नितीन फलटणकर
“आज या बाकड्यावर बसू आपण. तिकडे खूप डास चावतात… आणि इथला व्ह्यू पण किती छान आहे पाहा… अगं, ही तुझी बॅग आवर. कशाला आणलीस काय माहिती! हल्ली तुझंही असं वागणं वाढलंय…” दिनकरराव आणि मंदाताई सायंकाळी फिरायला आले होते. रोजचा शिरस्ताच होता त्यांचा. रिटायर झाल्यानंतर दिनकरराव आपल्या मुलाकडे राहायला आलेले, पुण्यात… कोथरूडला. त्यांच्या सोसायटीमध्येच एक बाग होती. तिथं दोघे रोज येत. विकास (दिनकररावांचा मुलगा) आणि सून अनुश्री यांच्याशी काही खटकलं तर, ते हमखास येत बागेत. खूपवेळ बागेत बसायचं आणि नंतर रात्री जेवणासाठी म्हणून घरी परतायचं… असंच काहीसं नियोजन रोज त्यांचं ठरलेलं.
मुळात दिनकरराव लष्करातून निवृत्त झालेले. त्यांना बेशिस्तपणा जमत नसे. मंदाताईंनी आयुष्यभर त्यांना जपलं… जपलं असंच म्हणावं लागेल म्हणा! नाहीतर ‘दिनकर’जवळ गेलेला प्रत्येकजण होरपळायचाच. त्यांच्या कडक शिस्त आणि नियमावलीमुळे घरातली मुलंही त्यांना ‘हिटलर’ म्हणायची. मंदाताई मात्र समईतील वात होत्या. छान रेखीव नाक, बोलके डोळे, तेजस्वी चेहरा, ‘हिटलर’ कितीही चिडले तरी मंदाताई त्याची झळ इतरांना बसूच देत नव्हत्या. कधी त्यांनी दिनकररावांना उलट एक शब्दही बोलला नव्हता! त्यांच्या आवडी-निवडी, त्यांची शिस्त यात मंदाताईंनी कधीही चूक होऊ दिली नाही. ‘हिटलर’ चिडला की, मंदाताई कुटुंबाची ढाल बनत. अशी ही ऊन-पावसाची जोडी बाकड्यावर बसून आयुष्याच्या उतरणीच्या गप्पा करत होती…
हेही वाचा – यामिनी आणि 8 अन्-नोन कॉल्स…
“मंदा तू… तू खूप ऐकून घेतेस माझ्यासाठी! सूनबाई किती बोलली मला… तू माझा हात धरून मला बाहेर आणलं नसतंस ना तर… तर मी…,” मधेच त्यांना मंदाताईंनी थांबवलं. “असा राग झेपतो का या वयात? काय केलं असतं तुम्ही? अनुला मारलं असतं? त्यानं काय झालं असतं? संबंध आणखी दुरावले असते. कधीही भरून निघणार नाही, अशी दरी निर्माण झाली असती… किती दिवस? आता पोरं मोठी झाली आहेत. त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या. आपला संसार आपण आपल्या पद्धतीने केला. तो त्यांचा संसार आहे. मामंजीही कधी मधे बोलत तर, तुम्हाला ते पटायचं का? सारखी तुमच्या नजरेची बंदूक ताणलेलीच! मी मात्र तुम्हा बापलेकांमध्ये समईच्या वातीसारखी जळत राहिले.”
“अगं, पण वृद्धाश्रमात रहात का नाही? हे असं बोलावं का तिने! तिच्या बापाकडे रहातो का?”
“अहो, आवरा तोंड… ही तुमची शूटिंग रेंज नाही… तोंड उघडलं की गोळ्याच बाहेर पडावं, असं काही नसतं. सुनबाई म्हणाली तसं आपण त्यांना जरा मोकळा वेळ द्यायला हवा. आपण मोठे असलो तरी, त्यांचा संसार हा कितीही म्हटलं तरी त्यांचाच आहे!”
