Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आषाढी एकादशी… विठ्ठलाला अनन्य शरण जाऊया…

    July 21, 2026

    अंतर्मनातील विठ्ठल

    July 21, 2026

    मैत्री

    July 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, July 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अंतर्मनातील विठ्ठल
    ललित

    अंतर्मनातील विठ्ठल

    ॲड. कृष्णा पाटीलBy ॲड. कृष्णा पाटीलJuly 21, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, ॲड कृष्णा पाटील, लेखक कृष्णा पाटील, सौरभची बारावीची परीक्षा, सयाजी नानांची वारी, सौरभची निराशा, अंतर्मनातील विठ्ठल, वारकऱ्यांना अन्नदान, रामकाकांचा गायनातील विठ्ठल, संताजीची अपंगत्वावर मात, वारीचे महत्त्व
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    उत्तरार्ध

    आज बारावीचा निकाल लागला. सौरभ हुशार आहे… चुणचणीत आहे. शाळेत नेहमी डिस्टिंक्शनमध्ये असतो. त्यामुळे आज निकालही तसाच लागणार अन् तो मेडिकलला जाणार, असं सर्वांनी परस्पर ठरवून टाकलं. अर्थात, तोही “हो”ला “हो” म्हणत गेला. पण प्रत्यक्षात सौरभला केवळ बहात्तर टक्के मार्क मिळाले. सौरभची अवस्था वाईट झाली होती. रडून रडून डोळे लाल झाले होते. पार चोळामोळा झाल्यासारखी त्याची स्थिती होती. पोराचा हा निकाल ऐकून माणिकराव आणि वैशाली हे दोघेही हादरले होते.

    माणिकरावांनी लगेच सयाजी नानांना बोलावून घेतले. पण दोन दिवसांनी सालाबादप्रमाणे पंढरपूरच्या वारीला अन्नदान करण्याचा कार्यक्रम असल्याने सर्व पॅकिंग करायला रात्री अकरा वाजले, त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी सकाळीच आले. सयाजी नाना सौरभला म्हणाले, “चल आपण वारीला जाऊ. विठ्ठलाला भेटू”.

    हातातला टॉवेल बाजूला ठेवून सौरभ म्हणाला, “मी काय म्हातारा झालो नाही आणि माळ ही घातली नाही.”

    “माळ घालायची आवश्यकता नसते सौरभ. तू येऊन तरी बघ एकदा वारीला”. पण सौरभ ठाम होता.

    दुसऱ्या दिवशी सकाळी सयाजी नानांनी सौरभला पुन्हा फोन केला.‌ “राहूदे वारीला. आपण वारकऱ्यांना अन्नदान तरी करून येऊया. तिथं जेवणं वाढायला, पाणी द्यायला कोणतरी हवं आहे. तू चल”

    “तिथं जास्त वेळ थांबायचं नाही. लवकर परत फिरायचं. तर येतो,” सौरभने अट घातली.

    रिमझिम पाऊस सुरू होता. आभाळ सतत ठिपकत होतं. हवेत गारठा जाणवत होता. रंगीबेरंगी प्लास्टिकचे कागद अंगावर टाकून वारकरी चालत होते. गळ्यात तुळशीची माळ. कपाळावर गंध. गंधामध्ये अबीर बुक्का. फाटकी तुटकी चप्पल. मळलेली कपडे. खांद्यावर भगवी पताका. बाहेरून दुभंगलेले, पण आतून अभंग असलेले हे वारकरी… रस्त्यावर पांढरीशुभ्र ओळ आखल्यासारखी लांबच्या लांब नजरेच्या टप्प्यात मावणार नाही अशी रांग… वारकरी चालताहेत. गाताहेत. फुगडी खेळताहेत. ज्ञानोबा तुकोबाचा गजर मुखी आहे. टाळ मृदंगाचे ध्वनी. पाठीमागे नगारखाना. त्याबरोबर मोठे अश्व. त्यामागे दिंड्या. दिंड्यापुढे पालखीचा रथ. रथापुढे बंडू चोपदार. त्याच्यासोबत अन्य चोपदार. त्यांच्या डोक्याला लाल भडक पगडी. हातात लाकडी नक्षीदार दंड. दिंडीला आदेश देण्याचे काम ते करताहेत. सगळं वातावरण चैतन्यमय, आनंदी, समाधानी, टवटवीत, ऊर्जा निर्माण करणारं…

    हेही वाचा – सौरभचा बारावी परीक्षा निकाल अन्…

    समोरचे दृष्य पाहून सगळ्यांचे चेहरे खुलले. सयाजी नानांनी वारकऱ्यांचे दर्शन घेतले. पाठोपाठ सौरभनेही दर्शन घेतले. जवळच दिंडीचा मुक्काम होता. संध्याकाळच्या प्रसादाचा कार्यक्रम तेथेच होणार होता.

