भाग – 1
मी कुंती, तसे माझे जन्मनाव पृथा… माझे पिता शूरसेन महाराजांनी दिलेले! पण त्यांच्या आतेभावाला कुंतीभोज महाराजांना मला दत्तक दिल्यामुळे त्यांच्या नावावरून मला ‘कुंती’ हे नामानिधान प्राप्त झाले. राजघराण्यात जन्म होऊनही आणि दत्तक राजकन्या असूनही मला त्या राजवैभवात कधी जास्त रमावेसे नाही वाटले… लहानपणापासूनच मी थोडी विरक्त स्वभावाची होते. जेव्हा बाबांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी मला लहानपणीच कुंतीभोज महाराजांना दत्तक दिले तेव्हापासूनच माझ्या बालसुलभ मनामध्ये अनेक प्रश्न उभे रहिले होते, दत्तक म्हणजे काय असतं? हे समजण्याचे माझे वयही नव्हते. ज्या आईच्या उदरात मी नऊ महिने वाढले, तिने काहीच प्रतिकार केला नसेल का बाबांना? का तिच्या मातृत्वाला, ममतेला न जुमानता आपला शब्द पूर्ण करण्यासाठी बाबांनी मला दत्तक दिले असेल? अशा अनेक प्रश्नांच्या भेंडोळयात मी कायमच अडकलेली असायची! कदाचित त्याचमुळे जशी परीस्थिती असेल त्याला स्वीकारण्याची सवय मी स्वतःला लावून घेतली असावी… त्यामुळेच मी कधीच बालीश हट्ट केले नाही, रुसवेफुगवे मला माहिती नव्हते. मनामधील प्रश्न अनुत्तरीतच होती. माझ्यामध्ये विरक्तीचे विचार लहानपणापासूनच ठाण मांडून बसले होते.
मी जरी कुंतीभोज बाबांची दत्तक कन्या होते तरीही माझ्यावर त्यांचे अपार प्रेम होते. मला कोणत्याच गोष्टींची उणीव नव्हती. लौकिकार्थाने मी खूप सुखात होते. पण माझे हे सुख फार काळ टिकणार नव्हते… क्षत्रिय कुळात जन्मले असल्यामुळे आणि राजकन्या असल्याने मला सगळे राजकीय शिष्टाचार अवगत होते. अवतीभवती सगळे लोक राजकीय असल्याने राजकारण पण कळत होते, शिवाय माझे शिक्षणसुद्धा क्षत्रिय धर्माला अनुसरूनच होते. हळूहळू मी ‘पृथा’ला विसरून ‘कुंती’च्या व्यक्तिमत्वाला कधी आपलेसे केले, ते माझे मलाच कळले नाही. लहानगी पृथा कुंतीच्या वलयात कधीच विरून गेली होती…
दिवसांमागून दिवस सरत होते, मी आता सतरा वर्षांची उपवर तरुणी होते… योग्य वर मिळताच माझा विवाह एखाद्या राजघराण्यात होणार होता. पण काही लोकांचे आयुष्य सरळ मार्गी नसतंच मुळी! मीपण त्यातील एक होते… कदाचित अशातूनच मोठे मोठे इतिहास घडत असतील.
हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…
एकदा बाबा कुठलेतरी युद्ध जिंकून आले होते आणि त्याचा विजयोत्सव मोठ्या धुमधडाक्याने साजरा केला जात होता. मीपण बाबांबरोबर रथावर आरूढ होऊन, नगरात काढलेल्या शोभायात्रेत सामील झाले होते. सगळे नागरिक आपल्या विजयी राजाला डोळे भरून पहाण्याकरिता चौकांवर, रस्त्यावर गोळा झाले होते, आमची मिरवणूक राजप्रासादाजवळ आली असेल तोच एखादा निखारा अंगावर पडावा तसे शब्द कानावर पडले, “कसला उन्माद आहे हा? कशासाठी एवढे उन्मुक्त झाले आहेत सगळे की, त्या जल्लोषात आमच्या आगमनाची दखलसुद्धा घेतली जात नाही?” बाबांसकट आम्ही सगळेजण स्तिमीत झालो! क्षणभर कोणालाच काही समजेना, तेवढ्यात बाबा पटकन रथावरून खाली उतरले आणि प्रासादाजवळ उभ्या असलेल्या एका ऋषींचे पाय पकडून त्यांची क्षमा मागू लागले. मला ते पाहून खूपच राग आला, मी बाबांजवळ जाऊन त्या ऋषींना काही विचारणार, तोच बाबांनी माझा हात हाती घेऊन डोळ्यांनीच मला तसे काही न करण्याबद्दल सुचवले… तशी मी गप्प झाले. मग नंतर मला कळले की, ते अत्यंत कोपिष्ट दुर्वास ऋषी होते. जे खूप महान तपस्वी होते. ते तिथे निवासाकरिता थांबणार असल्यामुळे त्यांची मनोभावे सेवा करण्याचा आदेश बाबांनी मला दिला. पण याच सेवेचे फळ मला लाभदायक ठरणार होते की, नव्हते हे येणारा काळच सांगणार होता!
सृष्टीनिर्मात्याने काळाचे चक्र निर्माण करून मनुष्य जातीला आपल्या नियंत्रणात ठेवले होते… भविष्यात घडणाऱ्या गोष्टी जर मनुष्याला आधीच कळल्या असत्या तर, तो अनियंत्रित झाला असता. निसर्गनियम पायदळी तुडवित निघाला असता. असो, तर दुर्वास ऋषींचा मुक्कामाला आता पंधरा दिवस होऊन गेले होते… मी त्यांना हवनाकरिता लागणारी सामग्री फुले, पंचामृत, तेल, तूप, गंध, धूप, दीप यांची चोख व्यवस्था ठेवली होती. त्यांच्यासाठी सात्विक भोजन रोज मी स्वतः बनवत असे… हळूहळू एक महिना होत आला, दुर्वास ऋषींचे आमच्याकडील कार्य पूर्ण झाले होते. ते आता दुसरीकडे प्रस्थान करणार होते, परंतु त्याआधी त्यांनी मला आपल्या जवळ बोलावून सांगितले, “मुली, तू माझी जी अनन्यभावाने सेवा केली आहेस. त्याकरिता मी प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान म्हणून एक दिव्य मंत्र सांगणार आहे. या मंत्राचा उच्चार करून तुला आवडणाऱ्या देवता पुरुषाद्वारे तू दिव्य पुत्र प्राप्त करू शकशील… जे तेजस्वी, महापराक्रमी असतील, तथास्तु.” मला काही कळायच्या आतच दुर्वास ऋषी तेथून निघूनही गेले. मी मनाशीच त्या मंत्राचा उच्चार करत बसले…
जेव्हापासून मला दिव्य मंत्राचे हे वरदान मिळाले होते, तेव्हापासूनच मला त्या मंत्राची प्रचीती घेण्याची तीव्र इच्छा होत होती… नव्हे, दिवसेंदिवस बळावत चालली होती. माझ्या डोक्यात त्या मंत्राने थैमान घातले होते. मनात विचार चालले होते की, दुर्वास मुनींनी मला तो मंत्र असाच नसेल दिला, त्यामागे नक्कीच काहीतरी प्रयोजन असणार! ते त्रिकालज्ञानी होते, कदाचित माझ्या भविष्यात पुढे येणाऱ्या घटना त्यांना आधीच दिसल्या असतील. मी अत्यंत बेचैन झाले होते. कधीकधी उतावीळपणाने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम फार दूरगामी असतात, हे माहीत असूनही मागचा पुढचा विचार न करता केवळ कुतूहल म्हणून त्या मंत्राची प्रचिती घेण्याचा आपल्या मनाशी निर्णय केला.
