मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याचे शरीर स्वास्थ्य आणि आरोग्यसंपन्न असते, ही नैसर्गिक म्हणजे प्राकृत अवस्था होय. निसर्गसुसंगत जीवनशैली, नियमित योगाभ्यास आणि सात्त्विक आहार सेवन ही त्रिसुत्री आरोग्य स्वस्थ आणि संपन्न करण्यास साहाय्यभूत आहे.
‘अवांतर’ या मुक्त व्यासपीठावर ‘आरोग्य’ या सदराखाली आत्तापर्यंत मी एकंदर एकेचाळीस लेख लिहिले. या सर्व लेखांचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाल्यास या लेखांमधून प्रामुख्याने पुढील मूलभूत विषयांवर उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले : निरामय आरोग्य, मनाचे आरोग्य, मानसिक ताणतणाव, आरोग्य ही धनसंपदा मानून आरोग्य प्राप्तीसाठी इच्छा, वेळ, पैसा, सकारात्मक मानसिकता आदींची आवश्यकता, निरामय आरोग्यासाठी दिनचर्या, सात्त्विक आहार आणि नियमित योगाभ्यास, निरामय मानसिक आरोग्य संकल्पना, योगाभ्यासातील नानाविध समाविष्ट अभ्यासांतून तसेच लेखन,वाचन, संवाद तसेच विपश्यना यातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ इत्यादी.
आता या तसेच पुढील काही लेखांमधून आपण विविध शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी यथायोग्य आणि दैनंदिन जीवनात सदैव उपयुक्त मार्गदर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी, आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत असलेल्या विविध घटकांची थोडक्यात माहिती घेणे नक्कीच यथार्थ होईल.
आरोग्य बिघडण्याची कारणे
मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याचे शरीर स्वस्थ आणि आरोग्यसंपन्न असते, ही नैसर्गिक म्हणजे प्राकृत अवस्था होय.
निसर्गनियमांचे पालन न केल्यास शरीरात व्याधी-विकार उद्भवतात, ही झाली विकृती. शरीरातील व्याधी-विकारांची प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत.
- अयोग्य आहार : अनियमित आहार, अनाहार, अपथ्याहार, विरुद्ध आहार, राजस आहार, तामस आहार इत्यादी.
- निसर्गनियमांविरुद्ध जीवनशैली : अनियमित तथा सतत बदलती जीवनशैली.
- व्यायामाचा अभाव
- मानसिक ताणतणाव
- अनिद्रा / निद्रानाश : पुरेशा विश्रांतीचा अभाव.
- वाईट सवयी आणि व्यसने.
- वातावरणातील नानाविध प्रदूषणे
हेही वाचा – स्वस्थ आरोग्य आणि आरोग्याचे विविध पैलू
आरोग्य टिकवण्यासाठी मार्गदर्शन
आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत असलेल्या विविध बाबींबद्दल थोडक्यात जाणून घेतल्यानंतर आता आपण आरोग्य टिकून रहावे म्हणून व्याधी- विकारांच्या नियंत्रणासाठी सदैव उपयोगी पडणारे मार्गदर्शन याबाबत जाणून घेणार आहोत. निसर्गसुसंगत जीवनशैली, नियमित योगाभ्यास आणि सात्विक आहार सेवन ही त्रिसूत्री आरोग्य स्वस्थ आणि संपन्न करण्यास सहाय्यभूत आहे.
या मार्गदर्शनात पुढील विषयांचा समावेश असेल :
- योगाभ्यासातील योगासने, प्राणायाम आणि हस्त मुद्रा.
- आहार – काय खावे? आणि घरगुती उपाय.
हेही वाचा – आरोग्यम् धनसंपदा…
आता पुढील लेखात आपण शारीरिक व्याधी – विकारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन या लेखाच्या मूळ विषयाचा श्रीगणेशा करणार आहोत.
या संदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत संबंधित विषयांवर उपयुक्त सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शनपर वस्तुपाठ सादर केले असून त्यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे निरामय आरोग्याचा परिपाक होय.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