    इतक्यात वारीला आलेला दिंडीमधला रामकाका समोरून आला. सयाजी नानांना उराउरी भेटला. चरण स्पर्श झाले. म्हणाला, “माऊली, कधी आलायसा?”

    सयाजी नाना म्हणाले, “आत्ताच आलो. आलो तसं तुमच्या मुक्कामाकडे निघालोय. आजच अन्नदानाचा कार्यक्रम आहे”.

    “हा रामकाका शिराळ्याकडील चरणचा. वारीसाठी दरवर्षी येतो. रामकाकाला एक मुलगा, एक मुलगी आहे. दोघांची लग्ने झालेली आहेत. घरी सून आहे. मुलगी चांगल्या ठिकाणी दिलेली आहे. मग रामकाका सुखात नसते तर नवलच. आयुष्यभर गडी लै स्वाभिमानाने जगला. सुरुवातीला रेल्वेत कोळसा टाकायची नोकरी होती. ती सहा वर्षे केली. दिवसभर कोळशात. लालसर धगीत. सारं अंग निळं काळं पडू लागलं. मग ती नोकरी सोडली. पण दुसरी नोकरीही सापडेना. दुसऱ्या नोकरीच्या शोधात दोन-पाच वर्षे गेली. जवळचे पैसे संपले. दिवसभर वणवण भटकायचं. नोकरीचा तलाश घ्यायचा. रात्री निराश होऊन घरी परतायचं… असं चालू होतं.

    एके दिवशी बेरिंग बनवण्याच्या कारखान्यात वॉचमनची नोकरी मिळाली. दिवसभर वॉचमन म्हणून उभा राहायचं. येणाऱ्या जाणाऱ्याला नमस्कार करायचा. अनोळखी आला तर, तपासणी करायची… अशी ही नोकरी. लवकरच तिथेही कंटाळा आला. पुन्हा भटकंती. कुठल्याच नोकरीत मन लागत नव्हतं. त्यामुळे प्रत्येक नोकरीत अपयश येत होतं.

    मात्र गाण्याचा छंद लागला होता. गाण्याची लहर आली की, रामकाका तमाशाला जात. गळा भारदस्त होता. आवाजही ओला होता. वरच्या पट्टीत सूर लावला म्हणजे गगनभरी ललकारी बाहेर पडायची. गळा ऐकून एके दिवशी तमाशात बोलावणं झालं. मग रामकाकाने नोकरीचा हव्यास सोडला. सरळ त्या तमाशात गेला. काही दिवसांनी लक्षात आले, तमाशातही मन रमत नाही!

    आता रामकाका नुसताच गाऊ लागला. त्याच्या पहाडी आवाजाने लोक सैरभैर होऊ लागले. कानात प्राण आणून ऐकू लागले. रामकाकाने युट्यूब चॅनल काढलं. पैसाही मिळू लागला. रामकाका आता मोठा कलावंत झाला. रामकाकाला त्याचा खरा विठ्ठल भेटला…”

    सयाजी नाना बोलायचे थांबले. सौरभनेही काही विचारले नाही. काही मिनिटे अशीच गेली. विचारांच्या तंद्रीतून बाहेर आल्यासारखं एकदम सौरभने विचारले, “रामकाका किती वर्षे वारीला येत आहेत?”

    समोरून येणाऱ्या संताजीकडे पाहत सयाजी नाना म्हणाले, “गेली पंधरा वर्षे रामकाका न चुकता वारीला येत आहेत.”

    संताजीने सयाजी नानांना नमस्कार केला आणि म्हणाला, “कधी आलायसा नाना?”

    “आत्ताच आलो आहे. आज अन्नदानाचा कार्यक्रम आहे. तुमचा कितवा दिवस आहे वारीचा?”

    “आजचा पाचवा दिवस आहे नाना.”

    खांद्यावरची भगवी पताका सावरत संताजी पुढे निघून गेला.

    “हा संताजी. मिलिटरीमध्ये होता. सीमेवर लढताना दोन्ही हात गेले. घरी सुशिक्षित देखणी बायको. एक छोटी गोंडस मुलगी. थकलेले आई, वडील. संताजी, गडी तसा दणकट. असते दोन्ही हात तर, पहार वाकवली असती. पण सर्वच इलाज खुंटला. दोन्ही हात गेल्यामुळे नोकरी गेली. अधू होऊन घरी बसायची वेळ आली. संताजीच्या अपंगपणाचं बायकोला बरं वाटलं नाही. ती हिडीसफिडिस करू लागली. थोडे दिवस गेले आणि एके दिवशी जारकर्म करून मुलीला संताजीच्या गळ्यात मारून ती एकटीच निघून गेली, परपुरुषाबरोबर. त्या दिवशी संताजी खूप प्याला. दारूच्या ग्लासात बायकोचं जारकर्म बुडवू लागला…

