स्नेहा सुतार
भाग – 4
‘ऐसे काही व्हावे मन शांत निजावे… एकांताच्या वेळी आकांत निमावे… ‘ उन्हाळ्याच्या दिवसात झाडं घुसळून वारा यावा आणि आपल्यापर्यंत पोहोचेस्तोवर तो मंद व्हावा… त्याचं कानांशी सलगी करणं हवं हवंसं वाटावं… त्याने उडवलेल्या केसांच्या बटा अशाच हुळहूळ उडत रहाव्यात. त्या हुळहूळतील तसा तसा अंगावर हलकेच शहारा उठावा… आणि अशात सलीलचं हे गाणं सुरू असावं… मग कसं होईल? अगदी तसंच तिला झालं. बाहेरचा पाऊस एव्हाना थांबून मजा बघावी, असा अगदी मंद झाला होता. अगदीच मंद… कुणी काय म्हणतात ते म्हणू दे, असं म्हणून तिने खिडकी उघडून समोरच्या सीटच्या पाठीवर हात टेकवून त्यावर डोकं ठेवलं. म्हणजे अख्खी खिडकीच तिची झालेली. बाजूची म्हातारी खवळणार नव्हती याने. जो पाऊस, जो वारा, जे ऊन आत येईल ते ती स्वतःच झेलणार होती. त्या खिडकीची ती मालकीण होती, राणी होती! हळूहळू डोळ्यांच्या डब्यांचं झाकण घट्ट होत गेलं… झोप आत वितळत गेली… मंद वारा तिच्यावर पांघरूण घालू लागला…
तो आला… तो थांबलाय, तो बघ दिसतोय. पांढऱ्याशुभ्र लांब गाडीला टेकून उभा राहिलेला. पिवळ्या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट घातलेला. मोबाइलमध्ये भिरभीरत्या अंगठ्याने मेसेज टाईप करतोय. तुलाच करतोय मेसेज… आणि सोबतच तो तुझीच वाट बघतोय… तुझ्या मेसेजची. ‘मी थांबलोय म्हापशात. लवकर ये. तुझी वाट बघतोय.’ कधीपासून पाठवलेल्या मेसेजला तू फक्त नोटिफिकेशन बारमधून वाचलेस. बरं केलंस. तो सुद्धा तेच करतो ना? नको उघडूस. अज्जिबात नको उघडूस… राहू देत तसाच. तू कामात आहेस असं दाखवूयात. तो ही असाच कामात असतो ना? रहा… कामात रहा… डोक्यात तो असला तरी तू कामात रहा. हात रेट, मन ओढून धर करकचून… बांधून ठेव खुंट्याला. धावेल नहीतर ते… हं, करत रहा कामं…
आजूबाजूच्या माणसांसोबत हस. कशावरून तरी विनोद कर. हस, हसव… विसर त्याला. प्रयत्न कर. पुन्हा आठवला तर वही घे हातात. लिहित बस काहीतरी. पुन्हा आठवला तर अजून काहीतरी कर… काहीतरी करत रहा. नाहीतर कुठल्यातरी कुणाचं तरी काहीतरी सांग बाजूचीच्या कानात… ती प्रश्न विचारेल, तिचं काही तुला सांगेल. तूही प्रतिसाद दे… बोलत रहा तिच्याशी. जग तू. जगायचा प्रयत्न कर. रहा तू… त्याला राहू दे तिथेच वाट बघत. आपण वाट बघतोय आणि समोरच्या माणसाला त्याचं काहीच पडलेलं नसतंय… तेव्हा कसं वाटतं, ते कळू दे त्याला. तुला आठवतंय ना, रात्ररात्रभर वाट बघणं?… ‘झालं का रे? आलास घरी की, मला बोलायचंय जरा तुझ्याशी, तू आलास का? अजून किती वेळ? मला बोलायचंय रे.’ सगळे तुझे मेसेजस निळे टिक न होता तसेच त्याला पडत जाणं. Delivered! पण seen नाही. ‘अरे मला बोलायचंय तुझ्याशी! मला कळव पोहोचल्यावर. कधी पोहोचशील?’…. तुझा काहीच प्रतिसाद नाही.
हेही वाचा – परतीचा प्रवास… डोक्यात त्याचाच विचार!
