डॉ. अस्मिता हवालदार
जसं व्यक्तीचं भाग्य असतं तसच देशाचं सुद्धा भाग्य असतं. आपल्या देशाचं थोर भाग्य काही व्यक्तींनी, काही राजांनी घडवलं आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा राजा कृष्णदेवराय! दक्षिणेत अडीचशे वर्षांहून अधिक काळ भक्कम पाय रोवून उभे असलेल्या विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय. त्याच्या आणि तेनाली रामनच्या कथा प्रसिद्ध आहेत. विजयनगर साम्राज्याबद्दल जी अगदीच जराशी माहिती सांगितली गेली, त्यात या राजाच्या कथा सांगितल्या गेल्या; परंतु याचे व्यक्तिमत्व याहून बरेच उत्तुंग होते. विजयनगराबद्दल अब्दुल रझाक या परदेशी प्रवाशाने लिहून ठेवले आहे, ‘ज्ञानाच्या कानाने ऐकले नाही आणि डोळ्यांच्या बाहुलीने पहिले नाही, असे हे जगातले एकमेव शहर आहे.’ तो पुढे म्हणतो, ‘इथल्या संपत्तीचे खरेखुरे वर्णन केले तर लोक विश्वास ठेवणार नाहीत.’
विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी. आता सर्वाना परिचित आहे, कारण ती वैश्विक वारसा जाहीर झाली आहे. पर्यटकांच्या संख्येत विलक्षण वाढ झाली आहे; परंतु ही आपली संपत्ती आहे, तिचे जतन आपणच करायचे आहे ही जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी! आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी या साम्राज्याची स्थापना इस 1336 साली हरिहर आणि बुक्क या दोन संगम भावांनी केली. त्यांना शृंगेरी पीठाच्या विद्यारण्य स्वामींचा आशीर्वाद होता. त्यांनीच साम्राज्याच्या राजधानीची जागा, तुंगभद्रा नदीच्या तीरावर असलेली हंपी निश्चित केली. सात टेकड्या आणि एका बाजूला वाहणारी तुंगभद्रा असे नैसर्गिक संरक्षण लाभलेली ही हंपी म्हणजे रामायण काळातली किष्किंधा नगरी. सुग्रीवाची नगरी जिथे हनुमान आणि श्रीरामांची भेट घडली. हे साम्राज्य चार घराण्यांनी वैभवशाली केलं – संगम, साळूव, तुळूव आणि अरावीडू!
यातल्या तुलुव घराण्याचा राजा कृष्णदेवराय. साळूव घराण्याचा शेवटचा राजा या साम्राज्याची धुरा वाहायला योग्य नाही, हे लक्षात आल्यावर त्यांच्या नायकाने, नरसा नायकाने कारभार सांभाळायला सुरवात केली आणि स्वतःला सम्राट घोषित केले. ते साल होते 1491. त्याचा आणि पत्नी नागलंबेचा पुत्र कृष्णदेवराय. याचा मोठा पुत्र वीर नरसिंह केवळ सहा वर्षे राज्य करू शकला आणि इस 1509 साली कृष्णदेवराय राजा झाला.
तो राज्यावर आला तेव्हा केवळ बावीस वर्षांचा कोवळा तरुण होता. आव्हाने मात्र भरपूर होती. चारही दिशांनी वादळ घोंघावत होते. ईशान्येला ओरिसाचा राजा प्रतापरुद्र सैन्यबळ वाढवत होता, तर उत्तरेला विजापूरचा सुलतान चढाई करण्याच्या तयारीत होता. दक्षिणेला गंगाराजा किल्ला बांधत होता आणि पश्चिमेला उमत्तुर घराण्याचा सरदार बंड करण्याच्या तयारीत होता.
