स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात –
- भजी करताना जर पळीभर कढत तेलात अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आणि मग ते तेल भज्यांच्या पिठात टाकले, तर भजी अतिशय खमंग आणि खुमासदार होतात.
- भजी म्हटले की, तोंडाला पाणी सुटते; पण ही नवीन कांद्याची कुरकुरीत आणि स्वादिष्ट भजी करण्यासाठी अर्धा किलो कांदे असल्यास (उभे कापलेले) त्यात एक संपूर्ण पिकलेले केळे, एक मूठभर कोवळी मेथीची पाने, अर्धा मूठ आख्खे धणे आणि चिमूटभर ओवा, लाल तिखट तसेच मीठ अंदाजे घालावे. कांद्यात केळे बारीक कुस्करून सगळे साहित्य अर्धा तासभर ठेवावे. त्याला चांगला रस सुटेल. त्यात मावेल तेवढे जाडसर बेसन घालून नेहमीच्या भज्याच्या पिठाइतपत भिजवावे; पण खूप फेटावे आणि तळून स्वादिष्ट तसेच कुरकुरीत भजी, हिरव्या मिरचीच्या आंबडगोड चटणीबरोबर खावीत.
हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड…
- दहिवडे करावयास सोपे असले तरी, तयारी वेळखाऊ आणि कष्टदायक आहे. पुढीलप्रमाणे केल्यास दहा-पंधरा मिनिटांत ते तयार होतात. दोन वाट्या उडदाची डाळ आणि दोन वाट्या मुगाची मोगर डाळ (साल काढलेली) वेगवेगळी रात्री भिजत घालावी. (ज्यांना उडदाची डाळ आवडते, त्यांनी तीन वाटी उडीदडाळ आणि एक वाटी मूगडाळ घेतली तरी चालेल). सकाळी त्याचे पाणी पूर्ण काढून टाकावे आणि स्वच्छ फडक्यावर सावलीत पसरून ठेवावी. डाळ पूर्ण वाळली की, एकत्र करून मिक्सरमधून दरदरीत (साधारण जाडसर) पीठ काढावे आणि कोरड्या बरणीत भरून ठेवावे. ज्या वेळेस दहिवडे करावयाचे असतील, तेव्हा थोडे पीठ पातेलीत काढून त्यात किंचित मीठ आणि जिरेपूड घालावी तसेच भज्यांच्या पिठाप्रमाणे भिजवावे. फार घट्ट भिजवू नये आणि भज्याप्रमाणे तळून कोमट पाण्यात वडे घालावेत. घरात दही आणि जिरेपूड असतेच. देतेवेळी पाण्यातून वडे काढून दोन्ही तळहाताने दाबावेत आणि प्लेटमध्ये ठेवून वर दही, मीठ, तिखट, जिरेपूड घालावी.
हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसा, छोले भटुरे, सॉफ्ट इडली, खमंग धिरडी…
- डोशासाठी पीठ भिजवताना उडीदडाळ आणि तांदूळ समप्रमाणात भिजवून रात्री वाटून ठेवावे. दुसऱ्या दिवशी त्या पिठामध्ये एक वाटी रवा आणि थोडे गव्हाचे पीठ (4 चमचे) मिसळावे आणि दोन तासांनी डोसे करावेत. छान खरपूस रंग येतो आणि चवही चांगली लागते.
- गोडाचे अथवा तिखटाचे पदार्थ उदा. सामोसे, कचोरी, सांजोरी, गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या इत्यादी तळायच्या आधी तव्यावर (थोड्या) भाजून घेतल्यास तेल वा तूप नेहमीपेक्षा खूप कमी तर लागतेच, शिवाय पदार्थ खुसखुशीत आणि हलका होतो. पदार्थांमध्ये तेल वा तूप उतरत नाही. (तथापि, पदार्थ भाजता येण्यासारखा हवा.)
- भांड्यात भाजणीचे दोन वाट्या पीठ घ्यावे. तिखट-मीठ घालावे. तेल गरम करून घालताना तेलात थोडा खाण्याचा सोडा घालावा. नंतर तेल पिठात घालावे. पाण्यात पीठ भिजवावे. चकली करावी. चकलीला छान नळी पडते. चकली चांगली होते.


