माधवी जोशी माहुलकर
नागपूरचा तर्री पोहा हा आता इतका प्रसिद्ध झाला आहे की भल्या भल्या शेफ मंडळींचे कुतुहल या डीशने वाढवले आहे. सुप्रसिद्ध शेफ रणजित ब्रार हे नागपूरात येऊन गेले तेव्हा त्यांनाही या तर्री पोह्याने भुरळ घातली. त्यांनी याची चव चाखली आणि ते या तर्री पोह्याच्या प्रेमातचं पडले व लगेचचं आपल्या किचनमधे त्यांनी या तर्री पोह्याचा सफल प्रयोग केला. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तर्रीपोहा जास्त प्रसिद्ध आहे. तर्री पोहे करताना पोहे नेहमीप्रमाणेच करायचे, पण तर्रीवर विशेष लक्ष द्यायचे. यामध्ये तर्री महत्त्वाचा घटक आहे.
तर्रीसाठी साहित्य
- गावरान चणे / हरभरे – 1 वाटी (रात्रभर भिजवलेले)
- मोठा कांदा – 1
- मध्यम आकाराचे टोमॅटो – 2
- लसूण पाकळ्या – 7-8
- आले – एक इंच
- हिरव्या मिरच्या – 3-4
- कोथिंबीर – 1 वाटी
- धणे पावडर – 1 चमचा
- जिरे पावडर – 1 चमचा
- मोहरी – 1 चमचा
- लाल तिखट – 3-4 चमचे
- हळद – 2 चमचे
- गरम मसाला – 2 चमचे
- हिंग – 1 लहान चमचा
- मीठ – चवीनुसार
- तेल – एक ते दीड पळी
कृती
- हरभरे किंवा चणे चिमुटभर मीठ टाकून प्रेशर कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या देऊन शिजवावेत.
- आले, लसूण, मिरची आणि कोथिंबीर तसेच कांद्याची अशा दोन वेगवेगळ्या पेस्ट करून घ्याव्यात.
- कढईत दीड ते दोन पळी तेल टाकून ते तापल्यावर त्यामधे मोहरी, जिरे टाकावे. ते तडतडल्यावर एक लहान चमचा हिंग घालून लगेच कांद्याची पेस्ट टाकावी.
- कांद्याच्या पेस्टला कडेने तेल सुटू लागले की, आले, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथींबिरीची पेस्ट टाकावी आणि मिश्रण तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
- नंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा हळद, तीन ते चार चमचे लाल तिखट, प्रत्येकी एक चमचा धणे आणि जिरे पावडर, दोन चमचे गरम मसाला आणि मीठ टाकून परतून घ्यावेत.
- आता यामध्ये शिजवलेले चणे घालावे. चणे शिजवल्यावर जे पाणी उरले असेल ते पाणी आणि अजून एक ते दीड ग्लास पाणी त्यात टाकावे. या पोह्यांच्या तर्रीत पाणी जास्त लागते.
- तर्री उकळायला लागली की, यामधे टोमॅटोचे उभे चिरलेले काप टाकावेत आणि तर्रीला छान उकळी आणावी.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!
पोह्यांसाठी साहित्य
- जाडे पोहे – दोन वाटी
- कांदे – 2
- हिरव्या मिरच्या – 2-3
- कढीपत्ता – 4-5 पाने
- शेंगदाणे – मूठभर
- जिरे – 1 चमचा
- मोहरी – 1 चमचा
- लाल तिखट – 1 चमचा
- हळद – 1 चमचा
- हिंग – 1 लहान चमचा
- मीठ – चवीनुसार
- साखर – चवीनुसार
कृती
- सर्वात आधी पोहे एका चाळणीत घेऊन व्यवस्थित धुवून घ्यावेत.
- मंद आचेवर कढईत तेल तापवल्यावर मोहरी, जिरे, हिंग टाकून फोडणी तयार करावी.
- त्यात शेंगदाणे टाकून व्यवस्थित गुलाबी करुन घ्यावेत.
- नंतर त्यामध्ये कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि उभे चिरलेले कांदे घालून परतावे.
- त्यामधे एक चमचा हळद, एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, साखर घालून पोहे तयार करून घ्यावेत.
- हे गरम पोहे एका प्लेटमध्ये काढून त्यावर चण्याची तर्री टाकावी.
- थोडा चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकावी.
- या पोह्यांबरोबर लिंबाची फोड देऊन डिश सर्व्ह करावी.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले
टीप
- मिरची आणि लाल तिखटाचे प्रमाण आवश्यकतेनुसार घ्यावे.
- पाहिजे असल्यास तर्री पोह्यांवर बारीक शेवही घालावी.
- आजकाल तर्रीच्या आधी पोह्यांवर साधे तिखट, मीठ लावलेले पोहे टाकून मग त्यावर तर्री दिली जाते.
पुरवठा संख्या – तीन ते चार व्यक्तींसाठी
एकूण कालावधी – साधारणपणे पाऊण तास
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.