    पण दुसऱ्या दिवशी त्याने विचार केला. पोटची सुंदर, हुशार मुलगी आहे. तिच्याकडे बघून तरी आपल्याला जगावे लागेल. तो मुलीसाठी जगू लागला. घरी आई जेवू घालत होती. आंघोळ घालत होती. सर्व उसाबर करीत होती. त्याचवेळी संताजीने रनिंगची प्रॅक्टिस चालू केली. रोज रनिंगला पुणदीच्या सपाट माळावर तो जाऊ लागला. दोन हात नसले म्हणून काय झाले? पाय तर होतेच की! शिवाय पळायचा पहिल्यापासून नाद. लहानपणी तर आई म्हणायची, ‘निसर्गाने दोनच पाय दिलेत म्हणून बरं. आणखी दोन दिले असते तर समुद्रापार गेला असतास…’

    संताजी पळत राहिला. मिलटरीत कमावलेले शरीर होते. थकून जाण्याचा प्रश्नच नव्हता. दोन चार वर्षे तो पळतच राहिला. एके दिवशी जिल्ह्याला मॅरेथॉन स्पर्धा होती. त्यामध्ये संताजीने भाग घेतला आणि तो जिल्ह्यामध्ये पहिला आला. पहिलं बक्षीस आईच्या चरणी अर्पण केलं आणि त्यानंतर संताजीने मागे फिरून बघितलंच नाही. मॅरेथॉनच्या स्पर्धा तो जिंकतच राहिला. जिल्हा पातळीवर, राज्यपातळीवर तो जिंकत राहिला. गेल्या वर्षी देशपातळीवरची स्पर्धा होती. अत्यंत चुरशीची. जीवघेण्या वेगाची. संताजीने ती मॅरेथॉन स्पर्धा निर्विवादपणे जिंकली!

    संताजीने देश पातळीवरची स्पर्धा एका रात्रीत नाही जिंकली. त्या अगोदर कित्येक वर्षं तो तपश्चर्या करीत राहिला. त्याने एक स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाच्या दिशेने तो चालत राहिला. त्याने विठ्ठल पाहिला. मग तो विठ्ठलाच्या प्रेमात पडला… आणि त्यातच विठ्ठलमय होऊन गेला. संताजीला त्याचा खरा विठ्ठल भेटला.”

    सयाजी नानांनी सौरभला बाजूला बोलवून घेतलं. त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले, “सौरभ, तुला रामकाका भेटला. संताजी भेटला. असे कितीतरी रामकाका आणि संताजी वारीमध्ये आहेत. ते त्यांच्या त्यांच्या विठ्ठलाला भेटायला निघालेले आहेत. वारीमधले सगळेच रामकाका आणि संताजी बाहेरून फाटलेले दिसतील. तुटलेले दिसतील. भंगलेले दिसतील. परंतु आतून मात्र ते अभंग आहेत. माणसानं तसंच असायला हवं. तू एक परीक्षा दिलीस. त्या परीक्षेमध्ये मार्क कमी मिळाले. तू त्याला अपयश मानलंस आणि पुन्हा कधीही, कुठेही यश मिळणार नाही, अशी चुकीची समजूत करून घेतलीस. तुझ्यापेक्षा कितीतरी वाईट प्रसंग संताजी आणि रामकाकावर येऊन गेले. पण ते त्यांचा त्यांचा विठ्ठल शोधतच राहिले. आपण वारीला यायचं ते टाळ कुटण्यासाठी नव्हे, तर आपला विठ्ठल शोधण्यासाठी. प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा. कुणासाठी आयटी इंजिनियर… कुणासाठी वकील… कुणासाठी डॉक्टर… कुणासाठी प्रोफेसर… कुणासाठी क्लास वन ऑफिसर… कुणासाठी आयएएस अधिकारी… कुणासाठी कारखानदार… कुणासाठी साहित्यिक… कुणासाठी कलाकार… कुणासाठी खूप खूप श्रीमंत व्यक्ती… पण प्रत्येकासाठी विठ्ठल वेगळा!

