मनोज जोशी
गेली सुमारे 31 वर्ष पत्रकारिता केल्यानंतर आता बातम्यांच्या मागे न धावण्याचा निर्णय घेतला. या वाटचालीत आतापर्यंतचे अनुभव कसे होते, याचा विचार करत होतो. या कालावधीत प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्ही माध्यमांचा अनुभव गाठीशी आला. कटिंग-पेस्टिंग ते डिजिटल… असा हा प्रवास झाला. सुरुवात माझी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या ‘महानगर’ने झाली. पण, मराठी नव्हे तर, हिंदी महानगर – हमारा महानगर (संपादक – अनुराग चतुर्वेदी)! वस्तुत:, मी मराठीच असलो तरी, बी.ए. आणि एम.ए. हे दोन्ही हिंदी साहित्य घेऊन केले. त्यावेळी एम.ए.च्या एका मित्रामुळे हिंदी महानगरमध्ये आलो. असो.
त्यानंतर दोन-चार महिने एका जाहिरात एजन्सीमध्ये काम केल्यावर महाराष्ट्रातील सर्वात जुन्या वृत्तपत्रांपैकी एका वृत्तपत्रात काम करण्याची संधी मिळाली आणि पुन्हा एकदा प्रसार माध्यम क्षेत्रात दाखल झालो. हिंदीतून मराठीत आल्यामुळे बातम्या लिहिताना त्याचा थोडासा प्रभाव बातम्यांमध्ये दिसत होताच. काही वरिष्ठांच्या ‘प्रेमळ’ मार्गदर्शनामुळे तो नाहीसा झाला…
दिवसांमागून दिवस जात होते. या काळात ज्ञानात भर पडत होती. वरिष्ठांकडून कोणता शब्द कुठे वापरायचा, याचे धडे मिळत होते. त्यामुळे शब्दांचे महत्त्व कळत होते. (सध्या विविध मराठी वृत्तवाहिन्या आणि काही अंशी पेपरमधील शब्दांचा वापर बघितल्यावर अतीव दु:ख होते.) वरिष्ठांकडून अनेक संधी दिल्या जात होत्या. विधिमंडळाच्या कामकाजाचे वार्तांकन करायला मिळाले. परळीला झालेल्या 71व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही वृत्तपत्राचा प्रतिनिधी म्हणून गेलो होतो. आदरणीय अशा थोर लेखिका दुर्गा भागवत यांचा परिचय झाला. केवळ परिचयच नव्हे तर, स्नेहबंधही जुळले होते…
हेही वाचा – Memories of the past : आय लव्ह यू रसना…!
याच काळात एक मनोरंजनाची पुरवणी सुरू करण्यात आली. त्यात लिहिण्याची संधी मिळाली अन् त्यानिमित्ताने अनेक अभिनेते-अभिनेत्रींना प्रत्यक्ष भेट झाली. विशेष म्हणजे, ते वृत्तपत्र म्हणजे एक प्रकारचे प्रशिक्षण केंद्रच होते. त्यामुळे येथून दुसरीकडे जाणाऱ्या पत्रकाराची पंचाईत होऊ नये, म्हणून प्रादेशिक, व्यापार आणि क्रीडा पानांचीही जबाबदारी दिली जायची. याचा फायदा मला ज्या-ज्या संस्थेत गेलो, तिथे तिथे झाला.
महत्त्वाचे म्हणजे, कोणते काम आणि कशा प्रकारे केले पाहिजे, याचे इत्थंभूत प्रशिक्षण त्या वृत्तपत्रात मिळाले. एवढेच नव्हे तर, काय करू नये, याचा धडाही मिळाला. वृत्तपत्र माध्यमाचे आता पूर्णपणे व्यावसायकीकरण झालेले असले तरी, त्याचे खरे कार्य हे, लोकांना वास्तवदर्शी माहिती पुरविणे तसेच लेखांद्वारे विविध विषयांचा ऊहापोह करणे हेच आहे. त्यावेळी याचे पालन केले जात होते. पण एका बातमीने आम्ही सर्व तोंडावर पडलो होतो.
त्यावेळी त्या वृत्तपत्रात दोन पद्धतीने काम चालायचे. एक आम्ही जे संगणकावर काम करायचो (तेही केवळ टाईपरायटरप्रमाणे, इंटरनेट हा प्रकारच त्यावेळी नव्हता). दुसरे होते, जे बातम्या कागदावर लिहायचे आणि त्या टाईप करायला डीटीपी ऑपरेटरकडे द्यायचे. संगणकीकरणामुळे कामाचा कालावधी कमी झाला होता, रात्रीची शिफ्ट बंद झाली होती. अशातच एक दिवस पीटीआयमध्ये एक बातमी आली – ‘त्या दिवशी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर उल्कापात होणार आहे आणि खगोलप्रेमींना तो पाहता येईल.’
आता काय करायचे? प्रतिस्पर्धी वृत्तपत्रांमध्ये ती बातमी येऊ शकते, कारण तिथे एक-दोन पत्रकार त्यासाठी थांबतील. आपल्याकडे काय? थांबणार कोण? कारण जुन्या-जाणत्यांची थांबायची तयारी नव्हती आणि आमच्यासारख्या नवख्यांना मार्गदर्शन करणार कोण? बराच खल झाला अन् शेवटी असे ठरले की, उल्कापात तर होणार आहेच, तर मग आपण एक काल्पनिक बातमी तयार करू आणि ती आतील पानात लावू. एका वरिष्ठ सहकाऱ्याकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानेही बातमी अगदी रंगवून दिली. पान छपाईला गेल्यावर नेहमीप्रमाणे मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास आम्ही तिसऱ्या शिफ्टला असलेल्यांनी ऑफिस सोडले. मनात थोडी धाकधूक होतीच. सकाळी घरी आमचा पेपर आणि दुसरा (लहानपणापासून घरी येणारा) पेपर चाळला. तेव्हा घाम फुटला. उल्कापात झाला होता, पण तो भारतात दिसलाच नव्हता. पण आमच्या बातमीनुसार भाईंदरपासून मुंबईसह महाराष्ट्रात तो लोकांनी पाहिला होता!
हेही वाचा – फेरीवाले आणि त्यांची दुनिया…. ‘असून अडचण, नसून खोळंबा’!
त्यावेळी मोबाइल नव्हते अन् लॅण्डलाइन जरी असला तरी, सकाळीच फोन करून वरिष्ठांनी जाब विचारायचा प्रकार नव्हता. ऑफिसमध्ये काय वाढून ठेवले आहे, याचा अंदाज येईना! ऑफिसला गेल्यावर वरिष्ठांनी आमच्याकडे चौकशी केली. त्यांनीही शांतपणे हा प्रकार हाताळला. त्यावेळच्या परिस्थितीची कल्पना त्यांना आली. पण वृत्तपत्राची विश्वासार्हता महत्त्वाची असते आणि ती कशी जपली पाहिजे, असे त्यांनी सुनावले. तेव्हापासून अशा घटनांमध्ये कल्पनाशक्ती लढवायची नाही, हा धडा घेतला.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.