मी रोज सूर्याला सकाळ, संध्याकाळ अर्घ्यदान करायचे. त्या तेजोमय भास्कराचे मला नेहमीच आकर्षण वाटत आले होते. त्या दिवशी पण मी संध्याकाळी अर्घ्य द्यायला गेले आणि त्या तेजोनिधीकडे पाहताच तो दिव्य मंत्र म्हणण्याची तीव्र इच्छा झाली… मी अर्घ्य देऊन, हात जोडले आणि डोळे बंद करून त्या वशीकरण मंत्राचे उच्चारण करू लागले, थोड्याच वेळात माझ्याभोवती डोळ्यांना दिपवणारा प्रकाश पसरला… मी डोळे उघडले तर समोर साक्षात सूर्य देवता उभे होते! मी भांबावुन गेले होते. त्यांना मी कशाकरिता आवाहन केले होते, ते सांगितले आणि लगेच विनवणी पण केली की, “ही चूक माझ्याकडून केवळ कुतूहल म्हणून घडली होती. मी कुमारीका असल्याने मी अशाप्रकारे मातृत्व स्वीकारू शकत नाही, तेव्हा आपण मला माफ करा.” पण त्यांनी ते अमान्य करत सांगितले की, “पृथा, हा अमोघ मंत्र आहे आणि मी तो स्वीकारला नाही तर, दुर्वास ऋषींच्या तपोबलाचा अपमान होईल आणि त्यामुळे सर्वनाश ओढावेल, मी तुला वचन देतो की, तुझे कौमार्य अबाधित राहील. माझ्यापासून उत्पन्न झालेला हा पुत्र माझेच कवच-कुंडले धारण करून असेल. तुला जनमानसात गौरवाचे स्थान प्राप्त होईल. तुला कुठल्याही लांछनास्पद गोष्टींना सामोरे जावे लागणार नाही.”
माझे डोळे आपोआप बंद झाले होते. सगळे अवयव चैतन्यमय झाले होते… एका दिव्य अनुभूतीतून मी जात होते… मला काहीच ऐकू येत नव्हते… थोड्या वेळाने मी भानावर आले तर माझ्या मांडीवर कवच-कुंडलधारी तेजस्वी बाळ होते. सूर्यदेवांनी दिव्य मंत्र अनुसरून ते बाळ मला सोपवून ते आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले होते! मी खूपच घाबरले होते. कोणाला कळले तर काय होईल? आई-बाबांनी विचारले तर, काय सांगावे? कोण माझ्यावर विश्वास ठेवणार होतं? माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला होता! काय करावे ते सूचत नव्हते… पण मला यातून मार्ग काढावाच लागणार होता. मी सावरले आणि माझ्या अत्यंत विश्वासू दासीकडून एक पेटी मागवली. त्या पेटीत बाळाला ठेवून आम्ही दोघींनी भुयारी मार्गाने जाऊन ती पेटी नदीच्या पात्रात मोठ्या जड अंतःकरणाने सोडून दिली. माझा अपराध लपवण्यासाठी त्या निष्पाप बाळच्या जीवाशी मी खेळले होते… हा माझ्या काळ्या कृत्याचा काटा माझ्या हृदयात कायमचा रुतला गेला होता. मी गुन्हेगार होती त्या बाळाची कायमची!
हेही वाचा – …अन् सुलोचना ताईला मोक्ष मिळाला!
असं म्हणतात की, काळ हा दुःखनिवारक औषध आहे. समोर सरकणाऱ्या काळाबरोबर होऊन गेलेल्या घटनांचा विसर पडतो. मीपण काळाच्या ओघात ही घटना विसरुन गेले. त्यानंतर दोन ते तीन वर्षांतच बाबांनी माझे स्वयंवर ठरवले, स्वयंवराच्या वेळेस मी आमंत्रित सम्राटांपैकी हस्तिनापूर नरेश पांडू, पांडवराज यांच्या गळ्यात वरमाला टाकून हस्तिनापूरची सम्राज्ञी झाले. खूप आनंदात होते मी…
हस्तिनापुरची सम्राज्ञी होणे माझ्यासाठी खूप भाग्यशाली होते. पण तरीही मन बेचैन होतं, भविष्यात डोकावून पाहता आले असते तर, किती तरी समस्यांवर मात करता आली असती!
(क्रमश:)


