संजय श्रीराम जोग
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे 13 जून या इंग्रजांना त्याज्य अशा 13 तारखेला आमच्या वेळेस शाळा नेमेचि सुरू व्हायची. उन्हाळ्याने त्रासलेले मुंबईकर ज्या ओढीने आभाळाकडे डोळे लावतात, त्याच चातकाच्या ओढीने सुट्टीचे अजीर्ण झालेले विद्यार्थी 13 जूनची वाट पहायचे. 1 तारखेपासूनच याची आद्य तयारी सुरू व्हायची. नवा युनिफॉर्म, नवी पुस्तके वह्या, दप्तर आणि रेनकोट असा जामानिमा असायचा.
जूनच्या 7 तारखेला मृग नक्षत्र लागूनही बरेचदा पाऊस लांबायचा आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागताला हजर व्हायचा. कमालीचा दुर्मिळ योगायोग पहा की, मातीत पडणार्या पहिल्या थेंबाने दरवळणारा सुगंध आणि कोर्या वह्या-पुस्तकांचा सुगंध एकाच दिवशी घ्यायला मिळायचा.
आमच्या पार्ले टिळक विद्यालयात, रोज शाळा सुरू होताना एका गाण्याची ध्वनीफित वाजवली जायची. पहिल्या दिवशी बरेचदा निसर्गाचे यथार्थ वर्णन करणारे “नाच रे मोरा आंब्याच्या वनात…” या गाण्यातील “ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे…” या चपलख ओळी कानावर पडायच्या.
तसे रोजच शाळा सुरू होताना कोणती ना कोणती ध्वनीफित वाजायचीच, जी एक वातावरण निर्मिती करायची. सकाळच्या सत्राची सुरुवात बहुतेक वेळा “उठी उठी गोपाळा…” या ध्वनीफितीने केली जायची.
हेही वाचा – शिक्षा नको, सुसंवाद हवा
आमची शाळा 1920 साली स्थापन झाली. तेव्हापासून पु. ल. देशपांडे यांच्यासारखे अनेक दिग्गज नामवंत या शाळेने घडवले, जे वेगवेगळ्या क्षेत्रात नावारुपाला आले. शाळा खर्या अर्थाने नावारुपाला आली ती नी. र. सहस्रबुद्धे सरांच्या काळात! त्यांच्या परीस स्पर्शाने शाळेचे इवलेसे रोप थेट गगनावेरी गेले, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्तायादीत निदान डझनभर तरी विद्यार्थी आमच्याच शाळेचे असायचे.
शाळेत जसे अभ्यासाचे वातावरण होते तसे खेळांचेही होतेच की! बाकीच्या शाळांना हेवा वाटावा असे पटांगण होते, जिथे विद्यार्थी मनोसोक्त खेळायचे अगदी कब्बडी, खो खो यासारख्या स्पर्धाही व्हायच्या, ज्याच्या अनेक ट्रॉफी आजही शाळेत पहावयास मिळतील.
अशा या शाळेचा पहिला दिवस नेहमीच खास वाटायचा, कारण निसर्ग जसा पहिल्या पावसात कात टाकतो, तसे सर्व विद्यार्थी गतवर्षीच्या यशापशयाची कात टाकून पुढे प्रवेश करताना दिसण्याचा तो दिवस असे. बऱ्याचशा जुन्या आणि काही नव्या मित्रमंडळींबरोबर प्रवास सुरू व्हायचा हा दिवस, जो नेहमीच स्मरणात राहतो, हे खरे!
हेही वाचा – ऋणानुबंधांच्या गाठी
आता हा सगळा भूतकाळ झाला असला तरी, सगळे कसे चलचित्राप्रमाणे अजूनही मनात रुंजी घालते… आणि नकळत ओठांवर शब्द उमटतात…
गेले ते दिन गेले
वेगवेगळी फुले उमलली
रचुनी त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले
गेले ते दिन गेले…
Excellent Mr.Sanjay Jog
Excellent Mr.Sanjay Jog
Thanks
धन्यवाद
[…] हेही वाचा – गेले ते दिन गेले… […]