रश्मी परांजपे
मागील लेखात आपण ‘विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी’ या विषयाची सुरुवात प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी या मुद्द्यापासून केली. या लेखात आपण प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी याबाबत जाणून घेणार आहोत. शालेय वर्ष जूनमधे सुरू होते आणि प्रवेशप्रक्रिया साधारणतः जानेवारी / फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. शाळेत एकंदर किती प्रवेश द्यायचे हे ठरवले जाते आणि त्यापैकी बरेच प्रवेश एप्रिल महिन्यात पूर्ण होतात. प्रवेशाच्या काही जागा राखून ठेवाव्या लागतात. अशा जागा तसेच नियोजित प्रवेश संख्येतील उर्वरित जागा यांचे प्रवेश शाळा सुरू होण्याच्या वेळेस पूर्ण केले जातात. एप्रिल महिन्याच्या अखेरीस प्रवेश पूर्ण झालेल्या मुलांच्या पालकांना माहितीपत्रक घेण्यासाठी बोलवावे लागते.
आता आपण माहितीपत्रकात कोणते मुद्दे असणे आवश्यक आहे, याबाबत जाणून घेऊयात. प्रत्येक मुद्दा ठरवत असताना संबंधित बाबींचे विवेचन देखील मुद्द्याखाली दिले आहे, जेणेकरून माहितीपत्रक तयार करणे सुकर होईल.
शाळा सुरू होण्याची तारीख
पूर्व-प्राथमिक शाळा जर प्राथमिक शाळेला जोडलेली असेल तर, प्राथमिक शाळा सुरू होण्याची तारीख ध्यानात घेऊन पूर्व-प्राथमिक शाळा सुरू करावी लागते. शक्यतो शाळा जून महिन्याच्या पहिल्या / दुसर्या सोमवारी सुरू करण्याची प्रथा आहे, परंतु सोमवारी शासकीय सुट्टी असेल तर शाळा पुढील दिवशी सुरू केली जाते.
हेही वाचा – विद्यार्थी प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी
शाळेची वेळ आणि रोजचा कालावधी
शाळेतील उपलब्ध वर्ग तसेच सध्या लागणारे वर्ग आणि पूर्व-प्राथमिक शालेय प्रवेश लक्षात घेऊन एकूण लागणारे वर्ग या सर्व बाबी ध्यानात घेऊन पूर्व-प्राथमिक शाळेचे वर्ग सकाळी अथवा दुपारी घेतले जातात. त्यानुसार शाळा सुरू होण्याची तारीख, वार आणि वेळ माहितीपत्रकात अचूक नमूद करणे गरजेचे आहे.
शाळेतील वर्गाचा रोजचा कालावधी साधारणतः तीन तास असतो. शाळेत नव्याने येणारी मुलं सुरुवातीला साहजिकच बावरतात आणि रडतात, तथपि यथावकाश शाळेत रूळतात. म्हणूनच सुरुवातीला कालावधी एक तास ठेवला जातो, नंतर दोन तास आणि तद्नंतर तीन तास करण्यात येतो. यानुसार माहितीपत्रकात योग्य उल्लेख करणे देखील आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांचा गणवेश
विद्यार्थी मुला-मुलींचा गणवेश कसा असावा, हे शाळा ठरवतात. तसेच शाळा गणवेश खरेदीबाबतचे धोरणही ठरवतात. शाळा दुकानातून गणवेश घेते आणि पालक शाळेकडून रक्कम देऊन गणवेश घेतात किंवा शाळा पालकांना ठराविक दुकानांतून परस्पर गणवेश घेण्यास सांगतात. काही शाळा गणवेशासाठी विद्यार्थ्यांचे माप घेऊन गणवेश शिवून घेतात आणि पालकांकडून शुल्क घेऊन गणवेशाचे वाटप करतात. शाळेच्या नियोजनानुसार माहितीपत्रकात याबाबत स्पष्ट सूचना देणे आवश्यक आहे. तसेच, आठवड्यातील कोणत्या दिवशी विद्यार्थ्यांनी गणवेश घालणे आवश्यक आहे आणि कोणत्या दिवशी गणवेशाएवजी इतर वेश घातल्यास चालेल, हे देखील माहितीपत्रकात नमूद करावे.
हेही वाचा – विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी
विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्र
शाळेच्या पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांजवळ ओळखपत्र असणे आवश्यक करावे. ओळखपत्रावर विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, पत्ता, आईवडिलांचे मोबाइल नंबर, शाळेत येण्या-जाण्यासाठी रिक्षा / टेंपो / बस अशी सोय केली असल्यास वाहनचालकाचे नाव आणि मोबाइल नंबर इत्यादी बाबींचा स्पष्ट उल्लेख असावा.
विद्यार्थ्याजवळ ओळखपत्र नसेल तर, शाळेत प्रवेश नाकारण्याचा हक्क राखून ठेवावा. सुरुवातीला मुलं नाव सांगू शकतीलच ही खात्री नसते, तसेच काही विद्यार्थ्यांची उपस्थिती ओळखपत्रावरूनच नोंदवावी लागते… आणि म्हणूनच शाळेने ओळखपत्राबाबत आग्रही राहावे.
माहितीपत्रकात समाविष्ट करावयाचे पुढचे मुद्दे आपण पुढील लेखात जाणून घेऊयात.
क्रमश:
(लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान केले. तसेच लेखिका योग अभ्यासक असून त्या नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. शिवाय, निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. संकल्पनेच्या सविस्तर तपशीलासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)
मोबाईल – 9881943593