    हेही वाचा – Love marriage : जुन्या विचारांना आव्हान देणारं नवं व्हर्जन

    बरं का सौरभ, विठ्ठल हा तुमच्या शाळेतल्या मार्कात नसतोच मुळी. तो असतो आपल्या आत कुठेतरी दडलेला. त्याला शोधून काढावं लागतं. त्याच्या प्रेमात पडावं लागतं. त्याच्या भजनी लागावं लागतं. अपयश आलं तरी थांबायचं नसतं. मगच तो आपणास भेटतो. आपल्या आत दडलेल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी वारीला यावं लागतं. एकदा विठ्ठल भेटला की, मग जीवन आनंदी होतं. आनंदी जीवनालाही पुन्हा वारीचा हव्यास लागतो. एकदा हव्यास लागला की, शीण येत नाही. कंटाळा येत नाही. आनंद मात्र होतच राहतो. म्हणून वारीमधला प्रत्येक वारकरी तुकोबाचा अभंग म्हणतो,

    भाग गेला, शीण गेला

    अवघा झालासे आनंद ।।

    वारीला का यायचं? या प्रशाचं उत्तर मिळाल्यागत सौरभ एकदम चमकला. त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसू लागले.

    अन्नदानाचा कार्यक्रम संपायला रात्रीचे आठ वाजले. त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला. सलग चार पंगती बसल्या. प्रत्येकाच्या पुढे केळीच्या हिरव्यागार ताज्या पानावर गोडधोड अन्नाचा प्रसाद ठेवला गेला. वारकरी जेवण करून तृप्त झाले.

    निरोप घेताना सयाजी नानांनी पुन्हा एकदा वारकऱ्यांना साष्टांग नमस्कार केला… “आम्ही केलेली सेवा पवित्र मानून घ्या. चुकलं माकलं पदरात घ्या. पुढच्या वर्षी पुन्हा संधी द्या.”

    रामकृष्ण हरी… रामकृष्ण हरी… बोला पुंडलिक वरदा, हरी विठ्ठऽऽऽ ल…

    श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय..!

    अवघी दिंडी दुमदुमली. माऊली माऊली असा घोष करणाऱ्या त्या वारकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू जमले. चेहऱ्यावर तृप्ती, हृदयात मावेल इतका आनंद घेऊन ती वारकरी दिंडी फुलून गेली. थरथरणाऱ्या शरीराने जमिनीवर माथा टेकवून त्यांनी एकमेकांचा राम राम घेतला.

    ड्रायव्हरने गाडीला स्टार्टर मारला. सयाजी नानांनी मागे वळून पाहिले तर, मागच्या सीटवर सौरभ नव्हता. गाडीच्या खिडकीतून त्यांनी बाहेर पाहिले. सौरभ एका वारकऱ्याबरोबर गप्पांमध्ये रंगला होता. ‘गेलो तर, लगेच परत फिरायचं,’ या अटीवर आलेला सौरभ इथं आल्यावर चांगलाच दंग होऊन गेला होता. रात्रीचे नऊ वाजले होते.‌ पुन्हा पावसाचं भुरंगाट सुरू झालं होतं.

    सयाजी नानांनी मोठ्या आवाजात सौरभला हाक मारली. “सौरभ, खूप उशीर झाला आहे. पाऊस पण सुरू झाला आहे. आपल्याला लवकर जावं लागेल. ये लवकर.”

    इनोव्हा गाडीच्या दिशेने सौरभने शांतपणे वळून पाहिले. तो तिथून हलला सुद्धा नाही. ठामपणे आणि मोठ्या आत्मविश्वासाने तिथूनच म्हणाला, “नाना, मी आता घरी येणार नाही. तुम्ही घरी गेल्यावर, माझ्या आई बाबांना निरोप द्या. मी इथूनच वारीला जाणार आहे.”

    सयाजी नाना आणि त्यांचे मित्र सौरभकडे आश्चर्याने आणि कौतुकाने पाहतच राहिले….!

    समाप्त
    ॲड. कृष्णा पाटील

    मोबाइल – 9372241368

    Related Posts

    मैत्री

    July 21, 2026 ललित

    वाकडं बोट

    July 21, 2026 ललित

    वेळ

    July 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मैत्री

    By दिलीप कजगांवकरJuly 21, 2026

    राज आणि नेहा पुण्यातील एका प्रशस्त बंगल्यात राहणारे अतिशय श्रीमंत दाम्पत्य होते. बड्या साहेबांचा मुलगा…

    वाकडं बोट

    July 21, 2026

    वेळ

    July 20, 2026

    कलियुगातील एकलव्य

    July 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आषाढी एकादशी… विठ्ठलाला अनन्य शरण जाऊया…

    July 21, 2026

    अंतर्मनातील विठ्ठल

    July 21, 2026

    मैत्री

    July 21, 2026

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    July 21, 2026

    वाकडं बोट

    July 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : समुद्रीं दाटे भरितें, तैं समुद्रचि भरी तरियांते

    July 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 367
    • अवांतर 198
    • आरोग्य 131
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 499
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 240
    • मैत्रीण 24
    • ललित 793
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आषाढी एकादशी… विठ्ठलाला अनन्य शरण जाऊया…

    July 21, 2026

    अंतर्मनातील विठ्ठल

    July 21, 2026

    मैत्री

    July 21, 2026
    Most Popular

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    July 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.