अजित गोगटे
पत्रकारितेमधील अनीतिमूल्ये कशाप्रकारे डोके वर काढत असतात, त्याचा बराच अनुभव घेतला आहे. पत्रकारितेच्या नोकरीच्या सुरुवातीस म्हणजे सन 1978-79मध्ये मी त्यावेळच्या भारतातील एकमेव सरकारी वृत्तसंस्थेत नोकरीला होतो, तेव्हाचा हा प्रसंग.
मूळचे रशियन असलेले `व्होडका` हे विदेशी मद्य त्या काळात भारतात आजच्यासारखे सर्रासपणे मिळत नसे. त्यामुळे पट्टीच्या पिणार्यांना व्होडकाबद्दल आकर्षण आणि कुतूहल असे. त्यावेळच्या सोवियत संघाची एक विमानवाहू युद्धनौका मैत्रीपूर्ण सदिच्छा भेटीसाठी मुंबईच्या नौदल गोदीत आली होती. तेव्हा भारत पूर्णपणे सोवियत संघाच्या कंपूत होता. त्या युद्धनौकेच्या कमांडिंग ऑफिसरने मुंबईतील पत्रकारांना युद्धनौकेला भेट देण्यासाठी निमंत्रित केले. ही भेट दुपारच्या वेळी होती आणि त्यात युद्धनौकेवर जेवणही होते. जेवणाच्या आधी कमांडिंग ऑफिसरच्या वार्तालापानंतर पाहुण्या पत्रकारांना व्होडका ‘सर्व्ह’ केली गेली.
युद्धनौकेवरील त्या कार्यक्रमाला आमच्या वृत्तसंस्थेकडून आमचे ‘चीफ रिपोर्टर’ गेले होते. कार्यक्रमासाठी ‘फॉर्मल ड्रेस कोड’ होता. त्यामुळे ते रुबाबात कोट घालून आणि टाय बांधून गेले. दुपारची वेळ असूनही ते युद्धनौकेवर व्होडका तर प्यायलेच. शिवाय त्यांनी तेथील व्होडकाची एक चपटी बाटली गुपचूप कोटाच्या आतल्या खिशात टाकली.
हेही वाचा – पत्रकारितेची नीतिमूल्ये आणि प्रसार माध्यमांची विश्वासार्हता
काही झालं तरी, ती सोवियत संघासारख्या महासत्तेची युद्धनौका होती. त्यामुळे प्रत्येकाच्या हालचालींवर तेथे करडी नजर असणार हे उघड होते. युद्धनौकेवरील गुप्तहेराने आमच्या ‘चीफ रिपोर्टर’ला व्होडकाची बाटली खिशात टाकताना पाहिले होते. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आमच्या ‘चीफ रिपोर्टर’ने युद्धनौकेवर गेल्यावर तेथे आपले व्हिजिटिंग कार्ड दिले होते. त्यामुळे व्होडकाची बाटली खिशात घालणारा पत्रकार कोण आणि कोणत्या माध्यमाचा प्रतिनिधी आहे, हे उघड व्हायला वेळ लागला नाही. तरीही, हे ‘चीफ रिपोर्टर’ जेवण उरकून परत जाईपर्यंत, त्यांना कोणी हटकले नाही आणि त्यांच्या चौर्यकर्माची कॊणी वाच्यता तेथे कोणी केली नाही.
‘चीफ रिपोर्टर’ने ऑफिसला येऊन त्या कार्यक्रमाची बातमी दिली आणि दुसर्या कामासाठी ते पुन्हा बाहेर पडले. थोड्या वेळाने त्या सोविएत युद्धनौकेवरील दोन पूर्ण गणवेशातील नौसैनिक हातात एक बॉक्स घेऊन आमच्या वृत्तसंस्थेच्या ऑफिसमध्ये आले. त्यांच्याकडे आमच्या ‘चीफ रिपोर्टर’चे व्हिजिटिंग कार्डही होते. रिसेप्शनिस्ट कम टेलिफोन ऑपरेटरला ते कार्ड दाखवून त्यांनी अमुक व्यक्तीला भेटायचे आहे, असे सांगितले. ‘चीफ रिपोर्टर’ ऑफिसमध्ये नसल्याने त्या दोन नौसेनिकांना आमच्या चीफ ब्युरो मॅनेजरकडे पाठविले गेले. लष्करी थाटातील कडक सॅल्यूट ठोकून त्या नौसैनिकांनी ‘युद्धनौकेच्या कमांडिंग ऑफिसरने पाठविले आहे’, असे सांगत हातातील बॉक्स ब्युरो मॅनेजर यांच्याकडे सुपूर्द केला.
हेही वाचा – भीक आणि भिकारी
ते दोघे नौसैनिक गेल्यावर ब्युरो मॅनेजरनी उत्सुकतेने बॉक्स न्याहाळून पाहिला. त्या बॉक्ससोबत युद्धनौकेच्या कमांडिंग ऑफिसरने लिहिलेले एक पत्र होते. ‘चोरून नेण्यापेक्षा मागून घेतली असती तर, आम्ही एकाच्या ऐवजी चार बाटल्या दिल्या असत्या…’, अशा आशयाचा मजकूर अत्यंत शालीन भाषेत त्या पत्रात लिहिला होता. बाहेर गेलेले ‘चीफ रिपोर्टर’ परत आल्यावर ब्युरो मॅनेजरने त्यांची चांगली खरडपट्टी काढली. सर्व ऑफिसभर हा खमंग चर्चेचा विषय ठरला.
पत्रकारितेची ही काळी बाजू या व्यवसायातील अगदी सुरुवातीच्या काळातच अनुभवास आल्याने मला मात्र त्यावरून पुढील आयुष्यभरासाठी उत्तम धडा मिळाला.
(क्रमशः)
अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मुख्य_वार्ताहर, व्होडका, युद्धनौका, पत्रकार_परिषद, Chief_Correspondent, Vodka, Warship, Press_Conference