डॉ. किशोर महाबळ
गणित हा विषय बहुतांश विद्यार्थ्यांना नकोसा वाटतो. ज्या विद्यार्थ्यांना गणित चांगले येते त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते, मात्र ज्या विद्यार्थ्यांना गणित येत नाही, अशांना कायम कमी लेखले जाते. यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो आणि तो आयुष्यभर टिकून राहतो. त्याचे दूरगामी परिणाम त्यांच्या पुढील शिक्षणावर होतात. शिक्षणतज्ज्ञांच्या मते अभिनव आणि मनोरंजक पद्धतीने शिकविल्यास इयत्ता 10 वीपर्यंतचे गणित सर्व विद्यार्थी सहजगत्या शिकू शकतात. यासाठी शिक्षकांना विशेष प्रयत्न करावे लागतील. नव्या अभिनव पद्धती शिकाव्या लागतील. मात्र, असे न करता काही विद्यार्थ्यांना गणित येणारच नाही, असा शिक्षकांचा समज होतो आणि पालकांनाही तसेच वाटू लागते.
परीक्षेत तर गणित विषय असतोच. मग विद्यार्थ्याला गणितात काही आले नाही तरीही, त्याला वरच्या वर्गात पाठविले जाते. दहावीच्या परीक्षेत तर मग शाळा, शिक्षक, पालक, सर्वजण मिळून कोणत्याही मार्गाने या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी, मग अनेक अयोग्य मार्ग शोधले जातात. हे चुकीचे उद्योग करणे नीट जमले तर, विद्यार्थी परीक्षेत तर उत्तीर्ण होतात, पण खरेतर ही पळवाट असते आणि ती विद्यार्थ्यासाठी कायमची हानीकारक ठरते. एका विशिष्ट पातळीपर्यंत गणिताचे उत्तम ज्ञान घेतलेच पाहिजे. ते न घेता कसेतरी परीक्षेत उत्तीर्ण होण्यास महत्त्व दिले जाते, ही शोकांतिका आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला गणिताचे उत्तम शिक्षण मिळणे, हे त्याच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यावश्यकच असते हा महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षिला जातो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, गुणोत्तर यासारख्या गणितातील मूलभूत महत्त्वाच्या प्रक्रिया सर्व विद्यार्थ्यांना शिकविल्या गेल्याच पाहिजेत. कारण, या बाबींचा त्याला आयुष्यभर, प्रतिदिन, वारंवार उपयोग करावा लागणार आहे; तरच, तो सर्व आर्थिक व्यवहार नीट करू शकेल. नाही तर, तो वारंवार कोणत्या ना कोणत्या पद्धतीने नाडला जाणार, हे निश्चित! हे लक्षातच घेतले जात नाही. दुर्दैवाने या मूलभूत गोष्टी नीट न शिकताही असंख्य विद्यार्थी हे माध्यमिक वर्गापर्यंत पोहोचतात हा अनुभव आहे. या मूलभूत संकल्पनाच जर नीट शिकल्या नसतील तर या संकल्पनांवर, आधारीत अधिक कठीण संकल्पना विद्यार्थी शिकूच शकत नाही. कारण गणित विषयाचा अभ्यास आणि आकलन अत्यंत निम्न दर्जाचे झालेले असते.
हेही वाचा – शाळांमध्ये पाहिजे माहिती संकलन प्रकल्प
जॉन व्हॉन न्यूमन आणि ॲलन ट्युरिंग या दोन गणिततज्ज्ञांचा संगणकाच्या विकासात सर्वाधिक योगदान आहे. यावरून गणिताचे महत्त्व शिक्षक आणि पालक यांच्या लक्षात आले पाहिजे. जगभरातील नामवंत गणितज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांना गणित शिकण्याचे असंख्य फायदे संशोधनाअंती लक्षात आले आहेत. त्यांच्या मते गणिताचा अभ्यास करणे म्हणजे मेंदूच्या व्यायामशाळेत जाणे होय! गणितामुळे मेंदूचा उत्तम विकास होतो. मेंदूची शक्ती आणि क्षमता वाढते. गणितातील जितके गुंतागुंतीचे आणि कठीण प्रश्न सोडविण्याचा व्यक्ती प्रयत्न करते, तितकी मेंदूची क्षमता वाढतच जाते. गणिताचे अध्ययन हे मेंदूसाठी जणूकाही ब्रेड आणि लोणीच आहे, असे एका वैज्ञानिकाचे म्हणणे आहे! त्यांच्या मते गणिताचे ज्ञान असेल तर विज्ञानातील पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी तसेच तंत्रज्ञान या विषयांशी संबंधित असंख्य विषयांचे उत्तम ज्ञान मिळविता येऊ शकते; हे विषयही नीट समजून घेता येतात.
अर्थशास्त्रासारख्या सामाजिक शास्त्रातील संशोधनात गोळा होणाऱ्या सांख्यिकीय माहितीचे वर्गीकरण, विश्लेषण करण्यासाठीही गणिताचे उत्तम ज्ञान आवश्यक असते. या विविध विषयांतील आधुनिक संशोधन समजण्यासाठी आणि उत्तम दर्जाचे संशोधन करण्यासाठी गणिताचे उत्तम ज्ञान असणे, ही मूलभूत आवश्यक गोष्ट मानली जाते. गणित शिकल्याने आर्थिक व्यवहारांबद्दलचे तर्कसंगत निर्णय घेता येतात. विकासाच्या योजनांबद्दल, आर्थिक तरतूद, आर्थिक नियोजन, व्यवस्थापन, अंमलबजावणी, मूल्यांकन या सर्व गोष्टी कशा करायच्या हे गणितामुळेच निश्चित करता येते. तर्कशुद्ध विचार करण्याची तसेच तर्कशुद्ध पद्धतीने मते मांडण्याची सवय लागते. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता विकसित होते.
