Friday, June 13, 2025
Homeअवांतरसंस्काररुपी वसा

संस्काररुपी वसा

आराधना जोशी

“हल्लीच्या पिढीवर काहीही संस्कार झालेले नसतात,” हे वाक्य आजकाल सर्रास ऐकायला मिळतं. पण ते कितपत योग्य आहे, याचा विचार आपण करतो का? तसं बघायला गेलं तर, माणसाच्या अनेक पिढ्या हेच वाक्य ऐकत मोठ्या झाल्या आहेत. तरीही, संस्कार म्हणजे नेमकं काय? याची व्याख्या अजूनही आपल्याला करता आलेली नाही, हेच खरं.

पूर्वी ‘सातच्या आत घरात’ येणं बंधनकारक होतं. नव्हे, तो संस्कारांचा भाग होता. हा संस्कार जो मुलगा किंवा मुलगी काही कारणांमुळे पाळत नव्हते ते संस्कार विसरले, असाच शिक्का त्यांच्यावर मारला जायचा. हल्ली महानगरांमधून ऑफिसेस सुटल्यावर किंवा अन्य कारणांमुळे घरी पोहोचायला साडेआठ-नऊ तरी वाजतात. त्यामुळे तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावून ‘शुभं करोती’ म्हणणं आता अनेकदा नसतं. थोरामोठ्यांना खाली वाकून नमस्कार करणं, हा सुद्धा संस्काराचा एक भाग होता. पूर्वी मारून मुटकून का होईना, पण तो संस्कार पाळला जायचा. हल्ली अमूक एक व्यक्ती केवळ वयाने मोठी म्हणून त्यांना नमस्कार करणं, नवीन पिढीला अमान्य आहे. त्यांना नमस्कार करायला त्यांची ना नसते, पण तो नमस्कार “केवळ वयाने मोठे” म्हणून करण्यावर त्यांचा आक्षेप असतो. या व्यक्ती व्यसनी, अफरातफर करणाऱ्या, घरच्यांना त्रास देणाऱ्या किंवा घरातल्या माणसांचा अपमान करणाऱ्या असतील, लैंगिक शोषणाला कारणीभूत ठरणाऱ्या असतील तर, अशांना नमस्कार का करायचा? असा नव्या पिढीचा प्रश्न असतो.

आषाढी अमावास्येला दीप अमावास्या असे म्हणतात. त्या दिवशी घरातले सगळे दिवे उजळवून, साफ करून त्यांची पूजा करायची, हा त्यामागचा विचार आहे. पावसाळ्यातल्या अंधाऱ्या रात्री प्रकाशासाठी आणि येणाऱ्या श्रावणातल्या सणांच्या निमित्ताने हे ठेवणीतले दिवे बाहेर काढून त्यांची पूजा केली जाते. गोडाधोडाचा नेवैद्य दाखवला जातो. आमच्याकडे ही पूजा करताना मुलगी नेहमी उत्सुकतेने हे सगळं बघायची. एकेवर्षी तिने मला विचारलं की “हे दिवे आपल्याला प्रकाश देतात म्हणून त्यांची पूजा करायची. मग आपल्याकडे लाइट गेल्यानंतर इन्व्हर्टर आपल्याला प्रकाश देतो. आपण त्याची पूजा का नाही करत? प्रकाश देणाऱ्यांची पूजा करायची तर, मग इन्व्हर्टरची पण कर की पूजा!”  मुलीचा हा विचार मला मनापासून पटला आणि त्यावर्षीपासून दीप अमावास्येला आमच्याकडे इन्व्हर्टरची पण पूजा केली जाते.

