शैलजा गोखले
थंडीच्या दिवसात बाजारामध्ये ओल्या लाल मिरच्या विकायला सुरूवात होते. या मिरच्यांचा ठेचा किंवा रंजका चवीला अतिशय उत्तम लागतो. दिसायलाही रंगामुळे आकर्षक वाटतो. पावभाजीच्या भाजीत यातला थोडासा ठेचा घातलात तर, आणखी चव येते.
साहित्य
- ओल्या लाल मिरच्या – पाव किलो
- लसूण – एक वाटीभर (आमटीची वाटी)
- लिंबू – 4 ते 5
- मीठ – चवीनुसार
पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी
तयारीस लागणारा वेळ : साधारणपणे अर्धा तास
शिजवण्याचा वेळ : मिक्सरमधून फिरवायला 3 ते 4 मिनिटे
एकूण वेळ : 35 मिनिटे
कृती
- ओल्या लाल मिरच्या स्वच्छ धुवून एका कोरड्या कपड्यावर वाळायला ठेवा.
- मिरच्या वाळून होईपर्यंत लसूण पाकळ्या सोलून त्याचे बारीक तुकडे करून घ्या.
- मिरच्या पूर्णपणे वाळल्यावर त्याचे डेख (देठ) काढून जाडसर तुकडे करून घ्या.
- ही मिरची बऱ्यापैकी तिखट असते, त्यामुळे तुकडे करताना हाताला तेल लावून, पूर्ण काळजी घेऊन मगच तुकडे करा.
- तुकडे करताना यातील जितक्या बिया काढून टाकता येतील तेवढ्या काढा. यामुळे ठेच्याचा तिखटपणा कमी होतो. मात्र ज्यांना तिखट खायला आवडते त्यांनी या बिया नाही काढल्या तरी चालतील.
- आता मिक्सरच्या भांड्यात मिरच्यांचे तुकडे आणि चिरलेला लसूण घालून एकदा फिरवून घ्या. फिरवताना पाणी अजिबात घालायचे नाही.
- एकदा जाडसरवाटून झाले की, मग यात चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घाला.
- सगळं नीट एकत्र करून परत वाटून घ्या.
- मीठ आणि लिंबाच्या रसामुळे मिरच्यांना पाणी सुटते. त्यामुळे मिश्रण व्यवस्थित वाटले जाते.
- स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या काचेच्या बाटलीत हा वाटलेला ठेचा भरा.
- फ्रीजमध्ये हा ठेचा सहा महिने छान टिकतो.
विशेष आहार माहिती : शाकाहारी
टीप
- या ओल्या लाल मिरच्या आकाराने थोड्याशा ढब्बू असतात. लाल सिमला मिरची येथे अपेक्षित नाही.
- मिरची चवीला अतिशय तिखट असते. त्यामुळे काळजी घेऊन या मिरच्या हाताळाव्यात.
- मिरच्या संपूर्णपणे कोरड्या असणं आवश्यक आहे.
- या ठेच्याला फोडणी देत नाही. पण जर आवडत असेल तर थोड्याशा ठेच्यावर तेलाची फोडणी वरून घालू शकता.
- काही ठिकाणी मेथी दाणा तळून त्याची पावडर करून या ठेच्यात घालतात. त्यानेही अतिशय सुरेख चव येते.
- पूर्णपणे कोरड्या काचेच्या बाटलीतच ठेचा भरा.
- मिरच्या, मिक्सर किंवा काचेची बाटली यात थोडा जरी पाण्याचा अंश राहिला तर, ठेचा लगेच खराब होतो.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


