Sunday, August 31, 2025

banner 468x60

Homeआरोग्यआरोग्यम् धनसंपदा...

आरोग्यम् धनसंपदा…

रविंद्र परांजपे

मागील सर्व लेखांमधे आपण विशेष करून निरामय मानसिक आरोग्यासंबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन घेतले. आता Health is Wealth अर्थात आरोग्यम् धनसंपदा! या उक्तीचा समर्पक अर्थ असा आहे कि आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे. वास्तविक पाहता, आपण जेव्हा जन्माला येतो, तेव्हा आपले शरीर निरोगी आणि स्वस्थ असते. तथापि,  कालपरत्वे वयोमानानुसार तसेच वातावरणानुसार आपल्या शरीर-मनात तसेच आपल्या रोजच्या जीवनात हळूहळू बदल होत जातात. असे बदल होणे हे स्वाभाविक तसेच नैसर्गिक देखील आहे. काही बदल आपल्या कळत-नकळत आपोआप होत असतात; तर काही बदल आपण मुद्दामून घडवून आणतो. कारण काही असले तरी बदल होत असतात आणि ते देखील सतत होत असतात, हे मात्र खरेच आहे. कारण परिवर्तन हाच निसर्गनियम आहे.

आता प्रश्न पडतो की, असे बदल चांगले की, वाईट? उत्तर एकदम सोपं आहे की, चांगले बदल सुपरिणाम घडवून आणतात तर, वाईट बदल दुष्परिणामांना आमंत्रित करतात… आणि इथेच तर खरी मेख आहे. परिवर्तन झाले की, प्रगती व्हायला हवी, असा सर्वसाधारण नियम आहे, कारण त्याच अपेक्षेने आपण बदल घडवत असतो. वास्तविक, प्रगती होत असते देखील, पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. प्रगती आपल्याबरोबर काही अवचित विपरित परिणाम घेऊन येत असते. थोडक्यात, काळाबरोबर राहण्यासाठी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात बदल करावे लागतात आणि आपली दिनचर्या पूर्णतः बदलत जाते. या बदलांतून जीवनमान नक्कीच सुधारत असते, पण त्याबरोबर काही विपरित परिणाम देखील होत असतात.

वैयक्तिक दृष्टिकोनातून विचार केल्यास परिवर्तनाचे वारे आपल्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणत असतात. तथापि, आजच्या स्पर्धात्मक युगात आपल्याला कुठवर धावायचे आणि कुठे थांबायचे, हेच लक्षात येत नाही. औद्योगिकीकरण, तंत्रज्ञानातील प्रगती, संगणकीकरण, डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कौशल्यपूर्ण साधने तसेच तत्सम अनंत मानवनिर्मित संशोधने ही सर्व आजच्या आधुनिकतेची वैशिष्ट्ये आहेत. या आधुनिकतेचा स्वीकार करून त्याबरोबर राहण्यासाठी मात्र आपल्या सर्वांनाच धावावं लागत आहे. या धकाधकीच्या आयुष्यात आपण आरोग्यपूर्ण संतुलित जीवनशैली हरवून बसलो आहोत. आपण कळत-नकळत निसर्गापासून दूर जात आहोत. आपल्या आहार आणि विहाराच्या चुकीच्या सवयी तसेच चुकीच्या वेळा देखील आपल्या शारीरिक आरोग्यास घातक ठरत आहेत. हे आपल्याला कळत असतं पण वळत नाही… आणि इथेच अनारोग्यास आरंभ होतो.

हेही वाचा – Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन

यात शारीरिक बरोबर मानसिक अनारोग्यही येते. आपले शरीर-मन आपल्याला वेळोवेळी संभाव्य धोक्याच्या आगाऊ सूचना देत असते आणि आपण धावपळीच्या नादात पुरेशा वेळेअभावी सोईस्कररीत्या अशा सूचनांकडे दुर्लक्ष करत असतो. आपल्या रहाटगाडग्याच्या धावपळीत आपण आर्थिक धन नक्कीच कमावतो, परंतु शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य मात्र गमावून बसतो. मग शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य परत मिळविण्यात आपल्या आर्थिक धनाचा नाहक अपव्यय होतो. म्हणजेच, ऊरीपोटी धावपळ करून कमावलेल्या पैशांचा योग्य विनियोग न होता आजारपणावर पैसा खर्च होतो. मग, शेवटी काय राहिलं, हे प्रत्येकाने आपापलं ठरवावे.

इथे मग साहजिकच काही प्रश्न मनात येतात ते असे की, एवढी धावपळ कशासाठी आणि कोणासाठी? आणि आपला खरा जोडीदार कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना बर्‍याच गोष्टी लक्षात येतात. ऐहिक जीवनात सुख आणि आनंद मिळावा म्हणून आपण धावपळ करून पैसा कमावतो. परंतु सुख आणि आनंद उपभोगण्यासाठी आपल्या शरीर-मनाचे आरोग्य निरामय असायला हवे. आपला खरा जोडीदार आईवडील, नवराबायको, मुलंमुली नसून आपले शरीर हेच आपले खरे जोडीदार आहे!

हेही वाचा – Mental Health : आबालवृद्धांचे मानसिक ताणतणाव

पैसा हे जगण्याचे साधन आहे, साध्य नव्हे. जीवनातील आपली धावपळ केव्हा आणि कुठे थांबवायची, हे माझे मलाच ठरवावे लागेल. येथे एक इंग्रजी म्हण आठवते, ‘A stitch in time saves Nine’. थोडक्यात, आपण आपल्या आरोग्याबाबत सतत सजग राहून वेळोवेळी योग्य दक्षता घेऊन आपल्या आरोग्यरूपी धनाचे यथायोग्य संवर्धन केले पाहिजे.

तात्पर्य, प्रत्येकाने सुखी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी स्वतःच्या शरीर-मनाचे आरोग्य निरामय राखायला हवे. थोडक्यात, आरोग्यम् धनसंपदा, हेच खरे.

क्रमशः

(लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून जानेवारी 2015पासून ते निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबवत आहेत. त्यांनी ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ अशी तीन मार्गदर्शनपर माहितीपूर्ण उपयुक्त पुस्तके लिहिली आहेत. तसेच त्यांच्या यूट्युब चॅनेलवर उपयुक्त योगा व्हिडीओ उपलब्ध आहेत. वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शनासाठी त्यांना अवश्य संपर्क करावा.)

मोबाइल – 9850856774


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!