अर्चना कुलकर्णी
(शिक्षक दिन विशेष)
टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाकडे पहात मी विचार करीत होते, “या पुस्तकाच्या देवाण-घेवाणीच्या मागे काय रहस्य असेल?”
नववी ‘ब’मधील सचिन सारंगच्या आईचे मला फार कौतुक वाटत होतं. त्याचं असं झालं, सचिनची आई रोज दुपारी घरी त्याचे दप्तर नेहमी पाहात असत. त्यामुळे त्यांना त्या दिवशी वर्गात काय शिकवलं, काय गृहपाठ दिला आहे,, याची माहिती मिळत असे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नेहमीप्रमाणे दुपारी त्याचे दप्तर पाहिले त्यावेळी त्यांना ‘एक होता कार्व्हर’ हे कोरे करकरीत पुस्तक त्यात दिसलं. त्यांनी ते पुस्तक पुन्हा दप्तरात ठेवलं. ते पुस्तक सचिन स्वतः दाखवतो का, हे त्यांना पाहायचं होतं. विशेष म्हणजे, त्या दिवशी रात्रीच सचिनने त्यांना ते पुस्तक दाखवलं. ते पुस्तक त्याच्याकडे कसं आलं, याचा सविस्तर वृत्तांतही त्याने आईला सांगितला.
पालक आणि मुलं यांच्यात मनमोकळा संवाद असावा, याबाबत सचिनच्या आई आग्रही होत्या. पालक शिक्षक संघाचे सभेत त्यांनी दोन-तीन वेळा हा विषय बोलूनही दाखवला होता. ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाच्या त्या प्रतीची कथा खूपच मनोरंजक होती. सचिनच्या वर्गातील नीरज जोशीने त्याला हे वाचनीय, कोरे करकरीत पुस्तक केवळ 25 रुपयांत दिलं होतं. हा व्यवहार सचिनच्या आईला खटकला. हे सर्व शाळेतल्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना समजलंच पाहिजे, असं त्यांना वाटलं… त्यानुसार त्यांनी ते पुस्तक काल माझ्या केबिनमध्ये आणून दिलं आणि त्या मागची कथाही सांगितली!
उत्कृष्ट पालक, आदर्श पालक हा पुरस्कार देण्याची प्रथा आपल्याकडे अजून सुरू झालेली नाही अन्यथा सचिनच्या आईला निर्विवादपणे ‘आदर्श पालक’ पुरस्कार प्रदान केला गेला असता हे नक्की.
दुसऱ्या दिवशी सकाळी नववीचे वर्गशिक्षक विजय मराठे आणि शिस्त पालन समितीचे प्रमुख सुधीर माने यांच्याशी मी याबाबत चर्चा केली. चर्चेत ठरल्याप्रमाणे शोधकार्य सुरू झाले. दोन दिवसांनी माझ्या टेबलावर 13 कोरी पुस्तक आली. सर्व पुस्तक वर्गातील मुलांनी नीरज जोशीकडून मूळ किमतीपेक्षा फार कमी किमतीत विकत घेतली होती. वर्गशिक्षकांनी सोबत तक्ताच करून आणला होता पुस्तकाचं नाव, पुस्तकाची मूळ किंमत, जोशीने घेतलेली किंमत, पुस्तक विकत घेणाऱ्याचे नाव. ती यादी पाहून मी थक्क झाले!
एक म्हणजे सर्व पुस्तके खूप चांगली होती, वाचनीय होती… नव्हे, मुलांनी वाचलीच पाहिजे, इतकी चांगली होती. दुसरी गोष्ट, मूळ किमतीच्या मानाने खूपच कमी किमतीत ती मुलांनी विकत घेतली होती. तिसरी गोष्ट, सर्व पुस्तके नवीनच होती. त्या पुस्तकांची जी माहिती वर्गशिक्षकांनी दिली, ती माझ्या कल्पनेच्या पलीकडे होती!
