जशी आपण आपल्या त्वचेची काळजी घेतो, तशीच काळजी केसांची सुद्धा घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे केस मऊ, मुलायम आणि तजेलदार दिसतील. जेव्हा आपण केसांची काळजी कशी घ्यावी, याचा विचार करतो तेव्हा, आपल्या मनात खूप प्रश्न निर्माण होतात… खूप शंका उत्पन्न होतात.
सर्वात प्रथम केसांना लावायच्या तेलांबद्दल विचार येतो. तेल लावावे का? त्याचा खरंच फायदा होतो का? तेल कसे लावावे? कुठले तेल वापरावे?
आता आपण याबद्दल थोडी माहिती बघू. आपल्याकडे केसांना लावण्यासाठी भरपूर प्रकारची तेले उपलब्ध आहेत. जसे की, खोबरेल तेल, बदामाचे तेल, एरंडेल तेल इत्यादी. केसांना तेल लावणे, या मागे एक शास्त्र आहे, ते समजून घेऊया. केसांना तेल लावणे म्हणजेच केसांच्या मुळांना तेल लावणे. केसांना खूप तेल लावण्याची गरज नसते. कारण, त्वचेची तेल शोषण्याची क्षमता ही कमी असते, उगाचच भरपूर तेल लावले तर, थोडेच तेल शोषले जाते. बाकी तेल वाया जाते. म्हणूनच तेल Overnight नाही ठेवले तरी चालते. नहाण्याच्या तासभर आधी लावले तरी चालते. तेल लावून जास्त बाहेर पडू नये, कारण तेल हवेतून धूळ आकर्षित करते.
तेल थोडे कोमट करून लावावे. कोमट तेलाने मुळांना थोडी उष्णता मिळते, ज्यामुळे त्वचेची रंध्रे प्रसरण पावतात आणि रक्ताभिसरण वाढते. परिणामी, मुळांना त्यावाटे अजून छान पोषण मिळते.
हेही वाचा – Hair care : केसांची त्रिस्तरीय रचना…
कुठले तेल वापरावे हे ठरवताना प्रत्येक तेलाचा आपल्या केसांवर काय परिणाम होतो, हे बघून आलटून पालटून ते वापरावे. तेल लावताना बोटांनी सर्व मुळांना छान चोळून लावावे. तेल लावून झाले की, टॉवेल गरम पाण्यात (मुळांना जेवढा गरमपणा सहन होईल, तेवढे गरम पाणी घ्यावे. खूप गरम पाणी वापरू नये.) बुडवून व्यवस्थित पिळून घ्यावा आणि डोक्याला गुंडाळावा, जेणेकरून वाफेमुळे गरमपणा मिळेल आणि रक्ताभिसरण वाढेल. तसेच, केसांना अजून पोषण मिळेल.
हेही वाचा – Hair care : अनावश्यक केसांसाठी… Epilation
तुम्ही केसांना तेल लावले नसले तरीही, तुम्ही बघितले असेल की, 2-3 दिवसांनी तुमच्या केसांना एक प्रकारचा तेलकटपणा दिसतो. आपण जेव्हा त्वचेबद्दलची माहिती घेतली होती, तेव्हा आपण बघितले होते की, त्वचेमध्ये sebaceous glands असतात आणि त्यातून Sebum secret होते. हे केसांनाही लागू होते. कारण या ग्रंथी केसांच्या मुळांशीसुद्धा असतात. त्यामुळेच केस तेल न लावता सुद्धा तेलकट दिसतात. आता तेल कधी कधी लावावे? तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा जर केस धुणार असाल तर, 1 वेळ तेल लावलेले चालेल किंवा 15 दिवसांतून एकदा लावले तरी चालेल. प्रत्येक वेळी तेल लावण्याची गरज नसते. पण हा शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक चॉइस आहे. तुम्ही जेव्हा केसांना तेल लावून मसाज कराल तेव्हा 10 किंवा 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ करू नये. कारण, जास्तवेळ मसाज केल्यामुळे muscle fatigue होऊ शकतो. त्यामुळेच तुम्ही जेव्हा सलूनमध्ये जाऊन head massage करून घेता तेव्हा तो 15 मिनिटांचा केला जातो. बाकी वेळ वाफ, hair wash हे केले जाते.
काही वेळा असाही प्रश्न पडतो की, तेल लावले नाही तर काय? तेल लावल्याने, जेव्हा तुम्ही मसाज करता, तेव्हा त्वचेवर अतिघर्षण होत नाही आणि बोटे खूप सहजपणे त्वचेवर फिरतात. पण तेल लावले नाही तर, काहीवेळा त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते.
पुढच्या भागात आपण केसांची अजून कशा प्रकारे काळजी घ्यावी, ते बघू.
(क्रमश:)


