नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला!
मधल्या काळात मी चांगलीच जाडजूड झाले होते. अगदी रेडिमेड कपडे 4XL साइजचे लागायचे. बरेचदा आवडलेले कपडे, रंग, पॅटर्न, स्टाईल त्या साईजमध्ये मिळायची नाही. खूप वाईट वाटायचं… पण अलीकडेच जाणवत होतं की, आपण बारीक होतोय. ध्यानीमनी नसताना हे घडत आहे. गेल्या आठवड्यात मी स्वतःसाठी XL साईजचा ड्रेस विकत घेतला आणि तो व्यवस्थित झाला. त्यामुळे आता मैत्रिणी, शेजारणी, सहकलाकार या सगळ्यांना माझ्या बारीक होण्याचं कौतुक वाटायला लागलंय.
“काय ग जाडे, एवढी बारीक कशी झालीस? आजारी तर दिसत नाहीयेस! आम्हाला तरी सांग तुझं गुपित…” अशा प्रतिक्रिया यायला लागल्यात. वास्तविक, हे गुपित मलाही उशिराने समजलं. तेव्हा आता हे तुमच्या समोर उघड करते…
सकाळी उठल्यावर चूळ न भरता 1 ग्लास पाणी प्यायचं. जेणेकरून रात्रभर तोंडात जे मिनरल तयार होतात ते पोटात जाऊन पोट साफ होण्यास मदत होते. त्यानंतर नंबर लागतो चहाचा. एक कप चहामध्ये आपण साधारण ठेचलेलं किंवा किसलेलं आलं एक चिमूटभर घालतो. पण आलं किसूनच घालावं, म्हणजे त्याचा रस वाया जात नाही. पुढील दोन-तीन दिवसांसाठी आल्याचा किस डब्यात करून फ्रीजमध्ये ठेवायचा. मी गवती चहा धुवून पाणी निथळून कापून डब्यात घालून फ्रीज ठेवते. जेणेकरून चहा बनवताना घाई नको व्हायला. आता एक चिमूट बडीशेप आणि नखाएवढा दालचिनीचा तुकडा घालून पाणी छान उकळवून घ्या आणि त्यात चहा बनवून प्या. याशिवाय, तुम्हाला जे आवडतं, म्हणजे साखर, गूळ किंवा मध त्यात घालू शकता. लिंबाचे पाच-सहा थेंब घातले की दूध घालावे लागत नाही.
हेही वाचा – आठवणींचा जागर…
आलं, गवती चहा तर आपण regular वापरतो. बडीशेपमुळे आदल्या रात्री जे जेवलो आहे, ते जर नीट पचले नसेल तर ते पचण्यास मदत होते आणि दालचिनीमुळे शरीरातली चरबी हळूहळू सॉफ्ट व्हायला लागले. चरबी सॉफ्ट झाली तरच ती लवकर वितळू लागते… आणि हो, पुदिन्याची दोन पाने किंवा त्याची नुसती दांडी जरी घातली तरी मस्त फ्लेवर येतो. एकूणच हा चहा अत्यंत गुणकारी आणि खूप टेस्टी लागतो. सकाळी सकाळी पहिला चहा असा मस्त चविष्ट मिळाला की, मन प्रसन्न प्रफुल्लित होतं. दिवसाची सुरुवात उत्तमच झाली म्हणा!
बरेच जण घाई होते म्हणून ब्रेकफास्ट करत नाहीत. हे अतिशय चुकीचे आहे. ब्रेकफास्ट न केल्यामुळे डायबिटीस होऊ शकतो, हे मला डायबिटीस झाल्यानंतर कळलं. त्यामुळे कृपया, ब्रेकफास्ट करणे अतिशय महत्वाचे आहे. अगदी एखादी पोळी सुद्धा चहात बुडवून खाल्ली तरी मस्त! आणि ब्रेकफास्ट सोबत आवर्जून एक ग्लास ताक किंवा ताज्या आवळ्याचं सरबत जरूर घ्या. हे ताक किंवा आवळा सरबत तुम्हाला वजन घटवण्यास खूप मदत करते. आवळा सरबत माझ्या पद्धतीने बनवून पिता आले तर छानच होईल!