नीरजला वाचनाची खूप आवड होती, दादरच्या मॅजेस्टिक बुक डेपोमध्ये तो पुस्तक वाचण्यासाठी नियमित जात असे. तेथील दालनामध्ये अनेक नवीन जुनी चांगली पुस्तके प्रदर्शित केलेली असतात. ‘या, बसा, वाचा आणि आवडल्यास विकत घ्या’ या तिथे लिहिलेल्या तत्वानुसार बरेच वाचक तिथे भेट देत असतात.
तिथं बसून नीरज नवनवीन पुस्तके चाळायचा, वाचायचा. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना त्याचे फार कौतुक वाटायचं. त्या सर्वांचा त्याच्यावर खूप विश्वासही होता. ‘आपल्यावर सर्वांचा खूप विश्वास आहे. आपल्यावर त्यामुळे येथील कोणतेही काका लक्ष ठेवत नाही,’ याची त्याला खात्री होती… याचा फायदा घेऊन नीरज अधून मधून एखादं पुस्तक शर्टात टाकून किंवा दप्तरात घालून घरी आणायचा. ते पुस्तक पूर्ण वाचल्यावर कमी किमतीत मित्रांना विकायचा. त्यातून त्याचा कॅन्टीनमध्ये वडापाव, समोसा खाण्याचा खर्च निघायचा.
हेही वाचा – शिक्षा नको, सुसंवाद हवा
नीरजचे आई-वडील नोकरीमुळे सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत घराबाहेर असायचे. घरातील सर्वजण आपापल्या कामात मग्न असतात, त्याच्याकडे कोणाचेच फारसं लक्ष नसायचं… सुदृढ प्रकृती आणि खाण्याची अत्यंत आवड यासाठी त्याला पैसे लागायचे. आई-बाबा त्याला पॉकेटमनी द्यायचे पण कॅन्टीनचा खर्च त्यात भागत नव्हता. म्हणून हा सर्व उपदव्याप त्याने सुरू केला. या सर्व प्रकरणाचा शेवट कसा करायचा, यावर आम्ही सविस्तर चर्चा केली.
दुसऱ्या दिवशी प्रथम, पुस्तके विकत घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या केबिनमध्ये बोलावलं. सर्वजण घाबरून उभे होते… मी त्यांना म्हटलं, “घाबरू नका. तुम्ही कोणीही गुन्हा केलेला नाही. खरं म्हणजे, मला एका गोष्टीचा आनंद होत आहे की, तुम्हाला चांगलं पुस्तक कोणतं हे कळतं आणि वाचावसं वाटतं… शिवाय ते वाचण्यासाठी पैसे खर्च करून विकतही घ्यावसं वाटतं… तुम्ही सगळ्यांनी एक चांगलं पुस्तक वाचण्यासाठी थोडे तरी पैसे आपल्या पाकिटातून खर्च केले पण, यामध्ये तुम्ही एक मोठी चूक केली. तुम्ही चोरीचे पुस्तक विकत घेतलं. नीरजने ही सर्व पुस्तक चोरून आणली आहेत, हे तुम्हाला माहीत होतं ना? खरंतर, चोरून आणलेलं पुस्तक विकत घ्यायला पहिल्यांदाच ठामपणे नकार मिळाला असता तर, निरजने दुसरे पुस्तक चोरून आणण्याचा विचारच केला नसता. तुम्हाला पटतंय मी काय म्हणते ते?”
सर्वांनीच मानेने होकार दिला. माझ्या आवाजाची धार वाढवून मी म्हणाले, “यापुढे या विषयावर कोणीही, कधीही, काहीही बोलणार नाही. हे असं झालं नाही तर, तुमच्या सर्वांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर ‘चोरी करण्यास मदत केली,’ असा शेरा लाल अक्षरात लिहिला जाईल… त्यातलाच एक चुणचुणीत मुलगा लगेच बोलला, “नाही मॅडम! आम्ही कधीच बोलणार नाही.” त्याची री सर्वांनी ओढली.
या सगळ्यांना वर्गात पाठवल्यावर नीरजला केबिनमध्ये बोलावलं. खाली मान घालून हुंदके देत नीरज आमच्यासमोर उभा राहिला. थोडा वेळ असाच गेला…
“रडू नको. मी तुला रागवणार नाही.”