उशीवर डोळे गाळत कधीतरी तुला डोळा लागणं… सकाळी त्याचा sorry चा मेसेज… ‘मी झोपून गेलो गं…’ अरे! हा माणूस ऑफिसमधून सुटून सरळ झोपून गेला? कुठे रस्त्यावर? खुर्चीवर? फुटपाथवर? गाडीत? कसं काय असं? ऑफिसमधून निघाला असेल, पायऱ्या उतरला असेल, चालत गाडीपाशी आला असेल, गाडीत बसला असेल, गाडी चालवून घरी आला असेल, गाडी पार्क केली असेल, नंतर गाडीतून उतरला असेल, चालत जिन्यापर्यंत गेला असेल, जिना चढला असेल, चढून वर गेला असेल किंवा लिफ्टने गेला असेल, मग घराचं दार उघडून आत गेला असेल, सगळं आवरून बेडवर आला असेल. मग हळूहळू झोप आली असेल… या एवढ्यादरम्यान त्याच्या हातात मोबाइल नव्हता असं वाटतंय तुला? त्याने मोबाइल जरासुद्धा बघितला नसेल, असं वाटतंय तुला? नाही ना? मग तुझा मेसेज नोटिफिकेशन दिसलं नसेल त्याला? तुझं नाव बघून काय म्हणतेय, ते बघावं असं वाटलं नसेल त्याला? तुझा मेसेज पडलाय येऊन याची उत्सुकता नसेल त्याला? नाही ना? नाहीच काही वाटलं त्याला… सगळं कोरडं…
आता तुलाही वाटून घेऊ नकोस काहीच. त्याला राहू दे. वाट बघू दे. मेसेजची, तुझी. म्हापशाला राहिलाय किंवा इंग्लंडला! फरक नको पाडून घेऊस तू. तू हस, गप्पा कर, कामं कर, खा, पी, आणि रिपीट!
पण!
अचानक एकाएकी ती ताडकन उठली. आजूबाजूचे बघत राहिले तिच्याकडे. काय झालं? बरीयेस ना? काय गं? आजूबाजूच्या प्रश्न विचारायला लागल्या. ती तिची हँडबॅग भरभर भरू लागली. “येते हां, जावं लागेल.” एवढं ती मोठ्याने सगळ्यांसाठी बोलली. बॅग घेतली आणि झापाझप पावलं उचलून जिन्याच्या दिशेने जाऊ लागली. जिना उतरताना तिला जाणवलं तो भेटणार आहे आता… तिला भेटणार आहे. मला जायला हवं, ही एकच गोष्ट तिच्या धमन्यांमध्ये धावू लागली. ती जिना उतरू लागली. एक… दोन… तीन… चार… पायऱ्या उतरू लागली. पिवळ्या पट्टीच्या, तपकीरी रंगांच्या पायऱ्या तिला एकेक उतरताना दिसू लागल्या. ती उतरतेय खाली, उतरतेय, एक… दोन… अनेक… उतरताना तिला दम लागलाय. पाणी हवंय पण तिला थांबायचं नाहीये, कारण तो वाट पाहतोय तिची. तिला जायचंय… त्याच्याकडे… धावत पळत. पण मेला हा जिनाच संपत नाहीये कसा… खोल… खोल… खोल… ती उतरत चाललीये… तो थांबलाय… वाट बघतोय… मी येतेय रे.. थांब! डोळ्यातून पाणी वाहतंय सतत… पण तेही पुसायला तिला वेळ नाहीये. मी येतेय सोन्या… मी येतेय. काय करू हे संपतच नाहीये… हे संपतच नाहीये रे…
हेही वाचा – बस सुटताना जोरदार पाऊस अन्…
करकचून गाडीचा ब्रेक लागला आणि तिचं डोकं समोरच्या सीटच्या पाठीवर जोरात आदळलं. कळवळून ती जागी झाली. डोकं धरून बसली. पुन्हा तेच स्वप्न! तिच्या सीटच्या बाजूला उभ्या असलेल्या पोरींनी तिच्याकडे हसत बघितलं. शेजारची म्हातारी पण तोंड लपवून हसू लागली. बाहेरचा पाऊस थांबलेला. तिकीट काढायला आलेला कंडक्टर अचानक ब्रेक लावल्यामुळे कुणावर तरी पडलेला आणि दोघांची पण बाचाबाची सुरू होती. बुरखावालीच्या तीन पोरांनी भोकांड पसरलेलं आणि ती त्यांना शांत करायला म्हणून त्यांच्यावर आवाज चढवत होती… दिसत नव्हती पण ऐकू मात्र येत होतं. बाहेरचा पाऊस थांबला होता. मावळतीचं ऊन आता मी मी म्हणत होतं. कानात संदीप गात होता,
‘मला ठावं वेड तुझे विनाशाची हाक
डोळ्यांतून दिसू लागे वेडसर झाक
नका लागू नादी सारी उफराटी तऱ्हा
शहाण्याच्या समाधीला शेवटचा चीरा हा वेड लागलं’
पुन्हा तिला आज तेच स्वप्न पडलं… आधीच शिणलेला जीव त्यात हे असं. खरंच वेड लागलंय!
क्रमश:


