प्रदीप केळुस्कर
भाग – 4
विजयाने माझ्याकडे पाहिलं मात्र… क्षणात ओळख पटली आणि ती जवळ जवळ ओरडलीच…
“मनीष!”
हॉटेलमधले गिऱ्हाईक एकदा माझ्याकडे आणि एकदा तिच्याकडे पाहात होते. मी मंद स्मित करत मान हलवली. “ये रे आत ये,” तिने वडे तळणाऱ्या बाईला गिऱ्हाईकाकडे लक्ष द्यायला सांगितले. मी आत गेलो. 28 वर्षांपूर्वी होतं तसंच घर होतं.
‘‘कधी इलस? माका ठावंक होता, एक ना एक दिवस तू माका शोधत येतलंसच, माझा मन माका सांगत होता.’’
‘‘परवा आलो. आज या गावची जत्रा हे लक्षात होती. 28 वर्षांपूर्वी मी जत्रेला आलो होतो. पण तू इथे असशील असे वाटले नव्हते.’’
‘‘अरे, मी गेली 10 वर्षा हयच आसय. आई गेल्यानंतर ह्या हॉटेल सुरू ठेवलंय.’’
‘‘पण तुझं लग्न झालेलं ना?’’
‘‘लग्न झाला आणि ता सगळा संपला सुद्धा!’’
‘‘म्हणजे?’’
“माझ्या मनात तूच होतंस, तुझी मी वाट बघत होतंय, पण तू पुण्याक गेलंस नि माका विसारलस. माझ्या आईक काळजी माझी, माझ्याबरोबरच्या सगळ्यांची लग्ना झाली, विजूच्या लग्नाचा काय? मी तिका सांगितलंय, मी लगीन करीन तर मनीष बरोबर. म्हणून मग, आई तुझ्या आईक विचारूक गेली. तुझी आई म्हणाली, मनीष आता मोठो डॉक्टर होतलो. फॉरेनाक जातलो. तेका शोभणारी डॉक्टरीन व्हयी तेका. माझी आई माका म्हणाली, तू मनीषचो नाद सोड. तो तुका इसारलो. तेका डॉक्टरीन व्हयी. तेवा दुसरा स्थळ बघूया आणि आईनं काजूसोलाचो चिपळूनचो व्यापारी आमच्या गावात येय, तेना माका बघून मागणी घातल्यानं. आईक वाटला हो सज्जन माणूस आसा. पैशेवालो आसा, म्हणून तेच्याबरोबर माझा लगीन लावून दिल्यान. लगीन करून मी त्याच्याबरोबर चिपळूणाक गेलंय. तेव्हा कळला हो बदमाश माणूस आसा. तेची एक ठेवलेली बाई होती. तिच्या इशाऱ्यावर हेचो संसार आणि माझ्या नवऱ्याक दारू, जुगाराचा व्यसन. माझी सासू म्हणजे भांडखोर बाई. तिना पहिल्या दिवसापासून माझो छळ सुरू केल्यान. माझो नवरो दारूच्या नशेत आणि त्या बाईच्या घरात दिवसभर पडलेलो.”
हेही वाचा – विजयाला भेटण्याच्या ओढीने गावी जत्रेला गेलो…
“घरात हक्काचो झिल व्हयो म्हणान माझ्याबरोबर लगीन केल्यान. पण लग्नानंतर पाच वर्षा झाली तरी माका मुल झाला नाय म्हणून माझो नवरो आणि सासू माका मारीत. मग एकदा दारूच्या नशेत गाडी चालवताना अॅक्सिडंट करून माझो नवरो मेलो आणि मी घाणीतून सुटलंय. एकदा गुपचूप घरातून बाहेर पडलंय आणि कोकण रेल्वेत बसून आईचा घर गाठलंय. माझी ही अवस्था बघून आई आजारी पडली. तिका अन्न गोड लागेना, रात्री झोप येईना. पण ह्यो हॉटेल व्यवसाय मी सुरू केलय… आई गेली तरी ह्या हॉटेल व्यवसायान माका जगवल्यान आणि गावातले सगळे शेजारीपाजारी तेनी माका साथ दिल्यानी म्हणून इतकी वर्षा मी जिवंत आसय… आणि आज तू समोर दिसलंस आणखी माका काय व्हया. मी मराक मोकळा झालय.’’ स्फूंदून स्फूंदून रडत विजया सांगत होती.
पण पटकन सावरून मला म्हणाली, “…आणि तुझी बायको मुला? आणि तुझे आई-बाबा? मी काय विचारलंच नाय. मी माझीच कर्मकहाणी सांगत सुटलय.”
“आईबाबा बरे आहेत, पण त्यांच वय झालंय… आणि माझा संसार म्हणशील तर…” मी तिला अनिताशी झालेलं लग्न आणि घेतलेला काडीमोड हे सर्व सांगितलं.
‘‘अरे, त्या अनिताचा तरी काय चुकला? श्रीमंत घरात जन्म झालेलो तिचो आणि एवढी मोठी डॉक्टरीन, ती वर्षा दोन वर्षात कशी बदलात? तुझाच चुकला. तू अनिताचो विचार करून तुझ्या विचारात बदल करूक व्हयो व्हतो आणि आता खय असता अनिता?’’
‘‘त्यानंतर तिने मूळ पुण्यातील पण आता अमेरिकेत स्थायिक झालेल्या डॉक्टरशी लग्न केले आणि ती अमेरिकेला गेली. ती मजेत आहे.’’
हेही वाचा – गरीबांचा डॉक्टर बनणे, हेच ध्येय!
‘‘बरं झालं बाबा… तिचा तरी नुकसान नको.’’
‘‘बरं मी देवळात जाऊन येतो. 28 वर्षाxनंतर पुन्हा एकदा पालखी सोहळा पाहतो. 28 वर्षांपूर्वी पालखीसोबत आरती घेऊन तू होतीस आणि आता तू जात नाहीस जत्रेला?’’
‘‘नाय, आता हुरूपच गेलो. ह्या घर आणि हॉटेल सोडून खयच जाणय नाय आता. तू जा पालखी बघून ये.’’
मी बाहेर पडलो, देवळाकडे गाडी वळविली. एव्हाना पालखी बाहेर येण्याच्या हालचाली सुरू होत्या. ढोल-ताशे वाजत होते. मी लांबून पाहात होतो. सेवेकरी पालखी बाहेर घेऊन आले आणि एक नवीन 18-19 वर्षांची मुलगी हातात आरती घेऊन बाहेर आली. मला 28 वर्षांपूर्वीची विजया आठवली…. तिची मला शोधणारी भिरभिरणारी नजर आठवली. आता ढोलताशे जोरात वाजत होते. मी देवळाच्या बाहेर आलो. गाडीत बसलो आणि घरी निघालो. रात्री 11 च्या सुमारास घरी पोहोचलो. आई वाट पाहत होतीच…
सकाळी उठलो, तेव्हा आईबाबा टेबलावर बसून चहा घेत होते. मी चहा प्यायला त्यांच्याबरोबर बसलो. आई म्हणाली, ‘‘कोण भेटलं का ओळखीचं?’’ आाfण मी सरू मावशीचे घर, भेटलेली विजया, विजयाचं लग्न आणि नवरा वारल्यानंतर माहेरी आलेली विजया, तिने सुरू ठेवलेले सरुताईंचे हॉटेल या सर्व गोष्टी सांगितल्या… पेपर वाचता वाचता बाबा सर्व ऐकत होते. उठता उठता ते म्हणाले, ‘‘मागे झालेली चूक सुधारण्याची वेळ आहे ही. दोन जीवांना एकत्र यायचे असेल तर येऊदे.’’ एवढं बोलून बाबा बागेत निघून गेले. आईने पटकन मला विचारले, ‘‘मनीष तुझा विचार आहे का, विजयाशी लग्न करायचा? काय तो त्वरित निर्णय घे. तुझे एकटेपण पाहवत नाही रे आम्हाला!’’
मी होकारार्थी मान हलविली.
‘‘मग चल, आपण विजयाला भेटायला जाऊ.’’
‘‘पण आई, मी विजयाला या परिस्थितीत कसे विचारू?’’
‘‘ते माझ्यावर सोड. तू मला तिच्या घराकडे घेऊन जा. पाहिजेतर तू गाडीत बसून रहा. मी तिच्याशी काय ते बोलते.’’
दोन तासांत आम्ही निघालो. मी आईला सरू मावशीचे घर दाखवलं आणि गाडी थोडी पुढे घेऊन गाडीत बसून राहिलो. आई आणि विजया यांचे काय बोलणे होते आणि विजया काय निर्णय घेते, हे ऐकण्यासाठी कान आतूर झाले होते. एक तास झाला आणि गाडीच्या काचेवर टकटक झाली. मी आई आली असे समजून दार उघडले तर आई आणि हातात छोटी बॅग घेऊन विजया होती! आईचा चेहरा आनंदाने फुलला होता. मला म्हणाली – ‘‘चल. गाडी सुरू कर. पहिल्यांदा वेंगुर्ल्याच्या बाजारात गाडी घे.’’
मी वेंगुर्ल्याच्या दिशेने गाडी घेतली. गाडीत आई आणि विजया या दोघी सरू मावशीच्या आठवणी काढत होत्या. गाडी वेंगुर्ल्याला पोहोचली. तशी आईने गाडी नेवाळकर क्लॉथ समोर थांबवायला सांगितली. दोघी खाली उतरल्या. थोड्यावेळाने चार-पाच कपड्यांच्या पिशव्या घेऊन परत गाडीत बसल्या.
हेही वाचा – सरू मावशीच्या हॉटेलमध्ये डोकावलो आणि…
घरी पोहोचताच आईने फोनाफोनी करून सर्व व्यवस्था केली आणि दुसऱ्या दिवशी आरवलीच्या वेतोबा मंदिर समोरील पणशीकर मंगल कार्यालयात सुमारे 10-12 लोकांच्या साक्षीने माझे आणि विजयाचे लग्न झाले. आता आईबाबा खूश आहेत. त्यांना नवीन नवीन पदार्थ करून घालणारी आणि प्रेमळ, सर्वांची काळजी घेणारी सून मिळाली.
मी माझी पुण्याची नोकरी सोडली आणि आमच्या जिल्ह्यात माजी मंत्र्याने सुरू केलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयावरील ऑपरेशन्स करतो आहे. माझ्या आईबाबांचे संस्कार मी विसरलेलो नाही. गरीबांसाठी जवळ जवळ मोफत ऑपरेशन मी करतो. माझ्या कौशल्यामुळे जवळच्या गोव्यात किंवा कोल्हापूर, बेळगाव भागात माझे नाव झाले आहे. लांबून लांबून पेशंट येतात आणि कमी खर्चात हृदयावरील ऑपरेशन करून घेतात.
आमचे घर आता मी आणखी वाढविले आहे. वर एक मजला चढवला आहे. पुण्याहून माझे मित्रमंडळ कोकणचा आनंद घेण्यासाठी येतात. डॉ. अनिल अवचट दोन वेळा येऊन गेले. डॉ. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे या भागात आले होते, तेव्हा दोन दिवस राहून गेले. पुण्यातील नाट्य कलाकार मंडळी मुद्दाम येतात. विजयाच्या हातचे मासे त्यांना फार आवडतात. शाकाहारी मंडळींसाठी घावणे, आंबोळी, काळ्या वाटाण्याची उसळ करण्यात विजया माहिर आहे. तुम्ही पण या. तुमच्या हृदयाच्या काही समस्या असतील तर, मी त्या ठीक करीन आणि मालवणी पदार्थ खायचे असतील तर, विजयाच्या हातचे पदार्थ खा!
आता मी आणि विजया खूश आहोत… आईबाबा खूश आहेत. सुखी आहेत. हल्ली प्रशांत दामलेच्या एका लग्नाची गोष्ट या नाटकातील गाणे वारंवार ओठावर येते –
‘‘सुख म्हणजे नक्की काय असतं…’’
समाप्त
मोबाइल – 9422381299


