स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये पौष्टिक नूडल्स, चटपटीत शेवेची भाजी आणि मिरिंडा केक बनवतानाच्या काही टीप्स पाहूयात –
- मॅगी किंवा नूडल्स करताना गृहिणी गाजर, कोबी, ढोबळी मिरची, बिन्स वगैरे भाज्या घालतातच; परंतु नूडल्स कडधान्ये, डाळी अथवा सोयाबीन भिजवलेल्या पाण्यात शिजवल्यास त्यांचे आहारमूल्य वाढून रुचकर चवीच्या होतात. नूडल्स वगैरे संध्याकाळी खाण्यासाठी करावयाचे असल्यास त्या दिवशी सकाळी आठवणीने डाळी, कडधान्ये, सोयाबीन थोडे जास्त पाणी घालून भिजवावेत आणि हे पाणी नूडल्स शिजविण्यासाठी वापरावे. भाज्याही नूडल्सबरोबरच शिजविल्यास मुलांनी भाज्या बाजूला काढल्या तरी, त्यांचे सत्त्व पाण्याबरोबर नूडल्समध्ये शोषले जातेच. नूडल्स जास्त चवदार लागते.
- शेवेची भाजी करताना एक वाटी जाड तिखट शेव घेऊन हाताने कुस्करून शेवेचे लहान लहान तुकडे करावेत. नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात शेव टाकावी. मंदाग्नीवर थोडीशी शेव परतून त्यात थोडे पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ, तिखट, गरम मसाला, कोथिंबीर, कढीलिंब घालून दोन-तीन मिनिटे भाजी उकळवावी. त्यातील शेव लगेच शिजून झटपट भाजी तयार होते. आवडत असल्यास भाजी शिजल्यावर थोडे लिंबू पिळावे. लहान-मोठ्यांना आवडणारी भाजी अचानक पाहुणे आले तरी झटपट होते.
हेही वाचा – Kitchen Tips : इडली ढोकळा, फिंगर चिप्स अन् बटाटेवडे…
- केक करताना नवशिक्या गृहिणींचा केक हमखास बिघडतो. वेळही वाया जातो. पण झटपट आणि हलक्या केकसाठी पुढील कृती करावी. मिक्सरमध्ये 3 अंडी, 125 ग्रॅम अमूल बटर, 125 ग्रॅम साखर याच क्रमाने घालून मिक्सर साखर विरघळेपर्यंत चालू करा. नंतर त्यात 125 ग्रॅम मैदा, एक टीस्पून बेकिंग पावडर (एकत्र करून तीन वेळा चाळलेली) टाकून मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्सर चालू ठेवा. (2 मिनिटे) त्यात इसेन्स घाला. हे मिश्रण तयार केलेल्या भांड्यात ओतून गरम ओव्हनमध्ये भाजा. केक अमूल बटरमध्ये केल्यामुळे अतिशय हलका होतो. मिक्सरमुळे झटपट होतो.
हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड…
- केकवर आयसिंग करताना त्यात दोन थेंब ग्लिसरीन मिसळा. त्यामुळे आयसिंगला चकाकी तर येतेच आणि कडक बनत नाही.
- केक करताना त्यात बेकिंग पावडर व सोडा न घालता मिरिंडा किंवा फँटा घालावे. साधारण दोन वाट्या मैद्याचा केक असेल तर अर्धी वाटी मिरिंडा किंवा फँटा घालावे. अगदी बेकरीतील केकप्रमाणे स्पाँजी होतो. फुगतो आणि रंगही छान येतो. शिवाय, चवही सुंदर लागते. विशेष म्हणजे, मिश्रण फेसावेही लागत नाही.
(‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)