कृष्णदेवरायच्या काळात दोन पोर्तुगीज प्रवासी दोमिन्गो पेस आणि फर्नाव नुनिझ विजयनगरात आले होते. या दोघांनी त्याला ‘याची देही याची डोळा’ पाहिले आणि एक विस्तृत बखर लिहून ठेवली. शुद्ध रूपात लिहून ठेवलेला हा ऐतिहासिक ठेवा आहे. त्यांनी राया, त्याचा महाल, त्यावेळचे हंपी, महानवमी उत्सव, होळी, दिवाळी, व्यापार, पिके, अन्नधान्य, खाद्यपदार्थ… सर्वांबद्दल लिहून ठेवले आहे. त्यांच्या अत्यंत बारीक निरीक्षणशक्तीची दाद द्यायला हवी. या दोघांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. पेस विजयनगराला ‘बिजनगर’ आणि रायाला नरसिंग म्हणतो. नरसिंगाचे राज्य पूर्ण पाहायला तीन महिने लागतील. इथे मोठमोठे बाजार आहेत. त्यात भरपूर हत्ती आणि माणसे फिरत असतात. व्यापारी टोपल्यांतून हिरे, मौल्यवान रत्ने वगैरे विकायला बसलेले असतात. सर्वांच्या अंगावर भरपूर सोने असते… इतके की, माणसे त्याच्या भाराने वाकलेली आहेत. प्राण्यांच्या अंगावर पण भरपूर सोने असते. इथे राणी आणि दासी यातला फरक ओळखता येणे अवघड, इतके दागिने दासी सुद्धा घालतात.
तो रायाबद्दल लिहितो, राया लोकप्रिय आहे. तो पहाटे उठतो, एक भांडे जिंजेलीचे तेल पितो, मग दांडपट्टा खेळतो. पहलवानाबरोबर कुस्ती खेळतो. घोडसवारी करतो, तलवारबाजी करतो. मातीचे मोठे गोळे हातात घेऊन कसरत करतो. थोडक्यात, रोज स्वतःला युद्धासाठी तयार करतो. त्यानंतर तो देवपूजा करतो. राया धार्मिक आहे, पण अंधश्रद्धाळू नाही; रसिक आहे पण रंगेल नाही; महत्वाकांक्षी आहे, पण लोभी नाही. त्याच्या समोर उभे राहायलाही धारिष्ट्य लागते. त्याला विरोध करणे दुरापास्त आहे. अशा आशयाचे लेखन त्याने करून ठेवले आहे.
हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा
पेस आणि नुनिझने महानवमीचा नऊ दिवस चालणारा उत्सव पाहिला होता. त्याचेही सुरेख वर्णन आहे. राया नऊ दिवस उपवास करतो. पहाटे उठून देवीची पूजा सुरू होते. तो पांढरी वस्त्रे घालतो, हातात पांढऱ्या गुलाबाची फुले घेतो. त्यावेळी नर्तिका देवासमोर नृत्य करत असतात. नवव्या दिवशी राज्यातले सगळे सरदार, नायक, मांडलिक राजे येतात, रायाला राजस्व देतात. राया सिंहासनावर बसलेला असतो. महानवमी चौथऱ्यावर लाकडी खांब उभारून त्यावर रेशमी कनाती, मोत्याच्या झालरी वगैरे असतात. राया समोर मिरवणुका सुरू होतात.
पेसने ज्या क्रमाने घोडेस्वार, हत्तीस्वार, भालेदार, तलवारबाज इत्यादी लोक येण्याचे वर्णन केले आहे, त्याच क्रमाने महानवमी चौथऱ्यावर शिल्प कोरलेली आहेत. तिथे नर्तिका, वाद्यवृंद, वसंतोत्सव, शिकारी, कुस्ती लढणाऱ्या स्त्रिया आदी विषयांवरची शिल्पे आहेत, जी त्या काळचे सामाजिक जीवन दाखवतात. पेस पुढे लिहितो, राया शेवटच्या दिवशी तीन दिशांनी बाण मारतो. जिथला बाण सर्वात जास्त लांब जाईल तिथपासून मोहिमांना सुरवात करतो.
प्रत्येक राजाचे कर्तृत्व त्याने केलेला राज्यविस्तार आणि सुराज्य निर्मिती या दोन निकषांवर तोलले जाते. रायाने ‘आमुक्तमाल्यदा’ नावाचा ग्रंथ तेलुगू भाषेत लिहिला आहे. त्यात राजाचे प्रथम कर्तव्य साम्राज्यविस्तार आहे, असे म्हटले आहे. त्याप्रमाणे त्याने अनेक यशस्वी लष्करी मोहिमा काढून राज्यविस्तार केला. पूर्व किनारपट्टीवरचे उदयगिरी, कोन्दावीडू यासारखे किल्ले जिंकले, रायचुरचा किल्ला जिंकला. प्रतापरुद्र या ओरिसाच्या राजाला नामावल्यावरही त्याच्याशी तह करून उत्तरेकडेची जमीन परत केली, ती केवळ सलोखा रहावा म्हणून! त्याला जीवितहानी, वित्तहानी आवडत नव्हती. त्याने ओरिसाचा भाग जिंकल्यावर सर्व सैनिकांना सख्त ताकीद दिली होती की, कुठल्याही प्रकारची वित्तहानी करू नका. प्रतापरायाचा पुत्र वीरभद्र लढाईत हरल्यावर कैद झाला होता. त्याला विजयनगरात सन्मानाने वागवून पदव्या देऊन परत पाठवले.
