सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् ।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ॥34॥
द्रोणाचा पाडु न करीं । भीष्माचें भय न धरीं । कैसेनि कर्णावरी । परजूं हें न म्हण ॥472॥ कोण उपायो जयद्रथा कीजे । हें न चिंतू चित्त तुझें । आणिकही आथि जे जे । नावाणिगे वीर ॥473॥ तेही एक एक आघवे । चित्रींचे सिंहाडे मानावे । जैसे वोलेनि हातें घ्यावे । पुसोनियां ॥474॥ यावरी पांडवा । काइसा झुंजाचा मेळावा । हा आभासु गा आघवा । येर ग्रासिलें मियां ॥475॥ जेव्हां तुवां देखिले । हे माझां वदनीं पडिले । तेव्हांचि यांचें आयुष्य सरलें । आतां रितीं सोपें ॥476॥ म्हणोनि वहिला उठीं । मियां मारिले तूं निवटीं । न रिगे शोकसंकटीं । नाथिलिया ॥477॥ आपणचि आडखिळा कीजे । तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे । तैसें देखें गा तुझें । निमित्त आहे ॥478॥ बापा विरुद्ध जें जाहलें । तें उपजतांचि वाघें नेलें । आतां राज्येंशीं संचलें । यश तूं भोगीं ॥479॥ सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद । ते वधिले विशद । सायासु न लागतां ॥480॥ ऐसिया इया गोष्टी । विश्वाचां वाक्पटीं । लिहूनि घाली किरीटी । जगामाजीं ॥481॥
संजय उवाच – एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी ॥
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥35॥
ऐसी आघवीचि हे कथा । तया अपूर्ण मनोरथा । संजयो सांगे कुरुनाथा । ज्ञानदेवो म्हणे ॥482॥
हेही वाचा – Dnyaneshwari : या बोला म्हणे अनंतु, मी कोण हें आहासी पुसतु
अर्थ
द्रोण, भीष्म, जयद्रथ आणि कर्ण तसेच इतरही युद्धातले वीर मी मारलेले आहेत. त्यांना तू ठार कर. भिऊ नको. युद्ध कर. प्रतिपक्षीयांना युद्धात तू जिंकशील. ॥34॥
द्रोणाची पर्वा करू नकोस. भीष्मांचे भय धरू नकोस आणि कर्णावर शस्त्र कसे चालवू, असे म्हणू नकोस. ॥472॥ जयद्रथाकरिता काय उपाय करावा, याविषयी तुझ्या बुद्धीला विचार करण्याचे कारण नाही. आणखी वरीलप्रमाणे जे नावाजलेले वीर आहेत, ॥473॥ ते देखील एक एक पाहिले तर, सर्वच भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पुसून घेण्यास योग्य आहेत, असे समज. ॥474॥ अर्जुना, अशी वास्तविक स्थिती असताना युद्धाचा समुदाय तो काय उरलेला आहे? हा सर्व नुसता आभास आहे. बाकी (बाहेरील देखाव्याशिवाय इतर बल, तेज वगैरे) सर्व मी नाहीसे केले आहे. ॥475॥ ज्यावेळेला तू हे सैनिक माझ्या तोंडात पडलेले पाहिलेस, त्याच वेळेला या सर्वांचे आयुष्य संपले. आत हे पोकळ सोपटाप्रमाणे राहिलेले आहेत. ॥476॥ म्हणून लवकर उठ. मी यास (आतून) मारले आहे आणि तू यास (बाहेरून) मार, आणि नसत्या शोकसंकटात पडू नकोस. ॥477॥ आपणच निशाण उभे करावे आणि आपणच त्यास कौतुकाने बाण मारून ते खाली पाडावे (यात जसे बाण हे निमित्तमात्र आहेत, त्याप्रमाणे या सर्वास मीच उत्पन्न केले आणि मीच मारले आहे). त्या बाणाप्रमाणे यात तू केवळ निमित्त आहेस. ॥478॥ बाबा अर्जुना, तुझ्या हिताला विरुद्ध असे जे काही एक उत्पन्न झाले होते, ते उत्पन्न होताक्षणीच वाघाने नेले. (उत्पन्न झाल्याबरोबरच ते नाहीसे झाले). आता (वाटेतील काटा आयताच निघाल्यामुळे) तुला मिळालेल्या राज्यासह यश तू भोग. ॥479॥ तुझे भाऊबंद स्वभावत:च गर्वाने फुगून गेले होते आणि जगामध्ये ते बलवान आणि मदोन्मत्त झाले होते. त्यास मुळीच आयास न लागता तू साफ नाहीसे केलेस. ॥480॥ अर्जुना, या जगामध्ये अशा या गोष्टी सर्व जगताच्या वाचारूपी पटावर लिहून ठेव. ॥481॥
संजय म्हणाला, श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून (भयाने) कापत असलेला आणि हात जोडलेला अर्जुन भयभीत होऊन, साष्टांग नमस्कार घालून पुन्हा श्रीकृष्णाला सगद्गदित वाणीने म्हणाला, ॥35॥
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याप्रमाणे ही सर्व हकीकत त्या मनोरथ पूर्ण न झालेल्या कुरुदेशाच्या राजाला (धृतराष्ट्राला) संजय सांगत आहे. ॥482॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं


