“अंजू, नाश्त्याचे आटोपले का सर्वांचे?”
“अंजू, नवऱ्यामुलीचा मेकअप झाला का?”
“अंजू, आज सकाळी दिलेलं रूखवताचं सामान लावलं का?”
असे अनेक प्रश्न कानावर आदळत होते. मी एका मंगलकार्यालयात नातेवाईकाच्या लग्नाला आलो होतो आणि गंमत बघत होतो. एक सावळ्या चेहऱ्याची तरतरीत तरुणी हसतमुखाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होती. या पूर्ण समारंभात ती जबाबदारीनं आलेल्या प्रत्येकाला हवं नको ते पहात होती. तीच मुलगी अंजू असावी, हे लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही. माझ्या शेजारीच माझी आत्या बसली होती. खात्री करावी म्हणून मी तिला विचारल, “आत्या, कोण ग ही अंजू?”
“अरे, आपलं दूरचं नात आहे तिच्याशी. कामसू आहे पोर अगदी. पण घरची परिस्थिती जरा बेतासबास. वडील नाहीत… आई काम करते स्वयंपाकाची… तरी शिकते आहे पोरगी!”
तेवढ्यात अंजूच आमच्याकडे आली… “नाश्ता झाला?”
“झाला. किती धावपळ करते? बस जरा.”
“नको.”
“थांब. तुझी ओळख करून देते…” आत्या माझ्याकडे वळत म्हणाली, “हा माझा भाचा विद्याधर… आणि ही अंजू…”
“नमस्कार,” अंजू माझ्याकडे पाहात म्हणाली. सावळा रंग, धारधार नाक, मोठे पाणीदार डोळे, चेहऱ्यावर मोहक हास्य… माझ्या काळजात लक्क झाले. नेहमी मेकअप लावलेल्या मुलींपेक्षा हिचं साधं सोज्ज्वळ सौंदर्य किती छान होतं!
हेही वाचा – गणपत अन् 2000 रुपयांची उधारी…
लग्न झाले. जेवणं झाली. दुपार कलत आली तरी, अंजूचा विचार मनातून जाईना. अचानक आमचे काका मला शोधत आले. “विद्या तुला मोटरसायकल येते?” मी मान डोलावली. “अरे, अंजूला घरी सोडायचे आहे…” मी ताडकन् उभा राहिलो.
अंजू मला रस्ता सांगत होती… मी गाडी चालवत नसून विमान चालवत असल्याचे मला वाटत होते.
अंजूच्या घरी पोहचलो. साधं दोन खणाचं घर. पण व्यवस्थित टापटिप ठेवलेले. तिची आई घरी नव्हती. अंजूने चहाचा आग्रह केला. खरेतर, श्रीखंडाच्या जेवणावर काहीच नको होतं. पण केवळ अंजूशी अजून बोलता येईल म्हणून हो म्हणालो. अंजू नंतरही मोकळेपणाने बोलली. ती एमएला ॲडमिशन घेणार होती. माझ्या एका मित्राने नुकतेच एमए केले होते. त्याची पुस्तके पडून होती. तिने पुस्तके घेऊ नयेत… मी ती पुस्तके आणून देतो, असे तिला सांगितले. तेवढा खर्चही वाचला असता… ती ‘हो’ म्हणाली.
ती पुस्तके देण्याचा बहाण्याने आणि काही इतरही कारणाने मी अंजूकडे जात राहीलो. ती नेहमीच मोकळेपणानं बोलायची, पण अंतर राखूनच! किंबहुना मी शक्यतो आई असतानाच येणे, असही तिने अप्रत्यक्षपणे सुचवले आणि मीही ते मानले.
बरेच दिवस गेले. मलाही नोकरी लागली. अंजूची एमए फायनलची परीक्षा झाली. शेवटी मी एकदाच सोक्षमोक्ष लावायचं ठरवले. एकदा ठरवून तिची आई नसताना गेलो. तिने दरवाजा उघडताच, आई नसल्याचे सांगितले. “मला तुझ्याशीच बोलायचे आहे…” तिच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत मी आत शिरलो.
“मी विद्याधर. वय पंचवीस. बँकेत नोकरी. पगार चाळीस हजार. पुढे वाढण्याची शक्यता. आर्थिक परिस्थिती उत्तम. स्वतःचे घर. निर्व्यसनी. कोणतेही व्यंग नाही…” मी हे एका दमात बोलून गेलो.
माझ्याकडे आश्चर्याने पहात अंजू म्हणाली, “पण तू हे मला का सांगतोय?”
“कारण मला तुझ्याशी लग्न करायचे आहे.”
एखादे वादळ येणार अशी कल्पना असते, तरी ते प्रत्यक्ष आल्यावर माणूस गडबडून जातो, तशी अवस्था अंजूची झाली. माझ्याकडे पहात अस्पष्ट स्वरात ती पुटपुली… “ते शक्य नाही.”
सहजासहजी ती ‘हो’ म्हणणार नाही, याची मला कल्पना होती.
“का शक्य नाही?”
“आपल्या परिस्थितीत फार फरक आहे…”
“त्याचा काय संबंध?”