रायाच्या दरबाराला ‘भुवन विजयम’ असे म्हणतात. त्याच्या दरबारात अष्टदिग्गज कवी होते. त्यांना पालखीचा मान होता. अल्लासनी पेद्दन सारखा महाकवी, फ्लॅश बॅक तंत्र पहिल्यांदा वापरणारा पिंगळी सूर्यांण्णा, ‘पांडुरंग महाथ्यम’सारखे तेलुगू महाकाव्य रचणारा तेनाली रामकृष्णन आदी कवी त्याच्याच दरबारातले! तो स्वतः कवी होता. त्याने संस्कृत आणि तेलुगू भाषेत काव्य रचले आहे. ‘जाम्बुवंती कल्याणम्’सारखे पाच अंकी नाटक लिहिले आहे. ‘आमुक्त माल्यदा’ हा ग्रंथ रंगनाथ आणि स्त्री संत अन्दल यांची प्रेम कहाणी आहे. यात त्याने सुयोग्य राज्यकारभाराविषयी लिहून ठेवले आहे.
हेही वाचा – वेगवेगळया पातळ्यांवर लढणारी ‘केतकर वहिनी’
त्याने राजस्व आकारण्याची भूमूल्यांकन पद्धत रुजू केली. तिला ‘राया रेखा’ असे म्हणतात. ही परिपूर्ण पद्धत अनेक वर्षे वापरण्यात येत होती. पोर्तुगीज स्थपती दा वेल्ला पोर्ट याच्या सल्ल्याने त्याने विजयनगरात जलनियोजन केले. अनेक कृत्रिम तलाव, धरणे, बांध बांधले. कालवे काढले आणि जलवाहिन्या बांधल्या. यामुळे शेती समृद्ध झाली. त्याचा काळ भारतीय कलांचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात शिल्पकला, चित्रकला, नाटक, नृत्यकला, स्थापत्य समृद्ध झाले. त्याने सर्व कलांना राजाश्रय दिला.
हंपीमध्ये बाळकृष्ण मंदिर आणि विठ्ठल मंदिर स्थापत्याचा उत्तम नमुना आहेत. रायाच्या काळात ही मंदिरे बांधली गेली. ही मंदिरे म्हणजे मंदिर संकुल केवळ अध्यात्माचे केंद्र नसून सामाजिक घडामोडीचे केंद्र असत. उग्र नरसिंहाचा पुतळा एकसंध पाषाणातून घडवला आहे. त्याने मंदिरांसमोर गोपुरे बांधली, शंभर खांबांचा मंडप बांधला. अशाप्रकारे विजयनगराची अशी विशिष्ट स्थापत्य शैली निर्माण झाली.
त्याचा राज्यकारभार 1509 ते 1530 या काळात होता. म्हणजे उणीपुरी 21 वर्षे आहेत. एवढ्याच वर्षांत त्याने वैभवशाली इतिहास निर्माण केला. आपल्या संस्कृतीचं रक्षण केलं. तमिळ, तेलुगू, कन्नड सगळ्याच लोकांना तो आपला राजा वाटतो. त्याची भाषा कोणती, तो मूळ कुठल्या प्रांताचा या वादात पडूच नये. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वांना असे चौकटीचे बंधन घालूच नये कारण ही राष्ट्राची संपत्ती असते. त्याला आंध्र भोज, गोब्राह्मणप्रतिपालक, यवनराज्यसंस्थापानाचार्य अशा अनेक पदव्यांनी गौरवले आहे.
आयुष्यात एकही लढाई न हरलेला हा मुत्सद्दी राजा. जेव्हा हा दक्षिणेत होता तेव्हा उत्तरेत बाबर राज्य करत होता. तोच बाबर ज्याच्या विषयी शालेय अभ्यासक्रमात माहिती दिली आहे. परंतु तो दक्षिणेत यायचे धाडस करू शकला नाही कारण कृष्णदेवराय तिथे पाय रोवून उभा होता. आपला हा जेत्यांचा इतिहास, अभिमानास्पद इतिहास आपल्यापर्यंत का पोहोचवला नाही, हाच लाख मोलाचा प्रश्न आहे!