प्रथम एका ग्लासमध्या थोड्याशा पाण्यात चमचाभर सब्जा भिजत घालून मग सरबतची तयारी सुरू करा. म्हणजे तोपर्यंत सब्जा छान भिजेल. त्यानंतर अख्खा आवळा किसून त्यात आल्याचा छोटा तुकडा, कढीपत्त्याची 5-6 पाने, 4-5 काळीमिरी घालून मिक्स करा. आता त्यात दोन चमचे गूळ पावडर घाला. ती लवकर विरघळते. आवळा सरबताचं साहित्य मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं. पाणी गाळून सब्जा हे मिश्रण पाण्यात ढवळून घ्यावं. वाह… अमृत हेच असावं! टेस्टी आणि एनर्जीने भरलेलं हे सरबत… आवडतं म्हणून सलग तीन-चार महिने हे सरबत पित होते. माझा चहा आणि त्यात हे आवळा सरबत या दोन्हीमुळे मला बारीक व्हायला मदत झाली, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आवळा हा त्वचा, डोळे, केस या सगळ्यांसाठी गुणाकारी आहे. तर, सब्जा तुमची त्वचा लवकर सैल पडू देत नाही.
बरेच लोक बारीक होण्याकरता उपाशी राहणं, डाएट प्लॅन बदलत राहणं, कसकसली औषधं घेणं… असले उद्योग करतच असतात. या सगळ्यांसाठी माझ्याकडे वेळ नाही. माझा डाएट प्लान मी ठरवला! जे आपण दुपारी जेवतो ते थोड कमी करायचं. बंद नाही. कारण आपण जे काही खातो-पितो त्या सगळ्याची आपल्या शरीराला लहानपणापासून सवय असते, ती का बरं मोडायची? ते सगळे पदार्थ खायचे, पण प्रमाण जरा कमी करायचं. एकेक कमी करत दोन ते तीन पोळ्यांवर यायचं. पोटाला कमी खायची सवय झाली की, ते जास्त अन्न मागत नाही.
हेही वाचा – …अन् व्हॉट्सॲप ग्रुपमधून ‘क्राइम’ने मुक्त केलं!
मी डायबिटीस असूनही भात खाते. त्यामुळे आतडी सॉफ्ट राहून पोट साफ राहतं आणि आजारपण दूर राहतं. सकाळचा चहा जरा आवडला असेल तर, संध्याकाळी तसाच चहा प्यायचा. जमल्यास किंवा आवडल्यास दुधाऐवजी पाच-सहा थेंब लिंबाचा रस घाला. रात्री जेवायचा कंटाळा येत असेल तर, एखादं फळ, दूध प्यावं. उगीच उपाशी राहू नये. उपाशी राहिल्याने ॲसिडिटी तर होतेच, पण पोट रिकामं आहे म्हटल्यावर चरबीला हात-पाय पसरायला जागा मिळते. जेवणात तेल-तिखटाचा वापर जरा कमीच असावा, पण किमान एक चमचा घरचं साजूक तूप पोटात जायलाच हवे. कारण वयोमानानुसार हाडांमधलं तेल कमी व्हायला लागतं. या साजूक तुपामुळे जरा दिवस पुढे ढकलले जातात.
फिरणं, व्यायाम करणे, योगा, जिमखान्यात जाणं… ज्याला जे जमेल, झेपेल ते नक्की करावं. किमान अर्धा ते एक तास चालावं तर! चालणं आपल्या शरीरावर 20 मिनिटांनी परिणाम दाखवतं. दिवसभरात केव्हाही तुम्ही चालू शकता. रात्री जेवल्यानंतर मात्र शतपावली करावी. जोरजोरात चालू नये.. आता एक गंमत बरं का! बऱ्याच जणांना दुपारी झोपायची सवय असते. त्यांनी जेवणापूर्वी अर्धा तास किंवा जी काही तुमची वेळ ठरलेली असते तेवढा वेळ झोपावं आणि उठल्यावर मग दुपारचं जेवण जेवावं. खूप छोट्या आणि सध्या गोष्टी आहेत या, अगदी रोजच्या! त्या तेवढ्या पाळा आणि healthy बारीक व्हा!


