आराधना जोशी
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरव्या रंगाची भरताची वांगी यायला लागतात. या वांग्यांमध्ये बिया फार नसतात त्यामुळे भरीत करायला सोपे जाते आणि चवीलाही उत्कृष्ट लागते.
साहित्य
- हिरव्या रंगाची भरताची मोठी वांगी – 1 किलो
- पातीचा कांदा – 2 जुड्या
- हिरव्या मिरच्या – 10 ते 12
- कच्चे शेंगदाणे – पाऊण वाटी
- सुक्या खोबऱ्याचे तुकडे – पाव वाटी (ऐच्छिक)
- लसूण पाकळ्या – 25 ते 30
- आले – साधारणपणे 2 इंच
- कोथिंबीर – मूठभर
- फोडणीचे साहित्य
- ओवा – अर्धा टेबलस्पून
- तेल – साधारणपणे 8 ते 10 टेबलस्पून
पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी
तयारीस लागणारा वेळ : वांगी भाजून घ्यायला तासभर
भाजलेली वांगी थंड करून त्याची साले काढायला – 20 मिनिटे
इतर तयारीला – साधारणपणे 20 मिनिटे
शिजवण्याचा वेळ : 10 ते 15 मिनिटे
एकूण वेळ : 2 तास
हेही वाचा – Recipe : ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा
कृती
- वांगी स्वच्छ धुवून कोरडी करून त्यांना सगळीकडून तेलाचा हात लावावा.
- मग या वांग्यांना सगळीकडून टोचे मारून घ्या. यामुळे वांगी आतपर्यंत भाजली जातात.
- आता ही वांगी गॅसवर भाजून घ्या.
- भाजून झालेली वांगी एका बाऊलमध्ये गार करायला ठेवा.
- वांगी गार होईपर्यंत दुसरीकडे मिरच्या गॅसवर भाजून घ्या.
- पातीचा कांदा चिरून धुवून पाणी निथळायला ठेवून द्या.
- कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून चिरून घ्या.
- आता गार झालेल्या वांगी सालं काढून सोलून घ्या. वरील डेख काढून टाका.
- सोललेल्या वांग्याचा गर आणि मिरच्या, लसूण आणि आलं घालून बत्त्याने कुटून एकजीव करून घ्या किंवा मिक्सरला फिरवून घ्या.
- आता बाऊलमध्ये एकजीव केलेला वांग्याचा गर, चिरून घेतलेला पातीचा कांदा, कोथिंबीर घालून मिक्स करा.
- आता कढईत तेल घ्या. तेल गरम झाल्यावर हातावर ओवा थोडासा चुरडून तेलात घाला, मग जिरं, हिंग घाला. आता शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याचे तुकडे घाला.
- दोन मिनिटे तेलात शेंगदाणे, खोबरे चांगले खरपूस झाले की, मग वांग्याचा गर घाला. चवीनुसार मीठ घालून चांगले परतून घ्या.
- आता झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या. एक वाफ आल्यावर परत एकदा मिश्रण परतून मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ आणावी.
- मग आवडत असल्यास वरून परत एक टेबलस्पून तेल घालून ते भरतात मिक्स करून परत एकदा वाफ आणावी.
- आता भरीत तयार आहे. गरमागरम भाकरीसोबत हे भरीत अतिशय सुंदर लागते.
विशेष आहार माहिती : शाकाहारी
हेही वाचा – Recipe : इन्स्टंट बन डोसा
टीप्स
- भरताची वांगी आधीच भाजून, सोलून गर काढून फ्रीजमध्ये ठेवला तर प्रत्यक्ष भरीत करतानाचा वेळ कमी लागतो.
- आपल्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण कमी-जास्त करता येईल.
- खानदेश भागात वांगी कापसाच्या काटक्यांवर भाजतात. पण शहरांमध्ये ते शक्य होत नाही. यासाठी भरीत झाले की, त्यात एका खोलगट वाटीत रसरशीत पेटलेला कोळशाचा तुकडा ठेवावा आणि त्या तुकड्यावर थोडेसे तेल घालावे. यामुळे होणारा धूर भरतात मुरावा यासाठी लगेच वरून झाकण ठेवून धूर आतल्या आत कोंडावा. भरताला छान स्मोकी चव येते.
- खानदेशात सोललेल्या वांग्याचा गर एकजीव करण्यासाठी बडगा वापरतात.
- वांगी भाजायच्या आधी त्याला तेल लावले की, भाजल्यानंतर साल काढायला सोपे जाते.
- हे भरीत कळणाची भाकरी किंवा कळणाच्या पुऱ्यांसोबत खातात. कळण्याचे पीठ बनवण्यासाठी एक किलो ज्वारीमध्ये पाव किलो उडदाची डाळ, चमचाभर जिरे, मेथी, धने घालून गिरणीतून दळून आणतात.
- पहिला घास खाल्ल्याबरोबर टाळूला घाम फुटेल इतके हे भरीत झणझणीत असते. म्हणूनच सोबत दही किंवा टोमॅटोची दह्यातील कोशिंबीर घेण्याची पद्धत आहे.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


