स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये वेगळ्या चवीची कोथिंबीरवडी, खुसखुशीत मेदूवडा, कुरकुरीत शेव बनवताना वापरावयाच्या काही टीप्स पाहूयात –
- इडलीचे पीठ भिजवताना त्यात काही जण सोडा किंवा बेकिंग पावडर टाकतात. ते न करता कांद्यावरचा पापुद्रा काढून तसेच देठाचा भाग कापून धुऊन पिठात ठेवावा. पीठ छान आंबते आणि इडली खूप हलकी होते. कांदा अमोनियासारखे काम करतो तर, सोडा अपायकारक असतो.
- आपण नेहमी करतो त्यापेक्षा जरा वेगळ्या प्रकारे कोथिंबिरीच्या वड्या पुढीलप्रमाणेही करता येतात – प्रथम मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी आणि त्यात साधारणपणे कोथिंबिरीच्या निम्म्याने पाणी फोडणीत टाकावे. लसूण, मिरची (लाल तिखट), ओवा, जिरे बारीक करून त्यात घालून चांगली उकळी आणावी. चवीपुरते मीठ घालून स्वच्छ धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात टाकून शिजवावी. नंतर त्यात बसेल एवढे बेसनपीठ घालून घट्ट गोळा करावा व दणदणीत वाफा आणून खाली उतरवावे. नंतर त्यावर लिंबू पिळून किंवा फोडणीत आंबट ताक घातले तरी चालते. त्याच्या तेल लावलेल्या ताटात वड्या पाडाव्यात. यामध्ये उकडणे, तळणे हे वाचून तेलाची बचत होते आणि ज्यांना तळकट खायचे नाही त्यांनाही उपयुक्त ठरते.
हेही वाचा – Kitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी…
- नेहमी इडली करताना आपण फक्त उडदाची डाळच भिजत घालतो. उडदाच्या डाळीत एक मूठभर मटकीची डाळ आणि चमचाभर मेथी भिजत घालावी. चार- पाच तास भिजल्यावर सर्व एकदम मिक्सरमधून काढावे. त्याच वेळी डाळीत थोडे तेल आणि व्हिनीगर घालावे. पीठ खूप फुगते. इडल्या हलक्या, मऊ, चकचकीत होतात.
- दहीवडे किंवा वडा-सांबार करताना उडदाचे पीठ घाईगडबडीत थोडेफार सैल झाल्यास त्या अंदाजानुसार मूठभर पातळ पोहे टाकावेत आणि डावाने ढवळावे. पंधरा मिनिटांनी पुन्हा ढवळावे आणि वडे तळावेत. हे वडे खुसखुशीत आणि हलके होतात.
हेही वाचा – Kitchen Tips : घरात पातळ पोहे पाहिजेतच… कॉर्नफ्लोअरचा असाही उपयोग
- डोसे करताना तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडीदडाळ घेऊन, तुरीची डाळ- पाव वाटी, मेथी- पाव चमचा वेगळी भिजवावी. हे सर्व रात्री वेगवेगळे वाटून एकत्र करून फेटावे. दुसऱ्या दिवशी डोसे करावेत. तुरीची डाळ आणि मेथीमुळे डोसे जास्त कुरकुरीत, पातळ होतात आणि तव्यावरून आपोआप कडा सुटून येतात. तव्याला चिकटत नाहीत.
- शेव तयार करताना डाळीच्या पिठात उकडलेल्या बटाट्याचा किस आणि पापडखार, थोडे गरम तेल, हिंग, मीठ, ओवा घाला. विकतची महाग शेव, शिवाय खराब तेलामुळे घसा धरण्यापेक्षा घरी केलेली शेव चांगली तर होतेच, शिवाय, भरपूरही!


