Sunday, March 1, 2026

banner 468x60

Homeअवांतरअमृताहूनी गोड माझी माय मराठी!

अमृताहूनी गोड माझी माय मराठी!

माधवी जोशी माहुलकर

माझा मराठाचि बोलु कवतिके।

परि अमृतातेही पैजा जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

माझ्या मराठीचे शब्द मी इतक्या कौतुकाने (प्रेमाने) सजवेन… की ते प्रत्यक्ष ‘अमृताशी’ सुद्धा पैज लावेल आणि त्यात जिंकेल (म्हणजेच अमृतापेक्षाही गोड ठरेल). अशी रसाळ आणि सुंदर अक्षरे (शब्द) मी रसिक लोकांसाठी एकत्र गुंफेन…

माऊलींनी या ओळींतून जगाला हे दाखवून दिले की, तत्वज्ञान सांगण्यासाठी फक्त संस्कृतच नाही, तर आपली मराठी सुद्धा तितकीच समर्थ आणि रसाळ आहे. अशा शब्दांत ज्यांनी मराठी भाषेचा गौरव केला आहे. त्या माऊलींच्या शब्दांपासून सुरू झालेला हा मराठीचा प्रवास आज सातासमुद्रापार पोहोचला आहे!

मराठी साहित्यातील दोन महामेरू संत ज्ञानेश्वर महाराज आणि कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांच्या योगदानाचे स्मरण केल्याशिवाय मराठी भाषेचा विचार करणे अशक्य आहे. दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस आपण ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करतो. हा दिवस म्हणजे आधुनिक मराठी साहित्यातील तेजस्वी तारा, ‘ज्ञानपीठ’ विजेते कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिवस.

मराठी भाषेला साहित्याचे वैभव मिळवून देण्यात संत ज्ञानेश्वरांचे योगदान अनन्यसाधारण आहे. ज्या काळात संस्कृत हीच ज्ञानाची भाषा मानली जात होती, त्या काळात माऊलींनी ‘ज्ञानेश्वरी’ (भावार्थ दीपिका) लिहून तत्वज्ञानाचे दालन सर्वसामान्यांसाठी खुले केले. माऊलींनी मराठीला केवळ बोलीभाषा न ठेवता, तिला अमृतापेक्षाही गोड आणि श्रेष्ठ ठरवले. ज्ञानेश्वरीमुळे मराठीला एक शिस्त आणि व्याकरणाचे सौंदर्य प्राप्त झाले, ज्यामुळे ती खऱ्या अर्थाने ‘ज्ञानभाषा’ बनली. ज्या मराठीने अमृताशी पैज जिंकली, त्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा वारसा आपण जपतोय आणि ज्यांनी आपल्या शब्दांतून मराठीचा ‘कणा’ ताठ ठेवला, त्या कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला आज आपण वंदन करतोय.

हेही वाचा – नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत!

कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला आधुनिक काळात एक नवी धार आणि उंची मिळवून दिली. त्यांच्या लेखणीत जसा निसर्गाचा कोमलपणा होता, तसाच अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा ज्वालामुखीही होता. त्यांची ‘कणा’ ही कविता आजही मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे प्रतीक मानली जाते. त्याचप्रमाणे मराठी नाटकाला जागतिक उंचीवर नेऊन ठेवणारे ‘नटसम्राट’ हे नाटक असो किंवा ‘विशाखा’सारखा काव्यसंग्रह, कुसुमाग्रजांनी मराठी शब्दसंपदा कायमस्वरुपी समृद्ध केली.

मराठी भाषा ही फक्त प्रमाण भाषेतील साहित्य निर्मितीकरिता मर्यादित न राहता ग्रामीण आणि बोली भाषेतूनही ती प्रकट होत राहिली आहे. ग्रामीण भाषेतील मराठीचा बाज काही औरच आहे! मराठी सिनेमांमधून आपण किती वेगवेगळ्या प्रकारची मराठी भाषा ऐकत आहोत, नाही का? दादा कोंडकेंचा विनोदी चित्रपट असू दे अथवा निळू फुलेंचा कसदार अभिनय असलेला सामाजिक अथवा राजकीय चित्रपट असू देत त्यामधून आपल्याला कोल्हापुरी मराठी भाषेचा ठसका आणि लय कळली. आता मकरंद अनासपुरेच्या चित्रपटातून मराठवाड्यातील बोली भाषेची लय कळायला लागली. मराठी भाषेच्या या ज्या ग्रामीण तसेच बोली भाषांचा (उपभाषा म्हणू हवं तर) लहेजा आणि गोडवा काही औरच आहे. ती बोली भाषा ऐकायला खूप गोड वाटते नाही का? कोकणातील अनुनासिक कोकणी मराठी भाषा किती सुंदर आहे!

