Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeशैक्षणिकशाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस

आनंद जोशी

शाळेचा पहिला दिवस माझ्या कायम स्मरणात राहिला आहे! प्रत्येक वर्षी शाळेचा पहिला दिवस येत असे आणि शाळेत जाण्याची उत्सुकता मात्र कमी होत नसे! माझी शाळा मुंबईत मालाड पूर्वेला उत्कर्ष मंदिर होती. काळ साधारण 1980 ते 1985 मधला. 13 जून रोजी शाळा उघडत असे. पाऊस सुद्धा साधारण 13 जूनला येत असे. जीवनात सर्व बाबतीत ‘पर्याय’ कमी असल्यामुळे असेल, पण जीवन खूप सोपे आणि सुखाचे होते!

मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही काका, मामांकडे किंवा गावाला आठ-दहा दिवस जाऊन राहत असू. तेव्हा फक्त ‘रिसॉर्ट’मध्ये जाऊन राहणे, हा एकमेव पर्याय नव्हता… मे महिन्याच्या सुट्टीत भरपूर आराम करून झाल्यावर मग शाळेचे वेध लागत असत! जूनमधले वातावरण चैतन्यमय असे. नवीन गणवेश, नवीन पुस्तके, नवीन दप्तर – अशी सगळी खरेदीची गडबड जूनमध्ये होत असे.

पहिल्या दिवशी शाळेत जाताना ‘दप्तर भरणे’ हा मोठा कार्यक्रम वाटायचा! दप्तरामध्ये डबा आणि बाजूला वॉटर बॅग असायची. काहींची छत्री तर काहींचा रेनकोट असायचा. छत्री आणि दप्तर घेऊन शाळेत जायला मोठी मजा यायची. शाळेचा रस्ता चालत पंधरा-वीस मिनिटांचा होता आणि आम्ही ‘खाकी दप्तर’ मागे पाठीला लावून शाळेत चालत जात असू. बहुसंख्य पालक चालायच्या अंतरावरच्या शाळा निवडायचे. त्यामुळे स्कूल बसची वगैरे भानगड नव्हती…

माझ्या शाळेची इमारत छोटेखानी होती. मराठी माध्यम असल्यामुळे शाळेची फी अत्यंत कमी असायची. पाचवीला पाच रुपये, सहावीला सहा रुपये इत्यादी आणि सर्व वर्ग शिक्षक अत्यंत उत्तम शिकवणारे होते!

हेही वाचा – गेले ते दिन गेले…

मला आठवते की, शाळेच्या मागे एक छोटेसे तळे होते, जे नंतर बुजवले गेले मैदान बनवण्यासाठी… तळमजल्याच्या वर्गातून त्या तळ्यातील बदके बघायला मजा यायची! नवीन वर्ग जर पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर असेल तर वर्गाच्या खिडकीतून हायवे, दूरचे डोंगर, हायवे वरच्या गाड्या – सर्व छान दिसायचे. तळ मजल्यावर छोट्या इयत्तांचे वर्ग भरायचे, वरच्या मजल्यावर मोठ्या इयत्तांचे वर्ग भरायचे.

शाळेच्या पहिल्या दिवशी अभ्यास फारसा नसायचा. बाईंना सर्व मुले ‘अभ्यास घेऊ नका,’ अशी विनंती करायची. शाळेत पहिल्या दिवशी सर्व मित्र-मैत्रिणींना भेटणे हाच मुख्य कार्यक्रम असायचा. “कोणत्या वर्गाला कोणते वर्गशिक्षक मिळणार,” याची चर्चा हमखास व्हायची. बाई किंवा सर आल्यावर ‘एक साथ नमस्ते’चा घोषा व्हायचा.

बालभारती पुस्तकाचे मुखपृष्ठ बघायला मला फार आवडायचे! चौथीमधला शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्वांनाच आवडायचा. पहिल्या दिवशी मधल्या सुट्टीची वाट बघण्यात दोन-तीन ‘तास’ निघून जायचे. मधल्या सुट्टीत दुसऱ्यांच्या डब्यात हात घालून खायला आम्हाला ‘ऑकवर्ड’ वाटायचे नाही. मधल्या सुट्टीत शाळेच्या बाहेर चणे-दाणे विकणारा हमखास यायचा. आठ आण्याचे चणे-दाणे घेतले तरी मोठे अप्रूप वाटायचे!

हेही वाचा – संस्काररुपी वसा

मधल्या सुट्टीनंतर शाळा सुटण्याच्या घंटेची वाट बघत बसायचं… साधारणत: सहा वाजता शाळा सुटली की, घरी जायला खूप गडबड उडत असे. सर्वांनाच घरी जायची लगबग असायची. पहिल्या दिवशीच्या रम्य आठवणी घेऊन सर्व मुले आपल्या घरटी परत जायची!

आता शाळा संपून तीस-पस्तीस वर्षे झाली तरी, शाळेचा पहिला दिवस मात्र मनात घर करून आहे!!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!