हे माझं वाक्य ऐकून नीरज चमकलाच. त्याला हे सर्वस्वी अनपेक्षित होतं.
मी पुढे बोलले, “नीरज, तू खूप चांगला, हुशार मुलगा आहेस… तुला पुस्तके वाचायला आवडतात ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. पुस्तक निवडीची तुला चांगली समजही आहे. ही सुद्धा कौतुकाची बाब आहे.”
नीरजने शर्टाच्या बाहीने डोळे पुसले आणि विश्वासाने माझ्याकडे पहात माझं बोलणं ऐकू लागला. मी बोलले, “इतकी चांगली समज, इतके चांगले विचार आहेत; पण त्याला चोरीच्या सवयीची जोड असेल तर सर्व गुण निष्फळ ठरतात. आपल्या शाळेच्या वाचनालयात खूप चांगली चांगली पुस्तकं आहेत. तुला हवी तितकी पुस्तकं घेऊन जा. एखादं नवीन पुस्तक आणायचं असेल तर, आपल्या शाळेशेजारील दुकानातून शाळेच्या नावावर वाचनालयात आण… आम्ही दुकानात तशी सूचनाही देऊ. पुस्तक चोरण्याचा मात्र पुन्हा कधीही विचार मनात आणू नकोस.”
हेही वाचा – नात्यांची दिवाळी
मग त्याचे वर्गशिक्षक विजय मराठे पुढे आले आणि म्हणाले, “तुला जेव्हा वडापाव, समोसा, इडली खायची इच्छा होईल तेव्हा, माझ्याकडून केव्हाही पैसे घे… जा आता वर्गात.”
नीरज परत जायला निघाला. त्याने मानेने होकार दिला आणि तो वळला… मी गंभीर आणि करड्या आवाजात त्याला थांबवलं. माझा अचानक बदललेला सूर ऐकून नीरज चमकला आणि मागे वळला.
“एक लक्षात ठेव नीरज, ही तुला पहिली आणि शेवटची माफी. यापुढे तुझ्याकडून एक जरी चूक झाली तर, तुला इतकी कठोर शिक्षा होईल की, शिक्षा किती भयंकर असते, हेही तुला समजेल. नीरज डोळ्यातलं पाणी शर्टाला पुसत पुसत काहीही न बोलता केबिन बाहेर पडला.
“मराठे, माने तुम्ही फार छान हाताळले हे प्रकरण. काही चांगलं करायचं असेल तर, सर्वांचं सहकार्य, कष्ट आवश्यक असतात. केवळ तुमच्यासारख्या शिक्षकांमुळेच हे शक्य झालं… एक चांगला मुलगा वाईट मार्गावरून परत आला… पुढील सहा महिने शिस्त पालन विभागातून ‘ऑलवेल’ चा फीडबॅक येत होता. काही दिवसानंतर नीरजच्या आईला कार्यालयात बोलावून सगळी हकीकत सांगितली आणि सल्ला दिला,
“त्याला रागावू नका अथवा शिक्षाही करू नका. मात्र विश्वासात घ्या. पुरेसे पैसे द्या. त्याला खाण्याची आवड आहे, त्याची जाणीव ठेवून घरी वेगवेगळे आणि चांगले पदार्थ खाऊ घालण्याचा प्रयत्न करा…”
अशा रीतीने आम्ही तो विषय तिथेच संपवला. नंतर ते सर्व विद्यार्थी दहावीत गेले. दहावीच्या रिझल्टचा दिवस होता तो… नीरज दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झा, ला… मार्कशीट घेऊन माझ्या केबिनमध्ये आला, पेढ्यांचा बॉक्स माझ्यासमोर करत मार्कशीट माझ्या हातात दिली. पेढ्याचा तुकडा तोंडात टाकत मी मार्कशीटवरून नजर फिरवली…
“शाब्बास..! छान मार्क मिळाले हो तुला.”
मार्कशीट परत घेऊन त्याने मला वाकून नमस्कार केला. काही क्षण तो माझ्याकडे पाहात होता. त्याचे डोळे भरून आले होते… जणू शब्दांशिवाय ते सांगत होते… “थँक्यू मॅडम..!”