित निरसन करून त्यांना यथायोग्य मार्गदर्शन करावे.
- कधी कधी काही पालक प्रवेशाची वेळ संपल्यावर येऊ शकतात. अशा वेळेस न रागावता त्यांची अडचण समजून घ्यावी आणि त्यांना मार्गदर्शन करावे. असे केल्यास पालक खूश होऊन त्यांचे शाळेबद्दल मत सकारात्मक होते.
- शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या तसेच सर्वच दृष्टिकोनातून विचार केल्यास अधिकाधिक प्रवेश देणे हितकारक असल्याने मुख्याध्यापिकेने प्रवेशाची जबाबदारी अगदी चोख बजावावी.
शिक्षिकेची प्राथमिक जबाबदारी
मुलांशी अत्यंत मृदू भाषेत बोलणे तसेच त्यांच्याशी वागताना चेहरा नेहमी प्रसन्न आणि हसरा ठेवणे, ही शिक्षिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. यामुळे मुलं शाळेत लवकर रमतात. मुलांना शिक्षिका आपल्या आईसारख्या वाटायला लागतात आणि मुले अशा शिक्षकांना कधीच विसरत नाहीत. (हे मी स्वानुभवाने सांगत आहे.)
सेविकेची स्वच्छतेची जबाबदारी
सेविकेचे काम मुख्यतः मुलांच्या स्वच्छतेशी निगडित असते. अशा कामाचा सेविकेने किळस वाटू न देता मनापासून स्वीकार करावा. किंबहुना, सेविकेची निवड करताना मुख्याध्यापिकेने ही बाब आवर्जून लक्षात ठेवावी.
विद्यार्थी केंद्रस्थानी
मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि सेविका, या तिघींनी मनाशी कायमची खुणगाठ बांधावी की, विद्यार्थी हा शाळेच्या केंद्रस्थानी असतो. या तिघींनी ही मूलभूत बाब लक्षात ठेवून शाळेच्या कामकाजाशी संबंधित विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आपापल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्यात. अशा विचारधारेवर चाललेली शाळा हमखास नावारूपास येते.
शाळेच्या आणि घरच्या जबाबदारींमध्ये समतोल
तिघींनी एक गोष्ट कटाक्षाने पाळावी ती अशी की, आपल्या वैयक्तिक चिंता आणि काळज्या शाळेबाहेर ठेवूनच शाळेत प्रसन्न चित्ताने यावे. तद्वतच शाळेतील कामात येणारे ताणतणाव घरी नेऊ नयेत. थोडक्यात, तिघींनी घर आणि शाळा या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवाव्यात. सर्वार्थाने असे करणे नितांत गरजेचे आहे. हे सुरुवातीला जरा अवघड वाटू शकेल परंतु प्रयत्नांती सहजशक्य होईल.
हेही वाचा – पालकांची जबाबदारी : नीटनिटकेपणा अन् स्पर्धेसाठी प्रोत्साहन
या तिघींनी आणखीन एक बाब लक्षात ठेवावी. आपली मुलं ज्या शाळेत जातात, तेथील शिक्षिका आणि सेविका यांनी आपल्याशी पालक म्हणून कसे वागावे, अशी आपली अपेक्षा असते, तसेच आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी वागावे.
या पुढील लेखांमधे या विषयावरील एका मागोमाग एक मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्याचा माझा मानस आहे.
क्रमश:
(लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान केले. तसेच लेखिका योग अभ्यासक असून त्या नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. शिवाय, निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. संकल्पनेच्या सविस्तर तपशीलासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)
मोबाईल – 9881943593