आरोग्य, कृषीक्षेत्रापासून ते अंतराळ विज्ञानापर्यंत कोणतेही विषय आज जर उत्तमरीत्या समजून घ्यायचे असतील तर, गणिताचे उत्तम दर्जाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे झाले आहे. तरच, पुढील उच्च दर्जाचे गणित शिकता येऊ शकते. गणितात अचूकतेला, पुराव्यांच्या आधारावर तर्कशुद्ध युक्तिवाद करण्यास अत्यंत महत्त्व असते. गणितात अनेकदा आलेख वापरले जातात त्यामुळे विषयाची खूप सारी माहिती चटकन समजू शकते. गणिताच्या अध्ययनामुळे समस्या निवारण करणे सोपे होते. समस्येमुळे घाबरून न जाता चिकाटीने त्या समस्येचे उत्तर शोधण्याची सवय लागते. यामुळे समस्या सोडविण्याची क्षमता वाढते. गणित हे एकाच प्रश्नाकडे विविध दृष्टिकोनातून बघायला शिकविते, त्यामुळे समस्येची अनेक उत्तरे लक्षात येतात. या असंख्य उत्तरातील योग्य ते आणि ज्याची अंमलबजावणी करता येईल, असे उत्तर निवडण्याची सवय लागते. ही सवय आयुष्यभर व्यक्तिला उपयोगी पडते.
आज गणितात असंख्य गुंतागुंतीच्या कठीण समस्या तसेच प्रश्नांचा विचार होत आहे. गणिताचे अभ्यासक सतत या कठीण प्रश्नांची सोपी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. गणितज्ज्ञांच्या या प्रयत्नांमुळेच विज्ञानाचा विकास होण्यास मदत झाली.
गणिताचे शिक्षण घेण्याचे हे काही निवडक फायदे इथे नोंदविले आहेत. यांचा विचार केल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला मूलभूत गणित उत्तमरीत्या शिकविले गेलेच पाहिजे आणि तेवढे गणित प्रत्येक विद्यार्थ्याला आलेच पाहिजे, असा विचार करण्याची गरज आहे. यात कोणतीही तडजोड करणे योग्य नाही हे सर्व शिक्षकांनी तसेच पालकांनी समजून घेण्याची गरज आहे. शाळेतील निवडक विद्यार्थ्यांना गणित समजणे पुरेसे नाही तर, सर्व विद्यार्थ्यांना ते कसे येईल, याचा विचार आपल्याला करायचा आहे. गणित शिकविण्याच्या असंख्य नवनवीन अभिनव मनोरंजक पद्धती शिक्षण तज्ज्ञांनी विकसित केल्या आहेत. त्या समजून घेऊन त्यांचा उपयोग शाळेतील सर्व मुलामुलींसाठी करावा लागेल.
हेही वाचा – Education : शिकण्याची नेमकी गरज काय?
गणिताची भीती घालविणे आणि तो विषय शिकण्याची विद्यार्थ्यांत आवड निर्माण करणे, हे आपल्यासमोरचे सर्वात महत्त्वाचे आव्हान आहे. गणितातील महत्त्वाच्या संकल्पना सोप्या शब्दांत, उदाहरणांसह समजावणारे फलक शाळेत जागोजागी लावले जावेत. गणित शिकण्याचे फायदे वारंवार सांगितले जावेत. पालकांनाही गणित शिकण्याचे महत्त्व वारंवार समजावून सांगण्यासाठी काही उपक्रम करावे लागतील. यासाठी प्रथम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे गणिताबद्दलचे ज्ञान किती आहे, याचा एक व्यापक आढावा आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे कोणता विद्यार्थी नेमक्या कोणत्या स्तरावर आहे, हे आपल्याला कळू शकेल. अशा विद्यार्थ्यांसाठी काही विशेष कार्यशाळा आयोजित करून त्यांचे विशेष प्रशिक्षण करता येईल. यातूनच पुढे काय करायचे, हे आपल्याला लक्षात येईल. गणित येत नाही म्हणून कोणाही विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होणार नाही आणि त्यांच्यात न्यूनगंडाची भावना विकसित होणार नाही, याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. त्यानंतर गणित शाळेत लोकप्रिय कसे करता येईल, या दृष्टीने प्रयत्न करता येईल.
सहजगत्या सोडविता येतील अशी सोपी उदाहरणे दिल्यास, ती सोडविता येतील, असा विश्वास निर्माण झाला की, विद्यार्थी आपोआप गणित शिकण्यात पुढाकार घेतील. ते करणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या गणितविषयक ज्ञानाची पातळी शोधण्याच्या प्रक्रियेतून आपल्याला ही बुद्धिमत्ता कोणत्या विद्यार्थ्यामध्ये आहे, हेही लक्षात येईल. यामुळे त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याकडून अधिक तयारी करून घेणे आपल्याला शक्य होईल. सर्व विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी त्यांना गणित उत्तम कसे येईल, हे बघणे अत्यावश्यक आहे. (‘सर्वांसाठी सर्वोत्तम शिक्षण’ या पुस्तकातून साभार)


