शैलजा गोखले
साहित्य
- छोटी काटेरी वांगी – 1 वाटी (चिरलेली)
- वाल पापडी – 1 वाटी (सोलून तुकडे केलेली)
- तुरीचे दाणे – 1 वाटी
- पावट्याचे दाणे – 1 वाटी
- मटार – 1 वाटी
- ओला हरभरा – 1 वाटी
- गाजर – 1 वाटी (चिरलेला)
- बटाटा – 1 वाटी (चिरलेला)
- भुईमूगांमधील ताजे दाणे – 1 छोटी वाटी
- भाजलेले तीळ – 2 टेबलस्पून (+ 1 टेबलस्पून वरून घालायला)
- सुकं किसलेलं खोबरं – 2 टेबलस्पून
- चिंचेचा कोळ – ऐच्छिक (घेतला तर साधारण 1 टेबलस्पून)
- गोडा मसाला – 2 टीस्पून
- लाल तिखट – 2 टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- गूळ – 2 टीस्पून
- चिरलेली कोथिंबीर – मूठभर
- तेल – 2 ते 3 टेबलस्पून
- मोहरी – 1 टीस्पून
- हिंग – पाव टीस्पून
पुरवठा संख्या – 3 ते 4 व्यक्तींसाठी
हेही वाचा – Recipe : ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा
तयारीसाठी लागणार वेळ
- चिंच गरम पाण्यात भिजवून ठेवून कोळ काढायला – 1 तास
- भाज्या निवडून धुवून चिरून घ्यायला – साधारणपणे दीड तास
- मसाला वाटायला – 1 ते 2 मिनिटे
- पाककृती करण्यासाठी – अर्धा तास
- एकूण वेळ – दोन तास
कृती
- सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून कोरड्या करून निवडून घ्या.
- वांगी चिरून मीठाच्या पाण्यात ठेवा म्हणजे त्याचा राप निघून जाईल. बटाटा देखील चिरून पाण्यात ठेवा म्हणजे काळा पडणार नाही.
- पावटा, हरभरे, तुरीचे दाणे, मटार दाणे तयार ठेवा.
- आता एका मोठ्या कढईत फोडणीसाठी तेल घ्या. या भाजीला तुलनेत तेल जरा जास्त लागतं.
- तेल तापलं की, त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की, हिंग आणि हळद घाला. मग लगेच पावट्याचे दाणे, हरभरे, तुरीचे दाणे, भुईमूगाचे ताजे दाणे आणि मटार घाला. हे दाणे शिजायला जरा जास्त वेळ लागतो. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
- एक वाफ आली की, मग त्यात बटाटा, वांग्याच्या फोडी, गाजराचे तुकडे, वाल पापडी घाला आणि सगळं छान मिक्स करून परत एकदा झाकण ठेवा.
- मिक्सरच्या छोट्या भांड्यात सुकं किसलेलं खोबरं आणि तीळ एकत्र करून वाटून घ्या.
- सगळ्या भाज्या शिजल्या की, वरून तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, गूळ, गोडा मसाला आणि मिक्सरवर वाटलेला मसाला घालून सगळं मिक्स करा. आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला. आता परत एक वाफ आणावी.
- भाजी छान शिजली की, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बाजूला ठेवलेले तीळ घाला.
- ही गरमागरम भाजी, बाजरीची तीळ लावलेली भाकरी, ताजं लोणी असा भोगीसाठीचा मेन्यू तयार
हेही वाचा – Recipe : कोकमाचे सार आणि वाफाळता भात…
टिप्स
- ही भाजी झटपट करायची असेल तर पावटा, हरभरे, तुरीचे दाणे, मटार कुकरमध्ये एखादी शिट्टी करून शिजवून मग फोडणीला घाला. वेळेची बचत होईल.
- या भाजीत काही ठिकाणी छोटी बोरं किंवा उसाचे तुकडेही घालतात. आवडत असतील तर ते पण भाजीत घालू शकता.
- भुईमूगाच्या शेंगा मिळाल्या नाहीत तर, साधे शेंगदाणे दोन तास पाण्यात भिजवून ते वापरले तरी चालतील.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


