डॉ. प्रिया गुमास्ते
आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर कन्सलटन्ट
वर्षा हा मोहक पावसाचा ऋतू श्रावण आणि भाद्रपद महिन्यांत भारतीय उपखंडात पसरतो. (Mid-June to Mid-September). वर्षा ऋतू हा जलतत्वाशी संबंधित आहे. हा पोषण, पुनरुज्जीवन आणि परिवर्तनाचा काळ आहे. या ऋतूमध्ये वातावरण आणि पर्यावरणाच्या गुणांमध्ये लक्षणीय बदल होतात, ज्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पाऊस हा एक नैसर्गिक शुद्धीकरण करणारा आहे, म्हणून हा ऋतू शुद्धीकरण आणि विषमुक्तीचा काळ मानला जातो. तो वातावरण आणि पृथ्वीवरील विषारी पदार्थ आणि अशुद्धता धुऊन टाकतो. या ऋतूत अनेक औषधी वनस्पतींची लागवड केली जाते.
दोष आणि ऋतू
वर्षा ऋतू हा काळ वात दोषाच्या प्रकोपाचा असून या काळात शरीरातील वात वाढतो आणि तो वातविकारांना वाढवतो किंवा उत्पन्न करतो. वात दोष हवा आणि आकाशाच्या घटकांशी संबंधित आहे आणि जेव्हा तो असंतुलित होतो, तेव्हा तो कोरडेपणा, चिंता आणि पचनक्रियेत अडथळा यासारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. वात प्रकोपास पोषक वातावरण असल्यामुळे वाढलेला वात हा संधीवात (Arthritis), आमवात (Rheumatoid Arthritis), दमा (Asthama), मणक्यांचे विकार, ज्वर, त्वचाविकार (Skin diseases) अशा आजारांना उत्पन्न करतो किंवा वाढवतो. याव्यतिरिक्त, या काळात आपला पचनअग्नी कमकुवत होतो. पचनशक्ती कमी झाल्याने पचनाचे विकार बळावतात.
तसेच, हवेतील आर्द्रता आणि सूर्यकिरणांचा अभाव हा जीवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असतो, यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढू लागते. तसेच, या काळातील दूषित पाण्यामुळे देखील अतिसार (loose motions / Diarrhea ), काविळ (Jaundice) त्वचाविकार, मलेरिया, टायफॉइड असे विकार उत्पन्न होतात. हे सर्व टाळण्यासाठी तसेच वर्षा ऋतूमध्ये देखील आरोग्य चांगले राहण्यासाठी आयुर्वेद ग्रंथांमधे विशिष्ट आहार आणि राहणीमान यांचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
हेही वाचा – Ayurveda : शिशिर ऋतुचर्या
वर्षा ऋतूमध्ये आहार कसा असावा?
- या ऋतूत आहार हा ताजा आणि गरम सेवन करावा. फ्रीजमधील पदार्थ, पेय आणि भाज्या खाणे टाळावे. त्याने या ऋतूमध्ये वात आणि कफ वाढून वातविकार तसेच सर्दी चटकन होते.
- वेगवेगळ्या डाळींचे किंवा मांस पदार्थांचे यूष (सूप) हे पाचक आणि जाठराग्निवर्धक असल्याने त्यांचे सेवन करावे. वातवर्धक आहार टाळावा. कडू, तुरट आणि तिखट चवीचे पदार्थ या ऋतूत कमी प्रमाणात सेवन करावेत.
- मसाले, उदा. लसूण, आले, हिंग, हळद, मिरे यांचा योग्य प्रमाणात उपयोग आहारात करावा.
- आले आणि मध मिसळलेले कोमट पाणी प्यायल्याने तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला नैसर्गिकरित्या चालना मिळू शकते आणि एकूणच आरोग्याला आधार मिळू शकतो.
- आहारात पचण्यास हलक्या आणि ताज्या पदार्थांचा समावेश करावा.
- तांदूळ, गहू तसेच विविध डाळी भाजून, त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवावेत आणि त्यांचे सेवन करावे.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध विविध फळे, भाज्या, औषधी वनस्पती समाविष्ट कराव्यात. हे पदार्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि आजारांपासून तुमच्या शरीराचे रक्षण करण्यास मदत करू शकतात.
राहणीमान (विहार) कसे असावे? (Lifestyle in Monsoon Season)
पावसात भिजण्याचे आकर्षण सर्वांना असू शकते; परंतु या ऋतूमध्ये जास्त पावसात जाणे टाळावे. जाणे झालेच तर छत्री / रेनकोट यांचा वापर करावा. घरी परत आल्यावर अंग आणि केस पूर्ण कोरडे करावे. मूळात पावसात अधिक भिजणे टाळावे. पावसाच्या पाण्याच्या जास्त संपर्कामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते आणि संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.
