स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात –
- झटपट उप्पिटाचे मिश्रण असे बनवून ठेवा – उप्पिटासाठी वापरतो ते सर्व साहित्य घ्यावे. नेहमीप्रमाणे रवा थोड्या तेलावर खमंग भाजावा. फोडणी करून फोडणीत मोहरी, उडीदडाळ, लाल सुकी मिरची, हिंग आणि रवा घालून चवीनुसार मीठ घालून मिश्रण परतावे. थंड झाल्यावर पिशव्या भरून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. पाहुणे आल्यावर अगर प्रवासात चटकन दोन वाट्या पाणी उकळून एक वाटी मिश्रण घालून वाफ आणली की उप्पीट तयार होते. सर्व्ह करताना खोबरे, कोथिंबीर घालावी.
- ज्यावेळी आपण ढोकळा करतो, त्यावेळी तयार मिश्रण तेल लावलेल्या पसरट भांड्यात घालतो व ते भांडे कुकरमध्ये ठेवतो, पण काही वेळा ढोकळा मधूनच कच्चा होतो. काही वेळा भांडे वाकडे झाल्यामुळे वड्या लहान मोठ्या पडतात. म्हणून मिश्रण पसरट भांड्यात न घालता तेल लावलेल्या इडली पात्रात घालून त्याच्या इडल्या कराव्यात. हा इडली पात्रातील ढोकळा एकदम हलका होतो. बिघडत नाही. वरती खोबरे, कोथिंबीर घातल्यावर दिसायलाही आकर्षक दिसतो.
हेही वाचा – Kitchen Tips : खमंग भजी, दहिवडे, खुसखुशीत चकली बनवताना हे करून पाहा
- आपण घरी ज्या वेळेला फिंगर चिप्स करतो, तेव्हा ते तळून झाल्यावर मीठ, तिखट लावतो. तसे न करता या पद्धतीने करून पाहावे. प्रथम एक-दोन बटाट्यांच्या चिप्सना मीठ चोळून थोडा वेळ ठेवावे. त्याला पाणी सुटते. ते ताटात पूर्ण निथळून घ्यावे. पहिल्या चिप्स तळून होईपर्यंत परत एका बटाट्याच्या चिप्स करून त्याला हे मिठाचे पाणी चोळावे. प्रत्येक वेळेला तळायच्या आधी चिप्समधून पाणी काढावे. साधारण चार-पाच बटाट्यांना हे पाणी पुरते. खारेपणा माफक प्रमाणात येतो, चिप्स सारख्या तळल्या जाऊन कुरकुरीत होतात.
- बटाटेवड्याचे पीठ भिजवताना त्यात थोडेसे तुरीच्या डाळीचे वरण घालावे. त्यामुळे सोडा घातला नाही तरी चालतो. तसेच, पिठात थोडा भिजवलेला साबुदाणा घालावा. वडे तळल्यानंतर त्याला मोती लावल्याप्रमाणे दिसते. वडे आकर्षक दिसतात.
हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड…
- अर्धा किलो मुगाची डाळ, एक वाटी चवळीची डाळ, चार चमचे ओवा हे सगळे मिळून अगदी बारीक दळून आणावे. त्या पिठात मोहन घालून, चवीला तिखट, मीठ घालून भिजवावे. एक किंवा अर्धा तास ठेवून मग बारीक साच्यातून शेव घालून तळावी. ही शेव फारच हलकी होते आणि दिसायला फारच नाजूक असते. ज्यांना डाळीचे पीठ म्हणजे हरभरा डाळीचे पीठ सोसत नाही, त्यांना ही शेव चांगली. मुलांना तसेच म्हाताऱ्या माणसांना पचण्यास चांगली.
- कोणताही चिवडा करताना कांद्याची पात बारीक चिरून, धुऊन वाळवून फोडणीत घालावी. स्वाद चांगला लागतो आणि चिवड्यात मधूनमधून हिरवी पात दिसायला छान दिसते.