“तुझे आईवडील मला सून म्हणून स्वीकारणार नाहीत…”
“ते मी बघून घेईन…”
“नको. तुझ्या वडिलांची मी दूरची नातलग लागते. ते म्हणतील, चांगला मुलगा पाहून हिनेच जाळे टाकले असेल…”
“त्यांनी नाही सांगितले, तर आपण वेगळे राहू.”
“नको. एकुलत्या एक मुलाला आईवडिलांपासून तोडण्याच्या पापात मला पडायच नाही.”
“अंजू… संसार मला करायचाय, त्यांना नाही.”
“नाही.”
“तुझ्या मनात कोणी दुसरा?”
“तुला तरी तसे वाटते का?”
तिच्या डोळ्यांत येऊ पाहणारं पाणी तिने निग्रहाने रोखून ठेवले.
“अंजू प्लीज… पाहिजे तर मी नंतर येतो. आई असताना येतो.”
“नाही. त्याची जरूरी नाही. प्रत्येकाने आपला वकुब ओळखून पाय पसरावेत…”
“अंजू, माझीच चूक झाली मी तुझ्याबरोबर भावी आयुष्याची स्वप्नं रंगवली… येतो मी.”
आत्यंतिक निराशेने मी उठलो. दुःखात भान नसल्याने पायरीवर थोडा धडपडलो. “सांभाळ विद्या…” विजेच्या वेगाने अंजू आली आणि मला सावरले. मी तिच्याकडे पाहिले… तिच्या डोळ्यांत पाहात म्हणालो, “कशाला स्वतःला फसवतेय अंजू?”
तिने माझा हात सोडला आणि घरात निघून गेली…
0000
या गोष्टीला आज सात वर्षे झाली. मी इथे त्याच कार्यालयात बसलो आहे. जुनेच डायलॉग ऐकू येत आहेत… हाक मारताना ‘अंजू’च्या ऐवजी ‘अंजूताई’ बदल झाला होता… अंजूही प्रत्येकाला नाश्ता कसा झाला, हे आवर्जून विचारत होती. त्याचवेळेस स्वयंपाकघरात जाऊन आचाऱ्यांना सूचना देत होती.
अंजू जाड झाली होती… सुखवस्तू वाटत होती. मला मात्र टाळत होती. तेवढ्यात माझी पत्नी जवळ आली आणि तिनेच अंजूला हाक मारली…
“अंजूताई…”
एक क्षण माझे प्राण कंठात आले, पण आम्ही तर विपरीत काहीच केले नव्हते. अंजू लगबगीने आली… “बोला ताई…”
“इथले कॅटरिंग तुमच्याकडे आहे?”
“हो ताई. कसा वाटला नाश्ता? रात्रीचं जेवण?”
“छानच. तुमचे कार्ड मिळेल का? पुढच्या महिन्यात माझ्या दिराचे लग्न आहे… तुम्हालाच काँट्रॅक्ट देऊन टाकू!”
“चालेल ताई. अगदी मन लावून घरच्यासारखे बनवेन…” माझ्याकडे बघत अंजू म्हणाली.
हेही वाचा – गोट्या… अप्पांची सावली!
तेवढयात कोणीतरी हाक मारली म्हणून पत्नी उठून गेली. अंजूही उठू पहात होती, मीच म्हणालो, “थांब अंजू… कशी आहेस?”
“दिसते तशीच? तू कसा आहेस?”
“दिसतो तसाच…” मी म्हणालो.
“अंजू, तुझ्या निर्णयाचा कधी पश्चाताप नाही झाला?”
“नाही. लग्न ठरले तेव्हा हे छोटी-मोठी स्वयंपाकाची कामे घेत होते. मी मदत करायला लागली आणि व्यवसाय वाढू लागला… आज आम्ही दोघेही स्वतंत्र कामे घेतो. हाताखाली माणसे आहेत. एकेकाळी जे अशक्य वाटत होते, ते सर्व आहे. बंगला, कार, बँकबॅलन्स… कदाचित तुझ्यापेक्षा जास्त! अजून काय पाहिजे?”
“छान… अंजू मला फक्त एवढेच विचारायचं आहे, सुखी आहेस ना?”
“होय… अर्थातच!” हे वाक्य अंजू एवढ्या जोरात बोलली की, चार लोकांनी आमच्याकडे वळून पाहिले…
अंजू घाईने उठून गेली.
मी सुन्नपणे बसून राहिलो. लौकिकार्थाने मीही सुखीच होतो. प्रेमळ बायको, स्थिर नोकरी, आर्थिक सुबत्ता, तरीही काहीतरी हरवले होते… कुठेतरी चुकल्यासारखे वाटत होते…
भानावर आलो. उतरलेला चेहरा आणि डोळ्यांत जमा होऊ पाहणारे अश्रू लग्नात चांगले दिसले नसते. मी चेहरा धुवायला कोपऱ्यातल्या बेसिनकडे गेलो… तिथे पोहोचताच चमकलो. भिंतीजवळच्या कोपऱ्यात अंजू साडीने डोळ्यांतील अश्रू पुसत होती…