दिनकररावांचा रागाचा पारा आणखी चढला, “काही नाही, तिला तिच्या माहेरच्यांना आणायचे असेल… आणि या ठोंब्याला कळू नये का? तोही तिच्या सुरात सूर मिसळतो! गद्दार साला.”
“अहो, आवरा स्वत:ला… आता या वयात राग करणं चांगलं नाही. बरं जाऊ द्या, आपण जायचं का खरंच दूर… या साऱ्यांपासून कुठंतरी दूर… कायमचंच? तुम्हाला सांगू, लग्नानंतर खूप स्वप्नं होती… माझा नवरा, मी… आमचा संसार… तुम्ही मला चाफ्याची फुलं आणाल… मोगऱ्याचा गजरा द्याल… प्रेमानं आपण गप्पा करू… रात्री तो चंद्र बघत झोपू… पण घरात आल्या आल्या जबाबदारी पडली… संसार झाला, पण तो घरातील ढिगभर नातेवाईकांसोबत! तुमचं प्रेम होतं माझ्यावर… नाही असं नाही. पण कधी कधी वाटायचं ते फक्त मुलं होण्यापुरतंच होतं का? माझी सवत होती ना सोबत… तुमची ती बंदूक. खरं सांगा कधी तुम्हाला असं वाटलंच नाही का की, आपणही माझ्यासाठी भावनिक व्हावं… कधी मला गजरा माळावा, कधी मला घेऊन बागेत फिरायला जावं…?”
हेही वाचा – कन्फेशन कॉल…
दिनकररावांचे डोळे पाण्याने भरले होते. मंदाताईंना धक्काच बसला! तसं दिनकररावांनी स्वत:ला सावरलं… ते रडताहेत हे त्यांना दाखवायचं नव्हतं. “आज खूप वारं सुटलंय ना!” रडणं थांबवत ते म्हणाले. तसं मंदाताईंना हसू आलं… “चक्क आज दिनकरच्या डोळ्यात पाणी?”
त्यांचा असा एकेरी उल्लेख ऐकल्यावर दिनकररावांना हुंदका फुटला, “मंदा मला माफ कर… ‘दिनकर’ या एकेरी उल्लेखात किती प्रेम आहे, हे मला आज समजलं. मला माफ कर मंदा! पण आता खूप उशीर झालाय…” असं म्हणत ते रडायला लागले.
“अरे, दिनकर असं काय! अजून वेळ कुठे गेलीय? म्हणून तर म्हटलं चल जाऊयात आपण दोघंच! पुन्हा उभा करूयात संसार… दोघांचाच…. जगूयात आता दोघांसाठीच!”
दिनकररावांनी डोळे पुसले, स्वत:ला सावरत म्हणाले, “चल आताच घरी जाऊ, सांगू पोरांना… बॅगा भरू आणि निघू…” ते तडक उठले.
मंदाताईंनी त्यांचा हात धरला, तसे दिनकरराव आणखी भावनिक झाले… मंदाताईंचा हात घट्ट पकडत ते म्हणाले, “चल मंदा आता नाही थांबायचं!” मंदाताई म्हणाल्या, “हो, हो, जरा बसा… तुम्हाला मी ओळखते… मला माहिती होतं, म्हणूनच मी बॅग आणली आहे… हीच ती बॅग!” मंदाताईंनी दिनकररावांना बॅग दाखवली, “…आणि मुलांना मी चिठ्ठी लिहून आलेय. तुमचा ठोंब्या आल्यावर वाचेलच ती! तुमचा मोबाइल काढा अन् या बेंचवर ठेवा. माझाही मोबाइल मी इथेच ठेवतेय! आपण जाऊ… खूप दूर! आता तर आपला संसार सुरू झालाय… आणि पाहा त्या झाडांच्या मधोमध तो डोकावणारा चंद्र आहे साक्षीला…”


