डॉ. विवेक वैद्य
खूप जुनी गोष्ट. मी बारावीला बाहेरगावी शिकायला असताना फिजिक्सची (Physics) ट्युशन लावायची म्हणून मी चांगले सर शोधत होतो. (त्यावेळी क्लासेस (Classes) नसायचे) कोणीतरी मला नेने सरांचे नाव सुचवले. ते रिटायर होऊन बरीच वर्षे झाली होती. ते खूप स्ट्रिक्ट आहेत आणि शिकवणीला मोजकेच विद्यार्थी घेतात असेही ऐकले होते. मी त्यांना भेटावयास गेलो. त्यांनी बरेच नियम सांगितले. दर आठवड्याला चाचणी घेतो, त्यात पास होणे जरूरी असते. जास्तीतजास्त प्रेझेंटी पाहिजे वगैरे अनेक मुद्दे होते. पण सगळ्यात त्रासदायक होती ट्युशनची वेळ. सकाळी सहाला शार्प ट्युशन सुरू व्हायची. ‘उद्यापासून ट्युशनला ये,’ असे म्हणाले.
सगळे मित्र म्हणाले, ‘छान रे, तुला काही न विचारता हो म्हणाले. बऱ्याच जणांना तर फिजिक्सबद्दल प्रश्न विचारतात.’
त्या रात्री मी आनंदात झोपलो. सकाळी साडेपाचची बेल लावली. सकाळी जाग आली तर, पाऊणेसात झाले होते. घड्याळाचा गजर होऊन संपला तरी, जाग आली नाही. आता ट्युशनला जाण्यात अर्थ नव्हता. एक-दोन दिवस जाऊ दिले आणि हिम्मत करून परत सरांकडे गेलो. काय कारण सांगितलं, ते आठवत नाही, पण सर म्हणाले, ‘ठीक आहे, उद्या रविवार आहे, परवापासून ये…’ (पहिल्या दिवशी हजर न राहणाऱ्या विद्यार्थांना सर सरळ हाकलून देतात, असे ऐकले होते. माझ्या निरागस चेहऱ्याकडे पाहून सरांनी माझ्याबाबत सौम्य भूमिका घेतली असावी.)
हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?
रविवारी झोपताना मी घड्याळाचा गजर लावला. आजच्यासारखे सेलवर चालणारे घड्याळ नव्हते ते. गजर होण्यासाठीही चावी द्यावी लागयची. छोट्या नाजूक घंटेसारखा अलार्म व्हायचा. आवाज छोटा यायचा. गजराचा आवाज मोठा व्हावा म्हणून त्या घड्याळाजवळ आम्ही प्लास्टिकची बादली अर्धी उपडी करून ठेवली. जेणेकरून आवाज थोडा मोठा होईल. आम्ही (मी आणि माझे दोन रूम पार्टनर) सगळी तयारी करून झोपलो.
सकाळी जाग आली तेव्हा सात वाजून पाच मिनिटे झाली होती. घड्याळाचा गजर होऊन गेला होता. दिलेली चावी पूर्णपणे उलटी फिरून संपेपर्यंत गजर होतो… तरी आम्हाला जाग आली नाही अशी कशी झोप?
हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!
असो, आता दुसऱ्यांदा असे झाल्याने पुन्हा नेने सरांकडे जायची हिम्मत झाली नाही. पुढे बारावीच्या परीक्षेत बारा वाजले. त्यानंतर जीवनात अनेक तडजोडी कराव्या लागल्या. कधीतरी वाटते जर मी लवकर उठलो असतो आणि नेने सरांच्या ट्युशनला गेलो असतो तर…!
मला लवकर उठायची सवय लागली असती… दर आठवड्याच्या चाचणी परीक्षेमुळे Physics आणि इतरही विषयांचीही नियमित अभ्यासाची सवय लागली असती… आणि बारावीत खूप छान मार्क मिळाले असते… आजच्यापेक्षा अधिक उंचीवर असतो…
अर्थात, या जर, तर आणि नशिबाच्या गोष्टी… आणि कुंभकर्णी झोपेच्याही…