मराठी फक्त पुस्तकात नाही, तर ती आपल्या मातीतल्या बोलीत आहे :

वऱ्हाडीचा तो गोडवा…

कोल्हापुरी भाषेचा तो रांगडा ठसका…

मराठवाडी भाषेचा तो स्पष्टपणा…

मालवणी आणि अहिराणीचा तो आपलेपणा…

ह्या सगळ्या बोली मिळूनच बनते आपली लाडकी ‘मराठी’!

या विविध मराठी भाषा म्हणजेच अमृताच्या विविध धारा आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही! मराठीबद्दल म्हटले जाते की, “बारा कोसांवर भाषा बदलते.” ही विविधता मराठीला अधिक समृद्ध आणि लवचिक बनवते. वैदर्भीय, मराठवाडी आणि कोल्हापुरी यासारख्या बोलींनी मराठीच्या अंगावर विविध दागिने चढवले आहेत.

विदर्भाच्या मातीतली बोली अत्यंत गोड आणि लयबद्ध आहे. या बोलीत ‘ळ’ ऐवजी ‘य’ किंवा ‘ल’ वापरण्याची धाटणी (उदा. ‘पाणी’ला ‘पानी’ किंवा ‘वेळ’ला ‘येय’ म्हणणे) मनाला भावते. संत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबांच्या विचारांनी ही बोली अधिक धारदार झाली. वऱ्हाडी भाषेतील विनोद आणि आदरयुक्त जवळीक मराठीला एक वेगळीच उंची देते.

मराठवाडी बोली ही मराठवाड्याचा रांगडा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आणि संतांची भूमी असलेल्या मराठवाड्याची ही बोली अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक आहे. तेलुगू आणि कानडी भाषेच्या सीमा जवळ असल्याने या बोलीवर त्याचा थोडा प्रभाव जाणवतो, पण तिचा गाभा पूर्णपणे मराठीच आहे. यातील शब्दांमधला जोर आणि ठसका श्रवणीय असतो. नामदेव ढसाळ आणि अनेक दलित साहित्यिकांनी मराठवाडी बोलीचा वापर करून समाजातील कटू वास्तव मांडले आहे.

कोल्हापूरची बोली ‘लय भारी’ आणि जोशपूर्ण आहे कोल्हापूरची बोली म्हणजे केवळ भाषा नाही, तर तो एक ‘नाद’ आहे. अत्यंत आक्रमक वाटणारी, पण तितकीच प्रेमळ अशी ही भाषा आहे. ‘काय म्हणत सायबा (साहेब)’, ‘लय भारी’, ‘काय रं’ यासारख्या शब्दांनी या बोलीला एक वेगळी ओळख दिली आहे. शब्दांच्या शेवटी येणारा हेल आणि आब यामुळे ही बोली सर्वत्र प्रसिद्ध आहे. ग्रामीण साहित्याला खऱ्या अर्थाने कोल्हापुरी मातीचा सुगंध लाभला आहे. तर कोकणी आणि मालवणी समुद्राच्या लाटांसारखी चपळ आणि मिश्किल आहे. खानदेशातील अहीराणी ही बोली मराठीच्या इतर रूपांपेक्षा वेगळी असली, तरी ती आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

हेही वाचा – चाळ नावाचे एकत्र कुटुंब!

संत ज्ञानेश्वरांनी ज्या मराठीची मुहूर्तमेढ रोवली, त्याच मराठीला कुसुमाग्रजांनी शब्दांचे शस्त्र दिले. त्या मराठीला आपल्या बोली भाषांनी जिवंत ठेवले आणि सजविले आहे! ना. धों. महानोर, शांताबाई शेळके, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगांवकर, केशवसुत, बा. भ. बोरकर, वि. स. खांडेकर, व. पु. काळे, विं. दा. करंदीकर, दुर्गा भागवत, ग्रेस यांच्यासारख्या अगणित दिग्गज मराठी लेखकांच्या लेखणीने ही आपली मराठी नावाची मायबोली समृद्ध होत आली आहे. मराठी भाषेला समृद्ध आणि अभिजात करण्याचा वसाच जणू या सर्व लेखकांनी घेतला होता. त्यांना विसरुन कसं चालेल? त्याकरताच कविवर्य सुरेश भट तर मराठी भाषेच्या अभिनाने भारावून व्यक्त होऊन बोलून गेले आहेत की,

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी! मीसुद्धा हेच म्हणेन की, “मी मराठी! मी मराठी!” माझी मातृभाषा मराठी आहे याचा मला अभिमान आहे!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!