काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर सहज एक रील बघितली. त्या रीलमध्ये एक अतिशय छोटी मुलगी होती. नीट बोलताही येत नव्हतं तिला अजून. पण ती तिच्या आईशी अगदी रागाने भांडत होती. तिचे शब्द स्पष्ट नव्हते, पण तिचा तोतरा राग, तिचे हावभाव, तिच्या चेहऱ्यावरची चिडचिड… सारंच इतकं निरागस आणि गोड होतं की, नकळत हसू आलं. तिची आईसुद्धा मुद्दाम नाटकीपणे तिला उत्तर देत होती. त्या दोघींमधला तो क्षण खूप जिवंत वाटला.
पण मग सहज म्हणून खाली कमेंट्स वाचल्या… आणि खरं सांगायचं तर थोडं अस्वस्थ वाटायला लागलं…
“आत्ता गोड वाटतंय, मोठेपणी डोक्यावर बसेल.”
“आमचं मूल असतं तर, थोबाड फोडलं असतं.”
“संस्कार दिसतायत.”
हे वाचून क्षणभर खरंच प्रश्न पडला… इतक्या छोट्या लेकराकडून आपण नेमकी कसली परिपक्वता अपेक्षित आहोत?
लहान मुलं हट्ट करतात, रडतात, भांडतात, चिडतात… कारण ती अजून स्वतःला समजून घेण्याच्या प्रक्रियेत असतात. जन्मतः कोणीही पूर्णपणे समजूतदार, शांत किंवा ‘संस्कारी’ नसतं. पण कधी कधी वाटतं, आपण दुसऱ्यांच्या मुलांमध्ये जे पाहतो, ते आपल्या स्वतःच्या आठवणींशी जुळत नाही म्हणून लगेच निष्कर्ष काढतो!
कधी कधी वाटतं, आजकाल निंदा/ टीका करण्यासाठी कारण लागतच नाही. समोरची व्यक्ती “माझ्यासारखी नाही” ही एकच गोष्ट पुरेशी वाटते.
हेही वाचा – सौंदर्याचा सुवर्णपाश!
एखादी स्त्री थोडी जाड दिसली तरी निंदा… आत्ममग्न असली तरी निंदा… बिनधास्त असली तरी निंदा… एखादा पुरुष शांत स्वभावाचा असला तरी निंदा… एखादं मूल जास्त बोललं तरी निंदा… कमी बोललं तरी निंदा…
अगदी ऐश्वर्या रायसारख्या स्त्रीलासुद्धा लोकांनी तिच्या चेहऱ्यावरून, वयावरून, शरीरावरून किती सहज मोजायला सुरुवात केली होती… आणि तेव्हा फक्त हेच जाणवत राहतं की, आपण पाहताना किती पटकन जजमेंट (Judgment) करतो.
कधी कधी वाटतं, प्रत्येकाच्या हातात एक असा आरसा असावा… जो आपल्याला आपल्या चुका, अपूर्णता शांतपणे दाखवेल.
“जसा Snow White च्या कथेतला जादूचा आरसा बाह्य सौंदर्य सांगतो, तसा आपल्या आयुष्यात असा एक आरसा असावा — जो आपल्याला आपण कुठे चुकतोय, कुठे अपूर्ण आहोत आणि कुठे सुधारण्याची गरज आहे, हे शांतपणे दाखवेल.”
कारण निंदा अनेकदा मत्सरातून, असुरक्षिततेतून जन्म घेत नाही… तर कधी कधी फक्त समोरची व्यक्ती माझ्यासारखी नाही म्हणूनही आपण प्रतिक्रिया देतो, असं जाणवत राहतं.
निंदा करणारी व्यक्ती परिपूर्ण असते असं नाही. पण तिला स्वतःच्या चुका पाहायच्या नसतात. त्यामुळे ती स्वतःला कायम योग्य समजत राहते आणि समोरच्याला कमी लेखत राहते. दुसऱ्यांच्या आयुष्यावर टीका करणं, हा मग तिचा स्वभाव बनतो.
पूर्वी म्हणायचे, “निंदकाचे घर असावे शेजारी.” पण आता वाटतं, प्रत्येक निंदा आपल्याला मजबूत करत नाही. काही निंदा फक्त आतून थोडं अस्वस्थ करून जाते… आणि कधी कधी असंही वाटतं की स्वतःकडे थोडं शांतपणे पाहिलं, तर इतरांकडे पाहण्याची घाई कमी होते.
स्वतःच्या चुका स्वीकारण्याची एक अद्भुत ताकद माणसाला आतून समृद्ध करते. जेव्हा आपण मनापासून आपल्या त्रुटी, अपयश आणि चुकीचे निर्णय मान्य करतो, तेव्हा कधी कधी दुसऱ्यांच्या चुकांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही सौम्य होतो. कारण तेव्हा समोरची व्यक्ती परकी रहात नाही; ती आपल्यासारखीच, चुका करणारी आणि शिकणारी वाटू लागते.
हेही वाचा – स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…
खरंतर, या जगात अशी एकही व्यक्ती नाही, जी कधीच चुकलेली नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चुका आणि अपूर्णता असतेच. फरक इतकाच की, काही जण त्या स्वीकारतात, तर काही जण त्या लपवण्याचा प्रयत्न करतात.
जे लोक स्वतःला समजून घेतात, ते इतरांनाही थोडं सहज समजून घेतात. नाही का?
चेटकिणीचा आरसा
कधी कधी मी माझी सगळ्यात
नावडती व्यक्ती असते…
जणू चेटकिणीच्या हातातल्या आरशात
माझ सगळ्यात कुरूप प्रतिबिंब
मला दिसतं…
माझ्या मनाचं अपंगत्व
भूतकाळातील चुका
विचारांची विद्रूपता
भयंकर रूप धारण करून मला माझं ते रूप दाखवतात
जे मी अनेक खोट्या चेहऱ्यांमागे लपवत आलेली असते
सत्य कटू तर असतचं पण विद्रूपही असतं
अगदी नैराश्येच्या डोहात ओढून नेणारं
हे कळतं
मग मी धडपडते
माझे अनेक हरवलेले चेहरे शोधण्यासाठी
अनेक निरागस शब्द माझ्या भावनांना सोईस्कर नाव देण्यासाठी
पण एकही चेहरा सापडत नाही
एकही शब्द आवडत नाही
सारं काही फक्त आभास आहे, असं वाटत राहतं
मग मी स्वीकारते माझं ते आरशातलं प्रतिबिंब
माझ्या भावना, माझ्या चुका, माझे विचार
अगदी साऱ्याच कुरूपतेचा स्वीकार
आणि मग दुसऱ्याच क्षणी अचानक
निवळत जाते ती विद्रूपता
ते हरवलेले चेहरे पुन्हा आकार घेऊ लागतात
जणू ते मुखवटे नसावेच इतके खरे वाटायला लागतात
एका स्वीकारात किती ताकद असते नाही?
स्वतःमधली कुरूपता बघितली की
इतरांची कुरूपता सहज स्वीकारते मी
आणि म्हणूनच कधी कधी या चेटकिणीच्या
आरशात मुद्दामच पाहते मी


