अस्मिता हवालदार
कोकणातल्या एका लहानशा, आडवळणी असलेल्या, करंबवणे नावाच्या खेड्यात राहणाऱ्या मालती केतकर या स्त्रीची ही कथा आहे. मागच्या शतकात स्त्री शिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षण संस्था सुरू केली. तो काळ या कथानकात नोंदला गेला आहे. बालविधवांचे कारुण्यमय जीवन, त्यांच्यावर होणारे अत्याचार, अविवाहित स्त्रीची मानसिक आंदोलने, परित्यक्ता स्त्रीचे हाल या कथेत वाचून स्त्रियांची स्थिती किती बदलली हे लक्षात येते. आपल्या समाजधुरिणांनी अत्यंत प्रतिकूल काळात स्त्रियांना शिक्षण देऊन क्रांती केली आहे.
केतकर वहिनींचं हे चरित्र उमा कुलकर्णी यांनी लिहिले आहे. उमाताई आपल्याला त्यांनी केलेल्या असंख्य अनुवादित पुस्तकांमुळे माहीत आहेत. हे त्यांनी लिहिलेले पुस्तक आहे. मालतीबाई आपली कथा सांगत आहेत. मुखपृष्ठावर तरुण इंदूचे सात्विक सौंदर्य मन प्रसन्न करते. मलपृष्ठावर चेहऱ्यावर सुरकुत्या असलेल्या वहिनींच्या चेहऱ्यावर सार्थकतेचे, कर्तव्यपूर्तीचे समाधान दिसते.
मालतीबाईंनी म्हणजे वहिनींनी केलेलं मालाडच वर्णन वाचून हसूच येतं. त्याचं माहेर मालाडला होतं. दोन घरांमध्ये भरपूर जागा, समोर मोकळी जागा, त्यात गुरे चरत आहेत वगैरे… असे मालाड आता स्वप्नात सुद्धा येऊ शकणार नाही. त्याचं माहेरचे नाव इंदू. इंदूचे वडील गेल्यावर आईने संसाराच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. अगदी लहानसे खेडे असलेल्या ठिकाणी मुलगी देणार नाही, असे आई म्हणत असली तरी केतकर कुटुंबातील दहा मुलींनी घेतलेले शिक्षण इंदूच्या मनात भरले होते. सुशिक्षित कुटुंबात जायला मिळणार असल्याने तिने बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्या लहानशा खेड्यात वऱ्हाड घेऊन मुलीचे लग्न करताना आईने अनंत अडचणींचा सामना केला. ते वाचून आपण थक्क होतो. सासरी आई (सासू), मामा (सासरे), ठकूताई (नणंद), पती, दीर एवढी मंडळी होती आणि बाकी नऊ मुली शिकण्यासाठी पुण्याच्या कर्व्यांच्या शिक्षण संस्थेत होत्या. या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या केतकर भगिनी. या खेड्यातील जीवन शहरी मुलीसाठी किती कठीण असेल याची कल्पना केलेली बरी! साप, विंचू, वाघ, बिबटे वगैरे प्राण्यांची सवय करून घ्यायला लागली. केतकर कुटुंबीयांकडे खूप जमीन, संपत्ती होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर कुळकायदे बदलले. कुळाबरोबर खटले सुरू होतेच. या खटल्यांमुळे वहिनींच्या पतीची निर्घृण हत्या झाली. तीन मुली आणि एक मुलगा असलेल्या वहिनींची आर्थिक स्थिती चांगली असली तरी, वैधव्य आल्यावर लोकांची लागट बोलणी ऐकावी लागली. मुलींना शिकवण्यात पुढाकार घेणाऱ्या सासरच्या मंडळींनी सुनेबरोबर दूजाभाव केला, त्यांना शिकू दिले नाही. मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवले. त्यामुळे अधिकच एकटेपणा आला. सासूबाईंनी मुलगी मानले नाही, याची खंत त्यांनी वारंवार व्यक्त केली आहे. नातवंडांचे लाड केले नाहीत, त्यांना खाऊ सुद्धा दिला नाही याचे वैषम्य वाटे.
हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा
सासू-सासरे गेल्यावर वहिनींची अवस्था सैरभर झाली, कारण शेतीवाडी आणि इतर आर्थिक व्यवहार माहीत नव्हते तसेच आता त्या घरात एकट्याच उरल्या होत्या. त्यांना खटलेसुद्धा चालवावे लागले. घरचा एक भाग स्त्रियांना भाड्यावर दिल्यावर त्यांना विलक्षण अनुभव आले. एकदा सासऱ्यांना मारायला मारेकरी आले होते. घरावर दगड यायचे, धमक्या मिळायच्या. पण त्या खंबीर होत्या. वेळोवेळी त्यांनी प्रसंगावधान ठेवून कठीण प्रसंग निभावून नेले. इतक्या की, त्यांनी काळ्याकुट्ट रात्री खिडकी उघडून भूतांना म्हटले होते की, ‘या माझ्याशी बोला. मी घाबरत नाही.’ फार विलक्षण वाटते हे!
केतकर भगिनी शैक्षणिक कर्तृत्वामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्या तरी, वहिनींच्या मुलींच्या लग्नात त्यामुळे अडचणी आल्या. इतक्या पुरोगामी घरातल्या मुली नकोत, असा सूर होता. त्यावेळी शिक्षण घेतल्याने स्त्रिया स्वच्छंद होतात, असाच समज होता. पण सर्व मुलींना उत्तम घरे मिळाली. तीही फारसा खर्च न करता. एकटेपणा म्हणजे काय, हे या पुस्तकातून कळतं. वहिनी एकट्या राहत असत. पावसाळ्यात दिवसेंदिवस माणसाचे दर्शन व्हायचे नाही. एवढ्या मोठ्या घरात बोलायला कोणी नाही, रेडिओ नाही, पेपर नाही, शेजार नाही, वेळ समजत नाही. त्यांची मुलगी एकदा महिनाभर तिथे एकटी राहिली, तेव्हा तिला काळ गोठून गेल्यासारखे वाटले. वहिनींना आपली बुद्धिमत्ता गंजून जाईल, असे वाटायचे. बोलायची उर्मी आली की, त्या मांजरांशी बोलायच्या.
एकटेपणात आणखी डोक्याला व्याप होता तो सतत चाललेल्या खटल्यांचा! पण त्यांनी खटले लढले नसते तर, आर्थिक परिस्थिती भीषण झाली असती. खटले त्यांना एकटीने लढावे लागले. त्याचे वर्णन वाचून त्यांच्या कर्तबगार, खंबीर स्वभावाचे कौतुक वाटू लागते. आपले म्हणणे ठामपणे, पण सौम्य शब्दांत समोरच्या व्यक्तीला समजावले पाहिजे, हा फार मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे.
नंतर त्यांनी आपल्या घराचा एक भाग विश्व हिंदू परिषदेला मुलांच्या वसतीगृहासाठी दिला. गावात एस. टी. आणण्यात त्यांचा सहभाग होता. कथनात त्यांनी आपल्या पतीबद्दल फारच त्रोटक सांगितले आहे, हे खुपते. कुटुंबीयांबद्दल फारच कमी माहिती दिली आहे. मुख्यतः, खटले आणि त्यांचा संघर्ष यावर कथन केंद्रित आहे. चतुरा, शोभा, प्रभाकरपेक्षा शकाबद्दल जास्त आठवणी आहेत. ती आजारी असल्याने, प्रकृती नाजूक असल्यामुळे असावे.
हेही वाचा – करुणाष्टक… आई गेल्यावर बरंच काही जातं!
हे चरित्र वाचताना वारंवार एकच प्रश्न पडतो, एकटी स्त्री इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर कशी लढली असेल? अवेळी वैधव्य, चार मुले, नातेवाईकांचा गोतावळा, खूप शेतजमीन, त्यावरचे खटले, मुलांची शिक्षणे, आजारपण… त्यातच एकट्या स्त्रीला समाज त्रास देतो, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला तत्पर असतो. त्यांनी आपले चारित्र्य इतरांसाठी आदर्श ठरावा असे जपले, राखले. स्त्रियांची मानसिक शक्ती उपजतच जास्त असते, याची खात्री हे पुस्तक वाचून होते.
उमाताईंनी इतक्या सहज भाषेत लिहिले आहे की, केतकर वहिनी बोलत आहेत आणि आपण त्यांच्या वाड्यात समोर बसून ऐकत आहोत, असा भास होतो. तो पूर्ण कालखंड डोळ्यासमोर उभा राहतो. आता अनेक सुखसोयींनी सज्ज असलेले आयुष्य जगणाऱ्या सध्याच्या काळातल्या सर्वांना निसर्गाशी निगडीत असलेल्या गेल्या शतकातल्या जगण्याच्या संघर्षाची ओळख या कथेतून होते. यासाठी तरी हे पुस्तक वाचायला हवे.