हेही वाचा – गोष्ट माझ्या शिरा आजीची

अनेक गोष्टी मुलं पालकांच्या वागण्या-बोलण्याच्या निरीक्षणातून शिकत असतात, आत्मसात करत असतात. आमच्याकडे मी नवऱ्याला त्याच्या नावाने हाक मारायचे. मुलगी बोलत नव्हती, तोपर्यंत हे ठीक होते. एकदा मात्र मुलीने बाबाला नावाने हाक मारली. तिला मी “हे चुकीचं आहे. त्याला बाबा हाक मार,” असं म्हटल्यावर तिने मला तू नावाने हाक मारतेस ते चालतं, मी का नाही हाक मारायची? तो मोठा आहे तर, तुझ्यापेक्षाही तर मोठा आहे नं? मग मलाच का त्याला बाबा म्हणायला सांगतेस?” असा निरुत्तर करणारा प्रश्न विचारला होता. त्यानंतर मी नवऱ्याला त्याच्या नावाऐवजी “बाबा” म्हणायला सुरुवात केली.

नात्यागोत्यातल्या व्यक्तींनाही आजी, आबा किंवा आजोबा, मामा, मामी, काका, काकू, आत्या अशाच नावाने आम्ही दोघांनीही हाक मारायला सुरुवात केली. त्यामुळे मुलीच्या तोंडी हे शब्द बसले. आता इतक्या वर्षांनंतर तोंडी तसेच शब्द बसल्याने आताही आईला आजी, बाबांना आबा, भावांना मामा असंच हाक मारलं जातं!

एकदा मुलीच्या 12 वीच्या क्लासमध्ये पालक – शिक्षकांची मीटिंग आयोजित केली होती. मी काहीशी आधी पोहोचल्यामुळे तिथे असणाऱ्या शिक्षक आणि मुलीच्या मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा सुरू होत्या. त्या गप्पांमध्ये सगळ्यांना तुमची मुलगी नेहमी ती कुठे आहे, कुठे जाणार आहे, कधी निघणार, कशी जाणार, क्लासला पोहोचले, तिथून निघाले, कॉलेजला पोहोचले, लेक्चर्स बंक करून कॅन्टीनला जातोय… अशी इत्थंभूत माहिती पालक म्हणून तुम्हाला कळवते, याबद्दल प्रचंड कुतूहल होतं. अर्थात, शिक्षकांनी मुलीच्या या सवयीचं खूप कौतुकही केलं होतं. इतर विद्यार्थ्यांना मात्र ही नको इतकी माहिती पालकांना का देते, असा प्रश्न पडला होता.

हेही वाचा – संवेदनशील साहित्यिक… पी.व्ही. नरसिंह राव

मुळात ही सवय पालक म्हणून आम्हा दोघांनाही आहे. रोज लोकल ट्रेनचा प्रवास करताना पावसापाण्यामुळे, मानवनिर्मित कारणांमुळे (ट्रेनमध्ये झालेले बॉम्बस्फोट) घरच्यांना आपण नेमके कुठे आहोत, याची माहिती असावी, यासाठी कोणती ट्रेन पकडली आहे किंवा कामामुळे ऑफिसमधून इतर कोणत्या ठिकाणी जायचं असेल तर, त्याची माहिती आम्ही एकमेकांना किंवा आमच्या पालकांना नेहमीच कळवतो. हे मुलीने बघितलेलं असल्यामुळे नकळतपणे जबाबदारीने आता तिने ही सवय उचलली आहे. पालकांचं निरीक्षण करत मुलं गोष्टी शिकत असतात, असं म्हणतात त्याचा प्रत्यय मुलीच्या रूपाने बघायला मिळाला. आता ती डॉक्टर झाली आहे, दुसऱ्या शहरात आहे मात्र तरीही ही सवय मात्र कायम आहे.

थोडक्यात सांगायचं तर आपल्या वागण्यातून, विचारातून, मुलांशी वारंवार केलेल्या संवादातून, एकमेकांच्या सहवासातून, महत्त्वाच्या अनुभवांमधून संस्कार होत असतात. शांतपणे आत झिरपत असतात. ते मुरायला सवड द्यावी लागते. म्हणूनच संस्कार करायला बाहेरच्या, उसन्या, कंत्राटी व्यक्तीची गरज नसते…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!