वैयक्तिक स्वच्छता
- पावसाळ्यात वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाचे पाणी अनेकदा दूषित असू शकते आणि स्वच्छतेच्या चुकीच्या पद्धतींमुळे संसर्ग पसरू शकतो. विशेषतः जेवणापूर्वी नियमितपणे साबण आणि पाण्याने हात धुवावेत.
- स्नानापूर्वी शरीरास कोमट तेलाने अभ्यंग करावे. तेल वातनाशक आहे, त्यामुळे या दिवसांत तीळ तेलाने अभ्यंग करावे.
- कपडे योग्य न वाळल्यामुळे बर्याचदा त्यात आर्द्रता असते आणि असे कपडे परिधान केल्यास त्वचा विकार होण्याचा संभव असतो. त्यामुळे परिधान करावयाचे सर्व बाह्य आणि अन्तर्वस्त्र चांगले वाळवून मगच वापरावेत.
- शरीर उबदार ठेवणे : पावसामुळे तापमान थंड राहात असल्याने, शरीर उबदार आणि संरक्षित ठेवणे आवश्यक होते. थरांमध्ये कपडे घालणे आणि हवामानानुसार कपडे घालणे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करू शकते. थंडी आणि ओलसरपणाचा धोका टाळू शकते.
परिसर स्वच्छता
घरातील वातावरण स्वच्छ आणि कोरडे ठेवावे, आजूबाजूस पाणी जास्त काळ जमा होऊ देऊ नये. घरामधे अगरू, गुग्गूळ, चंदन यांनी धूपन केल्यास जंतुसंसर्ग कमी होतो आणि वातवरण सुगंधी आणि आल्हाददायक राहाते. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्यास डासांच्या उत्पत्तीस प्रतिबंध होतो आणि रोगांचा प्रसार रोखण्यास मदत होऊ शकते.
हेही वाचा – Ayurveda : ग्रीष्म ऋतुचर्या
वर्षा ऋतूतील पंचकर्म
या ऋतूमध्ये प्रकुपित झालेल्या वाताच्या चिकित्सेसाठी बस्ती या पंचकर्माचे वर्णन आयुर्वेद ग्रंथांमध्ये केले आहे. बस्ती ही वाताची उत्तम चिकित्सा असून याने वात रोग त्वरित आटोक्यात येण्यास मदत होते. यामुळे या ऋतूत बस्ती हे पंचकर्म करून घ्यावे.
पावसाळ्यात काय टाळावे?
- या ऋतूमध्ये मांसाहार टाळावा आणि मासे तर पूर्णपणे टाळावेत; कारण पचनशक्ती मंद असते तसेच मांस देखील दूषित असण्याची शक्यता अधिक असते. यामुळेच या कालावधीत श्रावण किंवा चातुर्मासाचे पालन केले जाते.
- हूरव्या पालेभाज्या या ऋतूमध्ये दूषित असतात आणि त्यावर जीवाण, विषाणूंची अतिरिक्त वाढ होत असते. त्यावर अळ्या (लार्वा) यांचीही वाढ होत असते. तसेच या कालावधीत असा भाजीपाला वातवर्धक असतो; त्यामुळे तो कमी खावा आणि खाताना स्वच्छतेची चांगली काळजी घ्यावी.
- आहारातील तिखट आणि आंबट पदार्थांचा वापर कमी करावा. लोणचे, चिंचेचे पदार्थ हे आहारातील स्वाद वाढवतात; परंतु या कालावधीत यांचे सेवन त्रासदायक ठरू शकते.
- पावसाळ्यात बाहेरचे तळलेले आणि चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते; परंतु त्याने पचनाचे तसेच इतर आजार वाढू शकतात त्यामुळे भजी, वडापाव, चाट असे पदार्थ टाळलेले जास्त चांगले.
- दिवसा झोपणे टाळावे. दिवसा घेतलेली झोप कफवर्धक असते आणि ती वर्षा ऋतूत कमी झालेली पचनशक्ती अजून कमी करते.
- अपरिचित जलाशयात जाणे टाळावे, कारण अशा जलाशयाच्या खोलीचा अंदाज नसल्याने जीवास धोका उत्पन्न होऊ शकतो.
वर्षा ऋतू हा आजार होण्यास पोषक ऋतू असल्याने सर्वात जास्त साथीचे किंवा संसर्गजन्य आजार या दरम्यान होतात. योग्य ऋतुचर्या पाळल्यास तसेच योग्य काळजी घेतल्यास आजारांचा हा ऋतू आनंदी, आल्हाददायक आणि निरोगी जाऊ शकतो.


